रॉस टेलर व निकोल्सच्या फलंदाजीतील आणि वॅगनर व ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीतील कामगिरीच्या बळावर न्युझिलंडची मालिकेत २-० ने आघाडी!

पहिल्या सामन्यांत तमिम इक्बाल, सौम्य सरकार आणि महुमदुल्लाहने शानदार फलंदाजी केली होती पण संघाला पराभवापासुन वाचवु शकले नाहीत. तर दुसरीकडे जित रावल, टॉम लेथम आणि केन विल्यमसनने देखील शानदार फलंदाजी केली होती. मालिकेत टिकुन राहण्यासाठी बांग्लादेशला दुसरा सामना जिंकणे आवश्यक होते. पण पहिल्या दोन दिवसांचा खेळ पावसामुळे होऊ शकला नाही. न्युझिलंडचा कर्णधार केन विल्यामसनने नाणेफेक जिंकत बांग्लादेशला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. बांग्लादेशच्या संघाने दोन बदल करत मेहंदी हसन व अबु जायेदच्या जागी तैजुल इस्लाम व मुस्तफिजुर रहेमानला संघात संधी देण्यात आली तर न्युझिलंडने पहिल्या सामन्यांतील संघच कायम ठेवला होता. 

      पहिल्या सामन्यांत शानदार फलंदाजी करणाऱ्या तमिम इक्बाल कडुन मोठ्या खेळीची अपेक्षा होती तशी त्याने संघाला सुरुवात करुन दिली होती आणि तमिम व शदमान इस्लामने संघाला ७५ धावांची सलामी दिली पण त्यानंतर बांग्लादेशचा डाव गडगडला. बिनबाद ७५ वरुन बांग्लादेशची अवस्था ६ बाद १६८ झाली होती पण शेवटी लिटन दासने ३३ धावांची खेळी करत संघाला २११ पर्यंत पोहचवले. तमिम इक्बालने सर्वाधिक ७४ धावांची खेळी केली तर न्युझिलंडकडुन निल वॅग्नरने ४, ट्रेंट बोल्टने ३ तर कॉलिन डी ग्रॅंडहोमे, टीम साउदी आणि मॅट हेनरीने प्रत्येकी १ बळी घेतला.

      बांग्लादेशला २११ धावांत गुंडाळल्याने न्युझिलंडने सामन्यांवर वर्चस्व निर्माण केले होते. गोलंदाजांच्या कामगिरीनंतर न्युझिलंडला फलंदाजांकडुन धडाकेबाज कामगिरीची अपेक्षा होती पण अबु झायेदने दोन्ही सलामीवीरांना बाद करत न्युझिलंडची अवस्था २ बाद ८ केली होती. पण त्यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि रॉस टेलरने बांग्लादेशच्या गोलंदाजांना संधीच दिली नाही. या दोघांनी संघाचा डाव सावरला. बघत-बघता या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी १७२ धावा जोडल्या. विल्यमसन ७४ धावांवर बाद झाल्यानंतर टेलरने कारकिर्दीतले १८ वे कसोटी शतक झळकावले.

      विल्यमसन बाद झाल्यानंतर टेलरने हेनरी निकोल्सला साथीला घेत पहिल्या डावात आघाडी घेतली. दोघेही ५ च्या धावागतीने धावा काढत होते. न्युझिलंडचा संघ मोठ्या धावसंख्येकडे आगेकुच करत होता. त्यातच निकोल्सने ५ वे शतक साजरे केले. शतकानंतर निकोल्स लगेचच बाद झाला पण तोपर्यंत निकोल्स व टेलरने चौथ्या गड्यासाठी २१६ धावा जोडल्या होत्या. निकोल्सनंतर टेलरही २०० धावा काढुन बाद झाला. शेवटी न्युझिलंडने ६ गडी गमावत ४३२ वर डाव घोषित केला. पहिल्या डावात न्युझिलंडने २२१ धावांची आघाडी घेतली होती. बांग्लादेशकडुन अबु झायेदने सर्वाधिक ३ गडी बाद केले.

      सामना वाचवण्यासाठी बांग्लादेशला जवळपास ११० षटके खेळुन काढायची होती पण पहिल्या डावात अर्धशतकी खेळी करणारा तमिम लवकर माघारी परतला आणि चौथ्या दिवसअखेर बांग्लादेशची अवस्था ३ बाद ८० झाली होती. पाचव्या दिवशी मोहम्मद मिथुन (४७) आणि कर्णधार महमदुल्लाह (६७) ने काही प्रमाणात प्रतिकार केला पण दुसऱ्या बाजूने त्यांना साथ मिळाली नाही. वॅग्नर व बोल्टच्या धारदार गोलंदाजीसमोर बांग्लादेशचा दुसरा डाव २०९ धावांत आटोपला आणि न्युझिनंडने एक डाव व १२ धावांनी सामना जिंकत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. न्युझिलंडकडुन वॅग्नरने ५, बोल्टने ४ तर हेनरीने १ बळी बाद केला. सामन्यांत २१२ चेंडूत २०० धावांची खेळी केलेल्या रॉस टेलरला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना १५ मार्चे ते १९ मार्च दरम्यान ख्रिस्टचर्च येथे खेळविण्यात येणार आहे.

शंतनु कुलकर्णी  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *