स्मृती मंधनाच्या अर्धशतकानंतरही भारताचा १ धावेनी पराभव, इंग्लंडचा ३-० ने मालिका विजय

भारतीय संघाने टी-२० मालिका आधीच गमावली होती त्यामुळे इंग्लंडचे मालिकेवर वर्चस्व होते त्यामुळे मालिकेचा शेवट गोड करण्याच्या दृष्टीने भारतीय संघ मैदानात उतरला होता तर मालिकेवरील वर्चस्व कायम राखण्यास इंग्लंडचा संघ उत्सुक होता. भारतीय संघाला अनुभवी हरमनप्रित कौरची कमी जाणवत होती. मागील दोन्ही सामन्यांत भारतीय संघाची फलंदाजी कमकुत ठरली होती त्यामुळे कर्णधार स्मृती मंधना, जेमिमाह रॉडरीग्स आणि मिथाली राजवर भारतीय फलंदाजीची जिम्मेदारी होती.

इंग्लंडची कर्णधार हेथर नाईटने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सलामीवीर डॅनियल वॅट आणि बिवमॉंटने इंग्लंडला आश्वसक सुरुवात करुन दिली होती. दोघीही चांगल्या लयीत दिसत होत्या. या दोघींनी ७.२ षटकांत ५१ धावांची सलामी दिली होती पण अनुजा पाटिलने वॅटला २४ धावांवर बाद करत इंग्लंडला पहिला धक्का दिला त्यानंतर पुनम यादवने सायवरला (०) आणि अनुजाने बिवमॉंटला बाद करत बिनबाद ५१ वरुन संघाची अवस्था ३ बाद ५४ झाली होती. त्यानंतर कर्णधार हेथर नाईट आणि अॅमी जोन्सने १९ धावांची भागिदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण त्या ही जास्त काळ टिकाव धरु शकल्या नाहीत. शेवटी डंकली (नाबाद १४) आणि शुब्रुसोलने (नाबाद १०) ७ व्या गड्यासाठी २६ धावांची भागिदारी करत इंग्लंडने २० षटकांत ११९ धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडकडुन बिवमॉंटने सर्वाधिक २९ धावा केल्या तर भारताकडुन अनुजा पाटिल आणि हर्लिन देओल प्रत्येकी २ गडी बाद केले.

इंग्लंडला ११९ धावांवर रोखण्यात भारतीय गोलंदाजांनी महत्त्वाची कामिगिरी केली होती आता भारतीय फलंदाजाना आपली कामगिरी निभावायची होती. पण दुसऱ्याच षटकांत भारताला हर्लिन देओलच्या रुपाने पहिला धक्का बसला त्यानंतर स्मृती मंधना आणि जेमिमाह रॉडरीग्स डाव सावरत भारताला ५० धावांचा पल्ला गाठुन दिला. मंधना आणि जेमिमाहने दुसऱ्या गड्यासाठी ४९ धावा जोडल्या यात जेमिमाहचा वाटा फक्त ११ धावांचा होता. स्मृती मंधना चांगल्या लयीत दिसत होती. त्यातच मंधनाने टी-२० क्रिकेटमधील ९ वे अर्धशतक झळकावले. पण अर्धशतक झळकावल्यानंतर मंधना मार्शच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाली आणि भारताला मोठा फटका बसला.

मंधना बाद झाली तेव्हा भारताला विजयासाठी ७ षटकांत ३३ धावांची आवश्यकता होती. मंधना बाद झाल्यानंतर भारतीय संघाची जिम्मेदारी मिताली राज आणि दिप्ती शर्मावर होती. पण दिप्ती ही जास्त वेळ मैदानावर टिकु शकली नाही. त्यानंतर मितालीने भारती फुलमाळीसोबत डाव सावरला. शेवटच्या षटकांत भारताला विजयासाठी ३ धावांची आवश्यकता होती. पण केट क्रॉसने टाकलेल्या या षटकांत पहिल्या ३ चेंडूवर भारतीला एकही धाव काढता आली नाही. आता भारतीय संघ दडपणात आला होता आणि पुढच्या दोन चेंडूवर भारती व अनुजा बाद झाली. आता भारताला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर ३ धावांची आवश्यकता होती पण शिखा पांडेला फक्त एक धाव काढता आली आणि भारताने हातातला सामना गमावला. मिताली राज ३० धावांवर नाबाद राहिली. एक धावेने सामना जिंकत इंग्लंडने टी-२० मालिका ३-० ने आपल्या खिशात घातली. भारताकडुन स्मती मंधनाने ५८ धावा केल्या तर इंग्लंडकडुन केट क्रॉसने सर्वाधिक २ गडी बाद केले. १८ धावांत २ गडी बाद करणाऱ्या केट क्रॉसला सामन्यांतील सर्वोत्तम खेळाडुच्या पुरस्काराने तर मालिकेत सर्वाधिक १२३ धावा करणाऱ्या डॅनियल वॅटला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडुच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

शंतनु कुलकर्णी  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *