गोलंदाजांच्या धडाकेबाज कामगिरीनंतर धोनी आणि केदार जाधवची शानदार अर्धशतके, भारताचा पहिल्या सामन्यांत ६ गड्यांनी विजय!!

टी-२० मालिका २-० ने गमावल्यानंतर विश्वचषकापुर्वीच्या शेवटच्या एकदिवसीय मालिकेत शानदार कामगिरी करण्यास भारतीय संघ उत्सुक होता तर टी-२० मालिकेतील कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास ऑस्ट्रेलियाचा संघ उत्सुक होता. टी-२० मालिकेत शानदार कामगिरी करण्याऱ्या के एल राहुलला अंतिम संघात स्थान मिळेल असेच सगळ्यांना वाटत होते. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचने नाणेफेक जिंकत फ्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या हार्दीक पांडयाच्या जागी विजय शंकरला संधी देण्यात आली तर यजुवेंद्र चहलला विश्रांती देत त्याच्या जागी रविंद्र जडेजाला संघात स्थान देण्यात आले. ऑस्ट्रेलियाकडुन एस्टोन टर्नर पदार्पणाचा सामना खेळत होता तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच एकदिवसीय कारकिर्दीतला १०० सामना खेळत होता.

      ऑस्ट्रेलियात झालेल्या मालिकेत शानदार कामगिरी केलेल्या मोहम्मद शमीने पहिलेच षटंक निर्धाव टाकले तर दुसऱ्याच षटकांत जसप्रित बुमराहने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचला शुन्यावर बाद करत ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. दुसऱ्याच षटकांत पहिला गडी गमावल्याने उस्मान ख्वाजा आणि मार्कस स्टॉयनिसने सावध पवित्रा घेतला होता. शमी एका शानदार लयीत दिसत होता. शमी आणि बुमराहनंतर कर्णधार विराट कोहलीने विजय शंकरला गोलंदाजीस आणले पण त्याच्या ३ षटकांत २२ धावा गेल्या. त्यानंतर भआगिदारी फोडण्यात पटाईत असलेल्या केदार जाधवने मार्कस स्टॉयनिसला बाद करत ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका दिला तेव्हा ऑस्ट्रेलियाने २०.१ षटकांत २ गडी गमावत ८७ धावा केल्या होत्या.

      स्टॉयनिस बाद झाल्यानंतर उस्मान खाव्जाने आपले अर्धशतक साजरे केले पण त्यानंतर लगेचच तो कुलदिप यादवच्या गोलंदाजीवर विजय शंकरकडे झेल देऊन परतला. १० धावांत २ गडी बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाचा संघ दडपणात आला होता आता संघाची जिम्मेदारी टी-२० मालिकेत शानदार कामगिरी केलेल्या ग्लेन मॅक्सवेल आणि पीटर हॅंडस्कॉम्बवर होती. ६.१ षटकांत ३६ धावांची भागिदारी करत दोघांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण कुलदिप यादवला पुढे सरसावत फटका मारण्याच्या नादात पीटर हॅंडस्कॉम्बवर यष्टिचीत झाला. ऑस्ट्रेलियाच्या डावाची अजुन २० षटके बाकी होती. पीटर हॅंडस्कॉम्बनंतर मॅक्सवेलने पदार्पणाचा सामना खेळणाऱ्याएस्टोन टर्नरसोबत भागिदारी करत धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न केला पण हा प्रयत्न मोहम्मद शमीने हाणुन पाडला. दोन षटकांत एस्टोन टर्नर आणि मॅक्सवेलला त्रिफळाचीत करत त्याने ऑस्ट्रेलियाच्या अडचणीत वाढ केली होती. आता तळाच्या फलंदाजांना झटपट बाद करेल असे दिसत होते पण अॅलेक्स कॅरीआणि नॅथन कुल्टर नाईलने भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीवर पाणी फेरले. या दोघांनी ७ व्या गड्यासाठी १० षटकांत ६२ धावा करत संघाला २३६ पर्यंत पोहचवण्यात मोलाची कामिगीरी केली. ऑस्ट्रेलियाकडुन उस्मान ख्वाजाने सर्वाधिक ५० धावा केल्या तर भारताकडुन मोहम्मद शमी, कुलदिप यादव आणि जसप्रित बुमराने प्रत्येकी २ गडी बाद केले.

      २३७ धावा तश्या जास्त नव्हत्या पण पॅट कमिन्स, नॅथन कुल्टर नाईल, अॅडम झंपा आणि जेसन बेहरेनडॉर्फ भारतीय संघाला अडचणीत आणु शकत होते. दुसऱ्या टी-२० सामन्यांत विश्रांती दिल्या नंतर रोहित शर्मा पुन्हा एकदा धवनसोबत सलामीला आला होता पण दुसऱ्याच कुल्टर नाईलने धवनला बाद करत भारताला पहिला झटका दिला. त्यानंतर रोहित आणि कोहलीच्या जोडीला सहजपणे धावा मिळत नव्हत्या पण त्यानंतर दोघांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आणि बघता-बघता दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी ७४ धावा जोडल्या. १७ व्या षटकांत झंपाने कोहलीला पायचित करत भारताला मोठा धक्का दिला. त्यानंतरच्या १९ धावांत ऑस्ट्रेलियाने रोहित शर्मा आणि रायडुला बाद करत भारतीय संघाची अवस्था २३.३ षटकांत ४ बाद ९९ केली होती.

      रोहित – कोहलीच्या भागिदारीनंतर भारतीय संघ अडचणीत सापडला होता. आता भारतीय संघाचा डाव सांभाळण्याची जिम्मेदारी धोनी आणि केदार जाधववर होती. या दोघांनी सुरुवातीला खेळपट्टीवर टिकण्यावार भर दिला पण त्यानंतर दोघंही सहज धावा काढत होते त्यामुळे धावगती आवक्यात होती. ४३ व्या षटकांत केदार जाधवने एकदिवसीय कारकिर्दीतले ५ वे अर्धशतक झळकावले. आता भारतीय संघ किती षटके राखुन विजय मिळवतो याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यातच धोनीनेही ७१ वे अर्धशतक झळकावले. भारताला विजयासाठी ५ धावांची अवश्यकता असताना धोनी दोन चौकार मारत भारताला ६ गडी राखुन विजय मिळवुन दिला आणि भारताने ५ एकदिवसीय मालिकेत १-० ने आघाडी घेतली. भारताकडुन केदार जाधव ८१ धावावंर तर धोनी ५९ धावांवर नाबाद राहिला. या दोघानी ५ गड्यासाठी १४१ धावा जोडल्या. ऑस्ट्रेलियाकडुन कुल्टर नाईल आणि झंपाने प्रत्येकी २ गडी बाद केले. सामन्यांत १ गडी आणि नाबाद ८१ धावांची खेळी केलेल्या केदार जाधवला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. मालिकेतील दुसरा सामना ५ मार्च रोजी नागपुर येथे खेळविण्यात येणार आहे.

शंतनु कुलकर्णी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *