मुजीब उर रहेमान आणि दौलत झदरानच्या गोलंदाजीसमोर आर्यलॅंडचा १६१ धावात खुर्दा, अफगाणिस्तानचा ५ गड्यांनी विजय!!

तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत अफगाणिस्तानने आर्यलॅंडचा ३-० ने पराभव करत मालिकेवर आपला कब्जा केला होता. त्यामुळे एकदिवसीय मालिकेपुर्वी अफगाणिस्तानच्या खेळाडुंचा आत्मविश्वास वाढला होता. एकदिवसीय मालिकेत फिरकी गोलंदाजाची भुमिका महत्त्वाची ठरणार होती त्यामुळे रशिद खान, मुजीब उर रहेमान आणि मोहम्मद नबीची फिरकी तिकडी आर्यलॅंडसमोर मोठे आव्हान निर्माण करेल असे दिसत होते. आर्यलॅंडचा कर्णधार विलियम पोर्टरफिल्डने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.

फलंदाजीला आलेल्या कर्णधार विलियम पोर्टरफिल्ड आणि पॉल स्टर्लिंगकडुन मोठ्या सलामीची अपेक्षा होती पण दुसऱ्याच षटकांत मुजीब उर रहेमानने पोर्टरफिल्डला त्रिफळाचीत करत अफगाणिस्तानला पहिला झटका दिला. त्यानंतर मुजीब व दौलत झदरानने आर्यलॅंडच्या फलंदाजांना सहज धावा दिल्या नाहीत आणि त्यातच मुजीबने ८ व्या षटकांत बलर्बिनी आणि मॅक्युलोमला बाद करत आर्यलॅंडची अवस्था ८ षटकांत ३ बाद १४ केली होती. आता संघाची जिम्मेदारी स्टर्लिंग व केविन ओब्रायनवर होती. पण ओब्रायनही जास्त काळ टिकु शकला नाही आणि बघता – बघता आर्यलॅंडची अवस्था ३०.२ षटकांत ६ बाद ६९ झाली होती.

शंभर धावांच्या आत ६ गडी गमावल्याने आर्यलॅंडचा संघ दबावात आला होता. एका बाजूने गडी बाद होत होते तर स्टर्लिंगने एक बाजू लावुन धरली होती. तळाच्या फलंदाजांना सोबत घेऊन स्टर्लिंग किती धाव जोडतो याकडे सर्वांचे लक्ष होते. स्टर्लिंगने १०५ चेंडूत १७ वे एकदिवसीय अर्धशतक साजरे केले. डॉकरेल चांगल्या लयीत दिसत होता आणि हळुहळु स्टर्लिंग व डॉकरेलची जोडी संघाचा डाव पुढे नेत होती. स्टर्लिंग व डॉकरेलने ७ व्या गड्यासाठी ७६ धावा जोडल्या पण रशिद खानने डॉकरेलला ३७ धावांवर त्रिफळाचीत करत अफगाणिस्तानला मोठे यश मिळवुन दिले आणि आर्यलॅंडचा संघ १६१ धावांत संपुष्टात आला. स्टर्लिंग बाद होणारा शेवटचा फलंदाज होता. आर्यलॅंडकडुन स्टर्लिंगने सर्वाधिक ८९ (१५०) धावा केल्या तर अफगाणिस्तानकडुन मुजीब उर रहेमान आणि दौलत झदरानने प्रत्येकी ३ गडी बाद केले.

      १६२ धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या मोहम्मद शेहजाद आणि हजरत झदाईने सावध सुरुवात करत पहिल्या गड्यासाठी १२.३ षटकांत ४३ धावा जोडल्या. झजाई २५ धावांवर बाद झाल्यानंतर शेहजादने रेहमत शहाला सोबत घेत लक्षाकडे आगेकुच सुरु ठेवली होती. एक मोठी भागिदारी अफगाणिस्तानला विजय मिळवुन देण्यासाठी पुरेशी होती पण रॅकिनने दोन तर सिमा सिंगने एक गडी बाद करत अफगाणिस्तानची अवस्था १ बाद ९० वरुन ४ बाद १०४ झाली होती. झटपट ३ गडी बाद केल्याने आर्यलॅंडने सामन्यांत परतण्याचा प्रयत्न केला पण त्यावर गुलबादिन नैब व कर्णधार असगर अफगाणच्या जोडीवर पाणी फेरले. या दोघांनी ५ व्या गड्यासाठी ४९ धावा जोडल्या पण महत्त्वाचे म्हणजे या भागिदारीत असगर अफगाणचा वाट होता फक्त ७ धावांचा. ही जोडीच अफगाणिस्तानला सामना जिंकुन देईल असे दिसत होते पण विजयासाठी ४ धावांची आवश्यकता असताना गुलबादिन नैब ४६ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या नजिबुल्लाह झदराने ३ चेंडूत २ षटकांर मारत संघाला ५ गड्यांनी विजय मिळवुन देत ५ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. आर्यलॅंडकडुन रॅंकिनने सर्वाधिक २ गडी बाद केले. २ गडी व ४६ धावा अशी अष्टपैलु कामगिरी केलेल्या गुलबादिन नैबला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

मालिकेतील दुसरा सामना २ मार्च रोजी देहराडुन येथेच खेळविण्यात येणार आहे.

शंतनु कुलकर्णी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *