विराट कोहलीचे शतक वाया, तीसऱ्या सामन्यांत ऑस्ट्रेलियाचा भारतावर ३२ धावांनी विजय!

सलग दोन सामन्यांत विजय मिळवत भारतीय संघाने मालिकेत २-० ने आघाडी घेतली होती त्यामुळे रांचीत होणाऱ्या तीसऱ्या सामन्यांत विजय मिळवुन मालिकेत विजयी आघाडी घेण्याच्या दृष्टीने भारतीय संघ मैदानात उतरला होता तर मालिकेतील आव्हान टिकुन ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलियाला विजय आवश्यक होता. विराट कोहलीने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाने मागच्या सामन्यांतील संघच कायम ठेवला होता तर ऑस्ट्रेलियाने संघात एक बदल करत नॅथन कुल्टर नाईलच्या जागी जेय रिचर्टसनला संघात स्थान दिले.

मागिल काही सामन्यांत अपयशी ठरत असलेल्या कर्णधार फिंच कडुन मोठ्या खेळीच अपेक्षा होती. मोहम्मद शमीने मागील सामन्यांप्रमाणेच सुरुवात केली होती पण यावेळेस फिंच आणि उस्मान ख्वाजाने सावध सुरुवात केली. खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर या दोघांनी भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. या दोघांपुढे रविंद्र जडेजा आणि कुलदिप यादवही अपयशी ठरले. बघता-बघता फिंच आणि ख्वाजाने आपापली अर्धशतके साजरी केली. या दोघांची भागिदारी भारतीय संघावरील दडपण वाढवत होते. पहिल्या दोन सामन्यांत शानदार कामगिरी केलेले भारतीय गोलंदाज आज मात्र अपयशी ठरत होते. फिंच व ख्वाजाच्या जोडीने धावगती ६ च्या  वर ठेवली होती. चांगल्या सुरुवातीनंतर फिंच आणि ख्वाजा आपल्या शतकाकडे आगेकुच करत होते. पण पुन्हा एकदा कुलदिप यादवने भारताला मोठे यश मिळवुन देत फिंचला ९३ धावांवर पायचित केले. फिंच बाद झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाने ३१.५ षटकांत १ बाद १९३ धावा केल्या होत्या.

      चागंल्या सुरुवातीनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ मोठ्या धावसंख्येकडे आगेकुच करत होता. ऑस्ट्रेलियाने मॅक्सवेलला बढती देत तीसऱ्या क्रमांकावर खेळण्यास धाडले. त्यात ख्वाजाने एकदिवसीय कारकिर्दीतले पहिले शतक झळकावले पण शतक झळकावल्यानंतर तो लगेच शमीच्या गोलंदाजीवर बुमराहकडे झेल देऊन परतला. त्यानंतर ठराविक अंतराने ऑस्ट्रेलियाने आणखी ३ गडी गमावले आणि ऑस्ट्रेलियाची अवस्था ४३.४ षटकांत ५ बाद २६३ झाली होती. एक वेळ ऑस्ट्रेलियाचा संघ ३४०-३५० पर्यंत धावा करेल असे दिसत होते पण भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या १० षटकांत धावांवर रोख लावला आणि ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत ५ गडी गमावत ३१३ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडुन उस्मान ख्वाजाने सर्वाधिक १०४ धावा केल्या तर भारताकडुन कुलदिप यादवने सर्वाधिक ३ गडी बाद केले.

      मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी भारतीय संघाला ३१४ धावा करायच्या होत्या. पण सलग तीसऱ्या सामन्यांत भारतीय सलामी जोडी सपशेल अपयशी ठरली. त्यानंतर पॅट कमिन्सच्या शानदार चेंडूवर अंबाती रायडुही त्रिफळाचीत झाला. ३१४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची अवस्था ६.२ षटकांत ३ बाद २७ झाली होती. आता भारतीय संघाची मदार कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीवर होती. या दोघांनी भारतीय संघाला अडचणीतुन बाहेर काढले. दोघेही चांगल्या लयीत दिसत होते. पण झंपाला मोठा फटका मारण्याच्या नादात धोनी २६ धावांवर त्रिफळाचीत झाला. धोनी आणि कोहलीने चौथ्या गड्यासाठी ५९ धावा जोडल्या. आता केदार जाधव आणि विजय शंकर कोहलीला कशी साथ देतात हे पाहण्यासारखे होते. धोनीनंतर मैदानात आलेल्या केदारने सावध पवित्रा घेतला होता पण विराट कोहली मात्र मागच्या सामन्यातील खेळीचाच पुढचा अंक लिहीत होता.

      विराट कोहलीने आपले ५० वे एकदिवसीय शतक झळकावले पण त्याने एक बाजू चांगल्या प्रकारे धरुन ठेवली होती. विराटने ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक गोलंदाजांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला होता त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार दडपणात आला होता. भागिदारी चांगली जमत असताना झंपाविरुद्ध स्विप मारण्याच्या नादात केदार २६ धावांवर पायचित झाला. केदार बाद झाला तेव्हा भारताला विजयासाठी ११० चेंडूत १४० धावांची आवश्यकता होती. मागच्या सामन्यांत महत्त्वाची खेळी केलेल्या विजय कडुन चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. त्यातच विराट कोहलीने एकदिवसीय कारकिर्दीतले ४१ वे शतक झळकावले. शतक झळकावल्यानंतरही कोहलीने आक्रमक पवित्रा कायम ठेवला होता. त्यातच झंपाविरुद्ध मोठा फटका मारण्याच्या नादात कोहली १२३ धावांवर त्रिफळाचीत झाला.

      कोहली बाद झाल्यानंतर शंकर आणि जडेजावर संघाची जिम्मेदारी होती पण छोट्या छोट्या अंतराने भारताने गडी गमावले. शेवटी ४९ व्या षटकांत पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर कुलदिप यादव बाद झाला आणि भारताचा डाव २८१ धावांत संपुष्टात आला. सामन्यांत ३२ धावांनी विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने मालिकेतील आव्हान टिकुन ठेवले आहे. भारताकडुन कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक १२३ धावा केल्या तर ऑस्ट्रेलियाकडुन पॅट कमिन्स, जेय रिचर्डसनने आणि झंपाने प्रत्येकी ३ गडी बाद केले तर नॅथन लायनने १ गडी बाद केला. सामन्यांत १०४ धावाची खेळी केलेल्या उस्मान ख्वाजाला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. मालिकेतील चौथा सामना १० मार्चला मोहाली येथे खेळविण्यात येणार आहे.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *