शेवटच्या साखळी सामन्य़ांत बांग्लादेशचा अफगाणिस्तानवर विजय, शाकिब ठरला सामनावीर!!

दोन्ही संघांनी या सामन्यांआधीच अंतिम सामन्यांत धडक मारल्याने या सामन्याच्या गुणतालिकेत कोणताही बदल होणार नव्हता पण या सामन्यांत विजय मिळवून पूर्ण ताकतीनिशी अंतिम सामन्यांत जाण्याच्या प्रयत्नात दोन्ही संघ होते. मालिकेतल्या आधीच्या सामन्यांत अफगाणिस्तानने यजमान बांग्लादेशचा पराभव केला होता त्यामुळे त्याचीच पुनरावृत्ती करण्याच्या इराद्यात अफगाणिस्तानचा संघ होता तर पारभवाचा बदला घेण्यास बांग्लादेशचा संघ उत्सुक होता. शाकिब उल हसनने नाणेफेकीचा कौल जिंकत अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले होते. अफगाणिस्तानकडुन नवीन उल हक पदार्पणचा सामना खेळत होता.

      प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्याचा फायदा उठवत हजरतुल्लाह व रहमतुल्लाहने संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली होती. दोघेही चांगल्या लयीत दिसत होते. या दोघांनी ९.३ षटकांत ७५ धावांची सलामी देत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला होता. ७५ धावांच्या सलामीमुळे बांग्लादेशचा संघ काहीसा अडचणीत आला होता पण १० व्या षटकांत अफिफ हुसैनने हजरतुल्लाह (४७) व असगर अफगाणला बाद करत अफगाणिस्तानची अवस्था २ बाद ७५ केली होती. झटपट दोन गडी बाद केल्यानंतर बांग्लादेशच्या गोलंदाजांनी जणु अफगाणिस्तानच्या फलंदाजांभोवती फास अवळला होता. एक वेळ बिनबाद ७५ वरुन अफगाणिस्तानची अवस्था ५ बाद ९६ झाली होती शेवटी शफिकउल्लाहने नाबाद २३, नजिबुल्लाहच्या १४ व राशिद खानच्या नाबाद ११ धावांमुळे अफिगाणिस्तानचा संघ निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावुन १३८ धावांपर्यंत पोहचु शकला. अफिफ हुसैनने २ गडी बाद करत महत्त्वाचे योगदान दिले.

      १३९ धावांचे आव्हान तसे मोठे नव्हते पण लहान वाटणारे आव्हानच जास्त जड वाटत. त्यामुळे बांग्लादेशला चांगल्या सलामीची अपेक्षा होती पण मुजीब उर रहेमानने लिटन दासला व पदार्पणचा सामना खेळणाऱ्या नवीन उल हकने नजमुल हुसैनला बाद करत बांग्लादेशची अवस्था ३.२ षटकांत २ बाद १२ केली होती. झटपट दोन गडी गमावल्यानंतर मैदानात आलेल्या शकिब अल हसन व मुशफिकर रहिमने सावध पवित्रा घेत डाव सांभळण्यावर भर दिला आणि जम बसल्यानंतर दोघांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना संधी दिली नाही. हे दोघेत बांग्लादेशला सामना जिंकुन देतील असे वाटत असतानाच करीम जन्नतने रहीमला २६ धावांवर बाद केले तेव्हा बांग्लादेशने १०.४ षटकांत ७० धावा केल्या होत्या आणि त्यांना विजयासाठी ५६ चेंडूत ६९ धावांची आवश्यकता होती.

रहिम बाद झाल्यांनतर बांग्लादेशने पुढील ३४ धावांत आणखी ३ गडी गमावले पण शकिब अजुनही मैदानावर टिकुन होता. शेवटी शकिबने मुसदैक हुसैनसोबत १९ व्या षटकांतच आपल्या संघाला ४ गडी राखुन विजय मिळवून दिला. शकिब अल हसन ७० तर मुसदैक हुसैन १९ धावांवर नाबाद राहिले. अफगाणिस्तानकडुन नवीन उल हक व राशिद खानने प्रत्येकी २ गडी बाद केले. १ गडी व नाबाद ७० धावा अशी अष्टपैलु कामगिरी केलेल्या शाकिब अल हसनला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. २४ सप्टेंबर रोजी मालिकेचा अंतिम सामना बांग्लादेश व अफगाणिस्तानमध्ये मिरपुर येथे खेळविण्यात येणार आहे.

शंतनु कुलकर्णी

Share this...

marathikatta

Leave a Reply

Your email address will not be published.