उस्मान ख्वाजा आणि झंपाच्या कामगिरीच्या बळावर ऑस्ट्रेलियाचा ३-२ ने मालिका विजय, ख्वाजा ठरला मालिकावीर!

चौथ्या सामन्यांत ३५९ धावांचा यशस्वी पाठलाग करत ऑस्ट्रेलियाने मालिकेत बरोबरी साधली होती. एवढ्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग केल्याने ऑस्ट्रेलिया संघाचा आत्मविश्वास वाढला होता यात काही शंका नव्हती. ० – २ ने मालिकेत पिछाडीवर असलेल्या ऑस्ट्रेलियाने मालिकेत २-२ ने बरोबरी साधली होती. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाने संघात दोन बदल करत शॉन मार्श व जेसन बेहरेनडॉर्फच्या जागी मार्कस स्टॉयनिस व नॅथन लायनला संधी दिली तर भारतीय संघाने राहुल व चहलच्या जागी जडेजा व शमीला संघात स्थान दिले.

      फिंच व ख्वाजाकडुन ऑस्ट्रेलियाला चांगल्या सुरुवातीची आवश्यकता होती आणि आवश्यक सुरुवात त्यांनी दिली ही. फिंचने सावध पवित्रा घेतला होता पण दुसरीकडे ख्वाजा पुन्हा एकदा शानदार लयीत दिसत होता. फिंच व ख्वाजाने संघाला १४.३ षटकांत ७६ धावांची सलामी दिली पण जडेजाने फिंचला त्रिफळाचीत करत भारताला पहिले यश मिळवुन दिले. फिंच (२७) बाद झाल्यानंतर मागच्या सामन्यांतील शतकवीर हॅंडस्कॉम्ब आणि ख्वाजाने संघाला चांगल्या स्थितील नेऊन ठेवले होते. त्यातच ख्वाजाने २ शतक साजरे केले पण शतक झाल्यावर लगेचेच तो बाद झाला. ख्वाजा बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने आणखी दोन गडी गमावले त्यामुळे ऑस्ट्रेलियाची अवस्था १ बाद १७५ वरुन ४ बाद १८२ झाली होती.

      खेळपट्टीवर जम बसलेल्या दोन्ही खेळाडुंना बाद केल्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियाचा डाव कमी धावांत रोखण्याचा प्रयत्न केला. एक वेळ ऑस्ट्रेलियाची अवस्था ४५.५ षटकांत ७ बाद २२९ झाली होती. आता ऑस्ट्रेलियाचा संघ २५०-२६० पर्यंत पोहचेल असे दिसत होते पण जाय रिचर्डसन (२९) आणिपॅट कमिन्स (१५) ने ऑस्ट्रेलियाची धावसंख्या २७२ पर्यंत पोहचवली. ऑस्ट्रेलियाकडुन उस्मान ख्वाजाने सर्वाधिक १०० धावा केल्या तर भारताकडुन भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक ३ गडी बाद केले.

      शेवटच्या काही षटकांत जास्त धावा गेल्याने २५०-२६० पर्यत वाटणारी धावसंख्या २७२ पर्यंत पोहचली होती. मागच्या सामन्यांत भारतीय सलामीवीरांनी शानदार कामगिरी केली होती आणि या सामन्यांतही त्यांच्याकडुन तश्याच कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा होती पण ५ व्या षटकांत कमिन्सने धवनला कॅरीकरवी झेलबाद करत भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर कोहली आणि रोहितने भारताचा डाव सावरला. भारताला मोठ्या भागिदारीची आवश्यकता होती. कोहलीचा जम बसलेला असतानाच बाहेर जाणाऱ्या चेंडूची छेडछाड करणे कोहलीला भोवले आणि तो २० धावांवर बाद झाला. कोहली बाद झाल्यानंतर भारतीय संघाची जिम्मेदारी रोहित शर्मा आणि कमी अनुभवी रिषभ पंत, विजय शंकर व केदार जाधववर आली होती. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या पंतकडुन मोठ्या अपेक्षा होत्या पण तो ही अपयशी ठरला तर विजय शंकरही मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. आता जिम्मेदारी रोहितवर आली होती पण झंपाला पुढे सरसावत मोठा फटका मारण्याच्या नादात  तो ही यष्टिचीत झाला आणि त्याच षटकांत जडेजाही यष्टिचीत झाला व भारताची अवस्था २८.५ षटकांत ६ बाद १३२ झाली होती. ऑस्ट्रेलियाने सामन्यांवर पुर्णपणे पकड मिळवली होती.

      ६ गडी गमावल्यने एखादा चमत्कारच भारताला विजय मिळवुन देऊ शकत होता. २०० धावांच्या आतच भारताचा डाव आटपेल असे दिसत होते पण केदार व भुवनेश्वर मात्र वेगळ्याच विचाराने मैदानात आले होते. या दोघांनी बघता-बघता या दोघांनी ७ व्या गड्यासाठी ९१ धावांची भागिदारी करत आशा पल्लवित केल्या होत्या पण दोन चेंडूत दोघेही परतल्यानंतर भारताचा डाव २३७ धावांत संपुष्टात आला. सामन्यांत ३५ धावांनी विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने ३-२ ने मालिका जिंकली. भारताकडुन रोहित शर्माने सर्वाधिक ५६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडुन झंपाने सर्वाधिक ३ गडी बाद केले. सामन्यांत १०० धावांची खेळी तर मालिकेत २ शतकांसह सर्वाधिक ३८३ धावा करणाऱ्या उस्मान ख्वाजाला सामनावीर पुरस्कारासोबतच मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानविरुद्ध युएई मध्ये २२ मार्च ते ३१ मार्च दरम्यान एकदिवसीय मालिका खेळणार आहे तर भारतीय संघ पुढचा आंतरराष्ट्रीय सामना २०१९ च्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ जूनला साउथॅंम्पटन येथे खेळणार आहे.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *