गोलंदाजांनतर क्विंटन डी कॉकची नाबाद ७९ धावांची कर्णधारास साजेशी खेळी, मालिका १-१ ने बरोबरीत सोडवली!!

मोहालीत झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यांत कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद ७२ धावांच्या बळावर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर ७ गड्यांनी विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली होती. त्यामुळे तीसऱ्या सामन्यांत विजय मिळवुन मालिका २-० ने खिशात घालण्याच्या प्रयत्नात भारतीय संघ होता तर मालिका बरोबरीत सोडवण्यास उत्सुक होता. भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यांतील संघच कायम ठेवला होता तर दक्षिण आफ्रिकेने एक बदल करत नॉर्टजेच्या जागी ब्युरन हेंड्रीक्सला संघात स्थान दिले होते.

मागच्या सामन्याप्रमाणे  या सामन्यांतही भारतीय सलामीवीरांनी संघाला धडाक्यात सुरुवात करुन दिली होती पण सलग दुसऱ्या सामन्यांत रोहित शर्मा (९) अपयशी ठरला. तीसऱ्याच षटकांत मैदानात उतरलेल्या विराट कोहलीकडुन पुन्हा एकदा मोठ्या खेळी अपेक्षा होती पण आफ्रिकेचे गोलंदाज आज विराटला कोणतीही संधी देत नव्हते पण धवन मात्र चांगल्या लयीत दिसत होता. ६ षटकांत १ गडी गमावत ५४ धावा करत भारताने चांगली सुरुवात केली होती आणि भारतीय संघ मोठ्या धावसंख्येकडे आगेकुच करताना दिसत होता. पण ७ चेंडूत दोघेही माघारी परतले. ३ बाद ६८ अशा स्थितीत सापडल्यानंतर डाव सांभाळण्याची जिम्मेदारी पंत व अय्यरवर आली होती. एक-दोन मोठे फटके खेळत पंतने डाव सांभाळण्यचा प्रयत्न केला पण १३ व्या षटकांत मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पंत १९ धावांवर बाद झाला त्याच षटकांत पुढे सरसावत फॉर्ट्युनला मोठा फटका खेळण्याच्या नादात अय्यर यष्टिचीत झाला. एकाच षटकांत दोन गडी गमावल्याने भारतीय संघ पुन्हा एकदा ५ बाद ९२ अशा अडचणीत सापडला होता. शेवटी रविंद्र जडेजा व हार्दिक पंड्याच्या अनुक्रमे १९ व १४ धावांच्या खेळीने संघाला १३४ धावांपर्यंत पोहचवले. भारताकडुन शिखर धवनने सर्वाधिक ३६ धावांची खेळी केली तर आफ्रिकेकडुन रबाडाने ३, हेंड्रीक्स व फॉर्ट्युनने प्रत्येकी २ तर शम्सीने १ गडी बाद केला.

चिन्नस्वामी मैदानावर १३५ तसे मोठे नव्हतेच त्यामुळे भारताला झटपट गडी बाद करण्याची आवश्यकता होती. वॉशिंग्टन सुंदर व दिपक चहरने आफ्रिकेच्या सलामीवीरांना जखडुन ठेवले होते पण जम बसल्यानंतर क्विंटन डी कॉक व हेंड्रीक्सने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला आणि बघता-बघता आफ्रिकेचा संघ लक्ष्याकडे आगेकुच करत होता व सामना भारताच्या हातातुन जाताना दिसत होता. ११ व्या षटकांत हार्दिक पंड्याने हेंड्रीक्सला २८ धावांवर बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. हेंड्रीक्स व डी कॉकने पहिल्या गड्यासाठी ७६ धावा जोडल्या. आफ्रिकेला विजयासाठी ५९ चेंडूत ५९ धावांची आवश्यकता होती. सलग दुसऱ्या सामन्यांत अर्धशतक साजरे करत त्याने सामना जवळपास आफ्रिकेच्या पारड्यात टाकला होता. शेवटी डी कॉक व तेंबा बमुआने दुसऱ्या गड्यासाठी नाबाद ६४ धावांची भागिदारी करत १६.५ षटकांत आफ्रिकेनी ९ गड्यांनी सामना जिंकत मालिका १-१ ने बरोबरीत राखली.

आफ्रिकेकडुन डी कॉकने नाबाद ७९ धावांची खेळी केली तर भारताकडुन हार्दिक पंड्याने एकमेव गडी बाद केला. १४ धावांत २ गडी बाद करणाऱ्या ब्युरन हेंड्रीक्सला सामनावीर पुरस्काराने तर मालिकेत २ अर्धशतकांसह १३१ धावा करणाऱ्या क्विंटन डी कॉकला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. दक्षिण आफ्रिकेचा संघ २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान अध्यक्षीय संघासोबत सराव सामना खेळणार आहे तर २ ऑक्टोबरपासुन विशाखापट्टणममध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होईल.

शंतनु कुलकर्णी

Share this...

marathikatta

Leave a Reply

Your email address will not be published.