हरमनप्रितच्या ४६ धावा व दिप्तीच्या ३ गड्यांच्या बळावर भारताचा ११ धावांनी विजय, भारतीची मालिकेत १-० ने आघाडी!!

एका प्रदिर्घ कालावधीनंतर भारतीय महिला संघ आंतरराष्ट्रीय मालिका खेळत होता. ५ टी-२० व ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आला आहे त्यात टी-२० मालिकेतील पहिला सामना आज खेळवला गेला त्यात दक्षिण आफ्रिकेची कर्णधार सुन लुसने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताकडुन शफाली वर्मा तर आफ्रिकेकडुन मल्बा आपला पहिला टी-२० सामना खेळत होत्या.

      पदार्पणाचा सामना खेळणारी शफाली व मंधना सलामीला आल्या होत्या पण इस्मैलने शफालीला शून्यावर बाद करत संघाला शानदार सुरुवात करुन दिली होती. पहिल्याच षटकांत शफाली बाद झाल्यानंतर जेमिमाह रॉडरीग्सने मंधनासोबत २८ धावांची तर कर्णधार हरमनप्रित कौरसोबत ३० धावांची भागिदारी रचत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. चांगली सुरुवात केल्यानंतर जेमिमाह व मंधना मोठी खेळी करण्यात अपयशी ठरल्या. ९.५ षटकांत ५८ धावांत ३ गडी गमावल्यानंतर संघाचा डाव सांभाळण्याची जिम्मेदारी हरमनप्रित व दिप्ती शर्मावर आली होती.

हरमनप्रित कौरचा जम बसल्यानंतर तिने मोठे फटके खेळले तर दुसरीकडे दिप्तीने सावध पवित्रा घेतला होता. हरमनप्रित कौर व दिप्तीने चौथ्या गड्यासाठी ३५ चेंडूत ४६ धावांची भागिदारी केली पण ३ चेंडूत २ गडी बाद झाल्यानंतर भारतीय संघ पुन्हा एकदा अडचणीत सापडला होता. शेवटी वेदा व तानिया भाटियाच्या छोट्या खेळीने भारतीय संघ निर्धारीत २० षटकांत ८ गडी गमावत १३० धावांपर्यंत पोहचला. भारताकडुन कर्णधार हरमनप्रित कौरने सर्वाधिक ४३ धावा केल्या तर आफ्रिकेकडुन इस्मैलने २६ धावांत ३ गडी बाद केले.

१३१ धावांचा यशस्विरित्या पाठलाग करण्यासाठी आफ्रिकेला चांगल्या सलामीची आवश्यकता होती. पुजा वस्त्राकरच्या पहिल्याच षटकांत आफ्रिकेनी १८ धावा काढतसंघाला जबरदस्त सुरुवात करुन दिली होती पण पुढच्याच षटकांत शिखा पांडेनी लिझली लीला त्रिफळाचीत करत संघाला पहिले यश मिळवुन दिले. २९ धावांत ३ गडी गमावल्यानंतर वोल्वार्डट व ड्यु प्रिजने १९ धावांची भागिदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण ९व्या षटकांत पुनम यादवने दोन गडी बाद करत सामना भारताच्या बाजूने झुकवला होता.

६५ धावांत अर्धा संघ गमावल्यानंतर ड्यु प्रिजने एक बाजू लावुन धरली होती १९ व्या षटकांत आपले अर्धतक साजरे केले होते आता शेवटच्या षटकांत आफ्रिकेला विजयासाठी १८ धावांची आवश्यकता होती आणि शेवटच्या षटकांच्या पहिल्याच  चेंडूवर षटकार खेचत ड्यु प्रिजने आपले इरादे स्पष्ट केले होते पण राधा यादवने ड्यु प्रिजला ५९ धावांवर करत भारताचा विजय निश्चित केला होत त्यानंतर पुढच्याच चेंडूवर मल्बाला बाद करत भारताला ११ धावांनी विजय मिळवुन दिला. या विजयासह भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. ८ धावांत ३ गडी बाद करणाऱ्या दिप्ती शर्माला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. दिप्तीला शिखा, पुनम यादव व राधा यादवने प्रत्येकी २ गडी बाद करत चांगली साथ दिली. मालिकेतला दुसरा सामना २६ सप्टेंबरला सुरतमध्ये खेळविण्यात येणार आहे.    

शंतनु कुलकर्णी

Share this...

marathikatta

Leave a Reply

Your email address will not be published.