अतितटीच्या सामन्यांत भारताचा ८ धावांनी विजय, शतकवीर विराट कोहली ठरला सामनावीर!!

पहिल्या एकदिवसीय सामन्यांत धोनी आणि केदार जाधवच्या नाबाद १४१ धावांच्या भागिदारीने भारताला ६ गड्यांनी विजय मिळवुन देत ५ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी मिळवुन दिली. नागपुरमधल्या दुसऱ्या सामन्यांत विजय मिळवुन आघाडी वाढवण्याचा भारताचा प्रयत्न होता तर मालिकेत बरोबरी साधण्याच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियाचा संघ मैदानात उतरणार होता. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे शॉन मार्श संघात परतला होता त्यामुळे मधली फळी भक्कम झाली होती तर जेसन बेहरेनडॉर्फच्या जागी नॅथन लायनला संघात घेतले होते.

कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत पॅट कमिन्सने पहिल्याच षटकांत रोहित शर्माला बाद करत ऑस्ट्रेलियाला मोठे यश मिळवुन दिले होते. त्यानंतर धवन आणि कोहलीकडुन मोठ्या भागिदारीची अपेक्षा होती पण पुन्हा एकदा धवन अपयशी ठरला पण कोहलीने एक बाजू लावुन धरली होती. पहिल्या सामन्यांत अपयशी ठरलेल्या रायडुकडुन चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. कोहली व रायडुने डाव सांभाळला असे दिसत असताना रायडु १८ धावांवर लायनच्या गोलंदाजीवर पायचित झाला. रायडु बाद झाला तेव्हा भारताने १७ षटकांत ३ गडी गमावात ७५ धावा केल्या होत्या.

      २० षटकांच्या आत भारतीय संघाने ३ गडी गमावल्याने भारतीय संघ अडचणीत सापडला होता त्यामुळे महेंद्रसिंग धोनी, कोहलीला साथ द्यायला मैदानात येईल असे वाटत होते पण सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देत विजय शंकरला ५ व्या क्रमांकावर बढती देण्यात आली. आता मिळालेल्या संधीचा विजय कसा फायदा उठवतो याकडे सर्वांचे लक्ष होते. पण विजय ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांविरुद्ध दर्जेदार फटके खेळत होता आणि बघता-बघता कोहली -विजयची जोडी जमली. या दोघांनी धावगती ५ च्या पुढे ठेवली होती पण २९ व्या षटकांत कोहलीने मारलेल्या स्टेट ड्राईव्हवर चेंडू झंपाच्या हाताला लागुन यष्टिवर आदळला आणि विजय ४१ चेंडूत ४६ धावा काढुन धावबाद झाला. त्यानंतर ४ बाद १५६ वरुन भारतीय संघाची अवस्था ३२.२ षटकांत ६ बाद १७१ झाली होती. यात २ चेंडूत केदार आणि धोनीला बाद करत झंपाने महत्त्वाची भुमिका निभावली.

चांगल्या भागिदारीनंतर पुन्हा एकदा भारतीय संघ अडचणीत सापडला होता. आता भारतीय संघाची जिम्मेदारी पुर्णपणे कोहलीवर होती आणि त्याला जडेजाने योग्य साथ दिली. त्यातच कोहलीने एकदिवसीय कारकिर्दीतले ४० वे शतक झळकावले. कोहली आणि जडेजाच्या जोडीने ६७ धावा जोडल्या. जडेजा बाद झाल्यानंतर पुढील १२ धावांत भारताचा डाव २५० धावांत संपुष्टात आला. भारताकडुन कोहलीने सर्वाधिक ११६ धावा केल्या तर ऑस्ट्रेलियाकडुन पॅट कमिन्सने सर्वाधिक ४ गडी बाद केले.

कोहलीच्या शतकनंतरही भारतीय संघाला २५० धावांत रोखल्याने सामन्यांवर ऑस्ट्रेलियाने पकड मिळवली होती. मागिल काही सामन्यांत अपयशी ठरलेल्या कर्णधार अॅरॉन फिंचकडुन चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. फिंचने सावध पवित्रा घेतला होता तर दुसरीकडे उस्मान ख्वाजा चांगल्या लयीत दिसत होता आणि बघता-बघता या दोघांनी १४.३ षटकांत ८३ धावांची भागिदारी केली. कुलदिप यादवने फिंचला बाद करत भारताला पहिले यश मिळवुन दिले त्यानंतर पुढच्या षटकांत केदार जाधवने ख्वाजाला बाद करत ऑस्ट्रेलियाची अवस्था बिनबाद ८३ वरुन २ बाद ८३ झाली होती. झटपट २ गडी गमावल्यानंतर शॉन मार्श आणि पिटर हॅंडस्कॉम्बवर डाव सावरण्याची जिम्मेदारी होती. जोडी जमली असे वाटत असतानात जडेजाने मार्शला बाद केले. मार्श बाद झाल्यानंतर मैदानात आलेला ग्लेन मॅक्सवेल मोठे फटके खेळेल असे वाटत होते पण भारताच्या फिरकी गोलंदाजांनी मॅक्सवेल आणि हॅंडस्कॉम्बला रोखुन धरले होते. या जोडीला ४.३ षटकांत फक्त १० धावा काढता आल्या. कुलदिपने मॅक्सवेलला त्रिफळाचीत करत भारताला मोठे यश मिळवुन दिले.

      भारताच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना जखडुन ठेवले होते पण हॅंडस्कॉम्ब  आणि स्टॉयनिसने ऑस्ट्रेलियाला सामन्यांत टिकुन ठेवले होते. स्टॉयनिससोबत ३९ धावांची भागिदारी केल्यानंतर एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात जडेजाच्या थेट फेकीवर हॅंडस्कॉम्ब ४८ धावांवर बाद झाला. हॅंडस्कॉम्ब बाद झाल्यानंतर स्टॉयनिसने कुलदिप यादववर जोरदार हल्ला केला. त्यानंतर स्टॉयनिसने अॅलेक्स कॅरीसोबत महत्त्वाची ४७ धावांची भागिदारी करत ऑस्ट्रेलियाकडे सामना झुकवला होता पण कुलदिपने कॅरीला त्रिफळाचीत करत सामन्यांत रंगत आणली होती. त्यानंतरच्या षटकांत जसप्रित बुमराहने कुल्टर नाईल आणि पॅट कमिन्सला बाद करत ऑस्ट्रेलियावर दडपण आणले होते पण स्टॉयनिसने एक बाजु लावुन धरली होती त्यामुळे सामना अजुनही ऑस्ट्रेलियाच्या हातात होता. त्यातच त्याने ६ वे एकदिवसीय अर्धशतक झळकावले. शेवटच्या षटकांत ऑस्ट्रेलियाला ११ धावांची आवश्यकता होती पण शमी, बुमराह, कुलदिप यादव, जडेजाची सर्व षटके टाकुन झाली होती त्यामुळे शेवटच षटक कोण टाकेल याकडे सर्वांचे लक्ष होते पण कोहलीने सर्वांना धक्का देत विजय शंकरला शेवटचे षटक टाकण्याची संधी दिली आणि संधीचा पुरेपुर फायदा उठवत विजयने पहिल्याच षटकांत स्टॉयनिसला पायचित करत भारताला मोठे यश मिळवुन दिले आणि तीसऱ्या चेंडूवर झंपाला त्रिफळाचीत करत संघाला ८ धावांनी विजय मिळवुन दिला. या विजयासहं भारताने मालिकेत २-० ने आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाकडुन स्टॉयनिसने सर्वाधिक ५२ धावा केल्या तर भारताकडुन कुलदिप यादवने सर्वाधिक ३ गडी बाद केले. सामन्यांत ११६ धावांची खेळी केलेल्या विराट कोहलीला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

मालिकेतील तीसरा सामना ८ मार्चला रांची येथे खेळविण्यात येणार आहे.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *