ग्लेन मॅक्सवेलच्या तडाख्यासमोर भारतीय गोलंदाजांती शरणागती, ऑस्ट्रेलियाने २-० ने मालिका जिंकली!!!!!

विशाखापट्टणम मध्ये झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यांत अटीतटीच्या सामन्यांत ऑस्ट्रेलियाने भारताचा ३ गड्यांनी पराभव करत दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती. त्यामुळे बंगळुरूमध्ये होणाऱ्या दुसऱ्या आणि शेवटच्या सामन्यांत भारतीय संघाचा पराभव करून भारतातील पहिली टी-२० मालिका जिंकण्याच्या इराद्याने ऑस्ट्रेलियाचा संघ मैदानात उतरला होता तर सामन्यांत विजय मिळवून मालिका बरोबरीत राखण्याच्या प्रयत्नात भारतीय संघ होता. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यांतील संघच कायम ठेवला होता तर भारतीय संघाने रोहित शर्मा, उमेश यादव आणि मयंक मार्कंडेयच्या जागी शिखर धवन, सिद्धार्थ कौल आणि विजय शंकरला संधी दिली.

पहिल्या सामन्यांत अर्धशतकी खेळी केलेल्या राहुलकडुन तश्याच कामगिरीची अपेक्षा होती. पहिली काही षटके ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी राहुल आणि धवनला सहजपणे धावा दिल्या नाहीत पण त्यानंतर राहुलने जोरदार प्रहार करत भारताला चांगली सुरुवात करुन दिली. एकीकडे राहुल चांगल्या लयीत दिसत होता तर दुसरीकडे धवनला एक-एका धावेसाठी झगडावे लागत होतं. राहुल व धवननी ६१ धावांची सलामी दिल्यानंतर राहुल ४७ धावांवर बाद झाला त्यानंतर पुढील १३ धावांत भारताने आणखी दोन फलंदाज गमावले.

१०.५ षटकांत भारतीय संघाची अवस्था ३ बाद ७४ झाली होती. आता भारतीय संघाची जिम्मेदारी पुर्णपणे कर्णधार कोहली आणि धोनीवर होती. १३ षटकांत भारताच्या फक्त ९० धावा झाल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघ १४०-१५० च्या आसपास पोहचेल असे दिसत होते. पण आधी धोनीने आणि नंतर कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दोघांनी खेळलेले आकर्षक फटके नजरेचे पारणे फेडणारे होते. बघता-बघता या जोडीने ८ षटकांत १०० धावांची भागिदारी केली. शेवटच्या षटकांत कमिन्सच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात धोनी ४० धावांवर बाद झाला. भारताने निर्धारित २० षटकांत ४ गडी गमावत १९० धावा केल्या तेव्हा कोहली ७२ तर कार्तिक ८ धावांवर नाबाद राहिले. ऑस्ट्रेलियाकडुन बेहरेडॉर्फ, डार्सी शॉर्ट, पॅट कमिन्स आणि नॅथन कुल्टर नाईलने प्रत्येकी १ गडी बाद केला.

१९१ धावांचा यशस्वी पाठलाग करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला चांगल्या सलामीची आवश्यकता होती तर भारतापुढे अडचण होती ती म्हणजे भारतीय संघ फक्त ५ गोलंदाजासहं खेळत होता त्यात विजय शंकरने न्युझिलंडच्या दौऱ्यात गोलंदाजी केली नव्हती. कोहलीने सर्वांनाच धक्का देत विजय शंकरकडे चेंडू सोपवला होता. मार्कस स्टॉयनिस आणि फिंचला बाद करत भारताने ऑस्ट्रेलियाला अडचणीत आणले होते. पण त्यानंतर डार्सी आणि मॅक्सवेलने धावफलक हलता ठेवत आणि धावगतीही आवाक्यात ठेवली होती.

सामन्यांत नाबाद ११३ धावांची खेळी तर मालिकेत १ शतक व १ अर्धशतकासह १६९ धावा करणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

      पहिल्या सामन्याप्रमाणेच मॅक्सवेल आणि डार्सीची जोडी भारताच्या अडचणी वाढवत होती. १२ व्या षटकांत विजयने डार्सीला बाद करत ही जोडी फोडत भारताला मोठे यश मिळवुन दिले होते. पण दुसऱ्या बाजूने मॅक्सवेल चहल, सिद्धार्थ कौल आणि क्रुणाल पांड्याच्या गोलंदाजीवर आक्रमण करत होता. मॅक्सवेल भारताच्या विजयातील मोठा अडथळा होता. पण मॅक्सवेलने सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकवला होता त्यातच मॅक्सवेलने आंतरराष्ट्रीय टी-२० मधील ३ रे शतक झळकावले. शेवटच्या दोन षटकांत ऑस्ट्रेलियाला १४ धावांची आवश्यकता होती. बुमराहने टाकलेल्या १९ व्या षटकांत ऑस्ट्रेलियाला ५ धावा काढता आल्या. आता शेवटचे षटंक टाकण्याची जिम्मेदारी होती ती कौलवर पण मॅक्सवेलने दोन चेंडू बाकी असतानाच ऑस्ट्रेलियाला ७ गड्यांनी विजय मिळवुन देत संघाला मालिकाही २-० ने मालिका जिंकुन दिली. २४ चेंडूत १४ धावांची धिमी खेळी आणि पंतने डार्सीचा सोडलेला झेल भारताला महागात पडला.

एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना २ मार्च रोजी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदान, उप्पल, हैद्राबाद येथे खेळविण्यात येणार आहे.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *