कर्णधार कोहलीच्या नाबाद ७२ धावांच्या बळावर दुसऱ्या टी-२० सामन्यांत भारताचा आफ्रिकेवर ७ गड्यांनी विजय!!

धर्मशालेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष आजच्या सामन्याकडे लागले होते. भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेकीचा कौल जिंकत दक्षिण आफ्रिकेला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. भारतीय संघ दोन जलदगती गोलंदाज व तीन फिरकी गोलंदाजांसह उतरला होता. तसेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत शानदार कामगिरी केलेल्या श्रेयस अय्यरला मनिष पांडेच्या जागी संघात संधी देण्यात आली तर दक्षिण आफ्रिकेकडुन बमुआ, नॉर्टजे व फॉर्ट्युइन आपला पहिलाच आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळणार होते. फाफ ड्युप्लेसिसच्या अनुपस्थित आफ्रिकेच्या फलंदाजीची जिम्मेदारी पुर्णपणे कर्णधार डी कॉक व डेविड मिलरवर होती.

      दक्षिण आफ्रिकेकडुन सलामीला आलेल्या डी कॉकने संघाला शानदार सुरुवात करुन दिली पण दुसरा सलामीवीर हेन्ड्रीक्स मात्र चाचपडत होता आणि तो दिपक चहरच्या गोलंदाजीवर वॉशिंग्टनकडे झेल देऊन परतला. हेन्ड्रीक्सनंतर मैदानात आलेल्या बमुआला सोबत घेत डी कॉकने डाव सावरला आणि जम बसल्यानंतर बमुआही आपल्या भात्यातील फटके खेळत होता. त्यातच डी कॉकने आपले तिसरे टी-२० अर्धशतक झळकावले. डी कॉक- बमुआची जोडी घातक वाटत असतानाच कोहलीने १२ व्या षटकांत नवदिप सैनीला गोलंदाजीस बोलावले आणि कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत दुसऱ्याच चेंडूवर सैनीने डी कॉकला ५२ धावांवर बाद केले तर पुढच्याच षटकांत जडेजाने ड्युसेनला बाद करत आफ्रिकेची अवस्था १ बाद ८८ वरुन ३ बाद ९० केली होती.

      आता शेवटच्या ८ षटकांत संघाचा डाव सांभाळण्याची जिम्मेदारी अनुभवी डेविड मिलरवर होती. बमुआ व मिलरची जोडी जमली होती पण त्यांना हवी तशी धावसंख्या वाढवता आली नाही आणि त्यांना ५ षटकांत फक्त ३६ धावां करता आल्या. संघाच्या १२६ धावं झाल्या असताना दिपक चहरने बमुआला ४९ धावांवर बाद करत आफ्रिकेला चौथा धक्का दिला. शेवटच्या षटकांत १६ धावा काढल्याने आफ्रिका निर्धारित २० षटकांत १४९ धावांपर्यंत पोहचला. आफ्रिकेकडुन डी कॉकने सर्वाधिक ५२ धावा केल्या तर भारताकडुन दिपक चहरने २ तर सैनी, हार्दिक व जडेजाने प्रत्येकी एक गडी बाद केला.

      १५० धावांचे आव्हाने तसे मोठे नव्हते पण ते पार करण्यासाठी भारतीय संघाला रोहित व शिखर कडुन चांगल्या सलामीची आवश्यकता होती. एका शानदार चौकाराने शिखरने आपल्या डावाची सुरुवात केली होती तर दुसरीकडे रोहितने नॉर्टजेच्या गोलंदाजीवर दोन शानदार षटकार खेचत आपले इरादे स्पष्ट केले होते पण फेहलुवायोच्या गोलंदाजीवर रोहित चकला आणि १२ धावांवर पायचित झाला. रोहित बाद झाल्यानंतर मैदानात आलेला कोहलीने शानदार सुरुवात केली. कोहली – शिखरच्या जोडीने आवश्यक धावगती राखली होती आणि हे दोघेच संघाला विजय मिळवुन देतात की असे दिसत असताना शम्सीच्या गोलंदाजीवर पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याच्या नादात धवन (४०) मिलरकडे झेल देऊन परतला. धवन बाद झाला तेव्हा भारताला विजयासाठी ५० चेंडूच ५६ धावांची आवश्यकता होती.

वेस्ट इंडिज दौऱ्यात सपशेल अपयशी ठरलेला पंत श्रेयस अय्यरच्या आधी फलंदाजीला आल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता पण पुन्हा एकदा संधीचा फायदा उठवण्यात पंत अपयशी ठरला पण कोहलीने एक बाजू लावुन धरली होती. पंत बाद झाल्यानंतर कोहली जास्त आक्रमक झाल्यासारखा दिसत होता. त्यातच त्याने आपले २३ वे अर्धशतक साजरे केले. १२ चेंडूत १२ धावांची आवश्यकता असताना पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या फॉर्ट्युइनने टाकलेल्या १९ व्या षटकांत कोहलीने एक षटकार तर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अय्यरने चौकार मारत संघाला ७ गडी राखुन विजय मिळवुन दिला. आफ्रिकेकडुन फेल्युकवोयो, शम्सी व फॉर्ट्युइनने प्रत्येकी १ गडी बाद केला. भारताकडुन नाबाद ७२ धावांची खेळी करणाऱ्या विराट कोहलीला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. या विजयासह भारतीय संघाने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा व शेवटचा सामना २२ सप्टेंबरला बेंगलोर येथे खेळविण्यात येणार आहे.

शंतनु कुलकर्णी

Share this...

marathikatta

2 thoughts on “कर्णधार कोहलीच्या नाबाद ७२ धावांच्या बळावर दुसऱ्या टी-२० सामन्यांत भारताचा आफ्रिकेवर ७ गड्यांनी विजय!!

Leave a Reply

Your email address will not be published.