हॅंडस्कॉंम्ब, ख्वाजा आणि टर्नरच्या शानदार फलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाचा ४ गड्यांनी विजय, मालिका २-२ ने बरोबरीत!

कर्णधार विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमधील ४१ वे शतक झळकावल्यानंतरही भारताला रांचीमध्ये झालेल्या तीसऱ्या सामन्यांत भारताला ३२ धावांनी पराभव स्विकारावा लागला होता. मोहालीतला सामना जिंकुन मालिका आपल्या नावे करण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरला होता तर मालिका बरोबरी साधण्यास ऑस्ट्रेलियाचा संघ उत्सुक होता. विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाने संघात ४ बदल करत धोनी, शमी, रविंद्र जडेजा आणि अंबाती रायडुच्या जागी रिषभ पंत, भुवनेश्वर कुमार, चहल आणि के एल राडुलचा संघात समावेश करण्यात आला तर ऑस्ट्रेलियाने नॅथन लायन आणि मार्कस स्टॉयनिसच्या जागी जेसन बेहरेनडॉर्फ आणि अॅस्टन टर्नरला संधी दिली.

पहिल्या ३ सामन्यांत भारताची सलामी जोडी रोहित व धवन पुर्णपणे अपयशी ठरले त्यामुळे भारताला या जोडीकडुन मोठ्या खेळीची अपेक्षा होती. एकीकडे धवन जबरदस्त फटके खेळत होता तर रोहितने मात्र सावध पवित्रा घेतला होता जणु तो मोठी खेळी खेळण्याच मनात पक्क करुन मैदानात आला होता. धवनने ऑस्ट्रेलियाच्या जलदगती गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. ऑस्ट्रेलियाचा संघ ४ गोलंदाजासहं खेळत होता त्यामुळे मॅक्सवेलला ५ व्या गोलंदाजाची भुमिका निभावायची होती. जलदगती गोलंदाजांना अपयश आल्यानंतर फिंचने मॅक्सवेलला पहिल्या १० षटकांत गोलंदाजीस आणले. पण तो ही धवन-रोहितला रोखु शकला नाही. बघता-बघता भारतीय संघ मोठ्या धावसंख्येकडे आगेकुच करत होता. त्यातच धवनने आपले अर्धशतक साजरे केले.

सुरुवातीला सावध पवित्रा घेणाऱ्या रोहित शर्माने अर्धशतक झळकावल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजावर जोरदार हल्ला केला. रोहित आणि धवन दोघेही शतकाकडे आगेकुच करत होते. पण रोहित (९५) रीचर्डसनला पुलचा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. धवन व रोहितने ३१ षटकांत १९३ धावांची सलामी दिली. त्यानंतर धवनने एकदिवसीय कारकिर्दीतले १६ वे शतक झळकावले. शतक झळकावल्यानंतर धवन जास्त आक्रमक झाला होता. रोहित बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या के एल राहुलने धवनला चांगली साथ दिली. कारकिर्दीतली सर्वोच्च १४३ धावा केल्यानंतर धवन कमिन्सच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. दोन षटकानंतर कोहलीसुद्धा बाद झाला आणि भारतीय संघाची अवस्था ३९.४ षटकांत २६६ झाली होती. आता भारतीय संघाचा डाव सावरण्याची जिम्मेदारी राहुल व पंतवर होती.

      पंत (३६), राहुल (२६) व विजय शंकर (२६) ने छोट्या खेळी करत भारतीय संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहचवले. शेवटच्या चेंडूवर कमिन्सला षटकार मारत बुमराहने भारतीय संघाला ३५८ धावांपर्यंत पोहचवले. भारतीय संघाकडुन शिखर धवनने सर्वाधिक १४३ धावा केल्या तर ऑस्ट्रेलियाकडुन पॅट कमिन्सने एकदिवसीय कारकिर्दीतले सर्वोच्च प्रदर्शन करत ७७ धावांत ५ गडी बाद केले. कमिन्सने पहिल्यांदाच एकदिवसीय सामन्यांत ५ गडी बाद केले. कमिन्सला जाय रिचर्डसनने ३ तर झंपाने १ गडी बाद करत कमिन्सला योग्य साथ दिली.

      ३५९ धावांचा यशस्वी पाठलाग करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला चांगल्या सुरुवातीची आवश्यकता होती. मागच्या सामन्यांत फिंच व उस्मान ख्वाजाने विजयात महत्त्वाची भुमिका निभावली होती. पण शमीच्या जागी खेळणाऱ्या भुवनेश्वर कुमारने फिंचला त्रिफळाचीत करत भारताला पहिले यश मिळवुन दिले त्यानंतर बुमराहने शॉन मार्शला त्रिफळाचीत करत ऑस्ट्रेलियाची अवस्था ३.३ षटकांत २ बाद १२ झाली होती. दोन झटपट गडी गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ दडपणात सापडला होता. त्यानंतर ख्वाजा व हॅंडस्कॉंम्बने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. दोघांनी धावगती ५ च्या वर ठेवली होती. जम बसल्यानंतर दोघांनी आपपली अर्धशतके साजरी केली. या दोघांनी कुलदिप यादव, केदार जाधव आणि चहलचा यशस्वीपणे सामना केला.

      ख्वाजा व हॅंडस्कॉंम्बने ऑस्ट्रेलियाला सामन्यांत टिकुन ठेवले होते. भारताला गडी बाद करण्याची आवश्यकता होती. दोघेही शतकांच्या जवळ होते त्यातच कोहलीने बुमराहला गोलंदाजीस बोलवले आणि पहिल्याच चेंडूवर बुमराहने ख्वाजाला ९१ धावांवर बाद करत संघाला मोठे यश मिळवुन दिले. पण हॅंडस्कॉंम्बने पहिले एकदिवसीय शतक साजरे केले. ख्वाजा बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या मॅक्सवेलवर मोठी जिम्मेदारी होती तशी त्याने सुरुवातही केली होती पण कुलदिप यादवला रिव्हर्स स्विप मारण्याच्या नादात मॅक्सवेल पायचित झाला. हा ऑस्ट्रेलियासाठी मोठा धक्का होता. मॅक्सवेल बाद तेव्हा ऑस्ट्रेलियाला १३.५ षटकांत १३० धावांची आवश्यकता होती. मॅक्सवेल बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या टर्नर आणि हॅंडस्कॉंम्बने ५ व्या गड्यासाठी ४२ धावा जोडल्या.

      चहलने हॅंडस्कॉंम्बला ११७ धावांवर बाद करत मोठे यश मिळवुन दिले पण टर्नरने एक बाजू सांभाळली होती. हॅंडस्कॉंम्ब बाद झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाला ५३ चेंडूत ८८ धावांची आवश्यकता होती. आपला दुसराच एकदिवसीय सामना खेळणाऱ्या अॅस्टन टर्नरने भारतीय गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला आणि आवश्यक धावगती १० च्या जवळ राखली होती. ६ षटकांत ६२ धावांची आवश्यकता असताना टर्नर व कॅरीने ३ षटकांतच ५४ धावा काढत सामन्यांवर ऑस्ट्रेलियाची पकड होती. आता ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ३ षटकांत ८ धावांची आवश्कता होती. ४८ व्या षटकांत ऑस्ट्रेलियाने १ गडी गमावत ४ गड्यांनी विजय मिळवत मालिकेत २-२ ने बरोबरी साधली. अॅस्टन टर्नर ४३ चेंडूत ८४ धावां काढुन नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडुन हॅंडस्कॉंम्बने ११७ धावा काढल्या तर भारताकडुन जसप्रित बुमराहने सर्वाधिक ३ गडी बाद केले.  ४३ चेंडूत नाबाद ८४ धावा काढणाऱ्या अॅस्टन टर्नरला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

मालिकेतील पाचवा व शेवटचा सामना १३ मार्च रोजी दिल्लीत खेळविला जाणार आहे.

शंतनु कुलकर्णी  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *