बुमराहच्या शानदार गोलंदाजीनंतरही पहिल्या टी-२० सामन्यांत भारताचा ३ गड्यांनी पराभव, कुल्टर नाईल ठरला सामनावीर

ऑस्ट्रेलिया व न्युझिलंडविरुद्धच्या यशस्वी दौऱ्यानंतर भारतीय संघ २०१९ च्या विश्वचषकापुर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटची मालिका खेळत आहे. विशाखापट्टणमच्या पहिल्या टी-२० सामन्यांत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाने शिखर धवनच्या जागी के एल राहुलला संधी दिली तर न्युझिलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत शानदार कामगिरी करणाऱ्या विजय शंकरला ही संघात स्थान मिळवण्यात अपयश आले. कुलदिप यादवच्या अनुपस्थित संघात स्थान मिळालेला मयंक मार्कंडेय पहिला टी-२० सामना खेळत होता तर विश्रांतीनंतर विराट कोहली आणि जसप्रित बुमराहचा संघात समावेश झाला होता त्यामुळे भारताची ताकद वाढली होती. तर ऑस्ट्रेलियाकडुन पीटर हॅंडस्कॉंम्ब पहिला टी-२० सामना खेळत होता.

सलामीला आलेल्या राहुलला पहिल्या षटकातील ४ चेंडूत एकही धाव काढता आली नाही पण नंतर त्याने आक्रमक पवित्रा घेतला होता त्यातच शॉर्ट लेगला मोठा फटका मारण्याच्या नादात रोहीत बाद झाला. विश्रांतीनंतर आलेल्या विराट कोहलीने राहुलच्या साथीने भारताचा डाव सावरला आणि या दोघांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या दोघांनी ऑस्टेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचला दबावात आणले होते. कोहली आणि राहुलच्या फटकेबाजीमुळे भारतीय संघ मोठ्या धावसंख्येकडे आगेकुच करत होता पण अॅडम झंपाला मोठा फटका मारण्याच्या नादात कोहली काउंटर नीलकडे झेल देऊन परतला.

कोहली बाद झाल्यानंतर संघाची जिम्मेदारी राहुल व पंतवर होती. पण त्यानंतर बेहरेनडॉर्फच्या शानदार क्षेत्ररक्षणामुळे पंत धावबाद झाला. त्यात खेळपट्टीवर स्थिरावलेल्या राहुलने टी-२० मधील ५ वे अर्धशतक झळकावले पण त्यानंतर लगेच तो बाद झाला आणि त्याच षटकांत कुल्टर नाईलने दिनेश कार्तिकला त्रिफळाचीत करत भारताची अवस्था १३ षटकांत ५ बाद ९४ केली होती. धोनीवर संघाची जिम्मेदारी आली होती पण त्याला हवी तशी साथ दुसऱ्या बाजूने मिळाली नाही. तसेच धोनीही मोठे फटके मारण्यात अपयशी ठरला. ८.४ षटकांत २ बाद ६९ या स्थितीतुन भारतीय संघ निर्धारीत २० षटकांत ७ गडी गमावत फक्त १२६ धावा काढल्या. भारताकडुन के एल राहुलने सर्वाधिक ५० धावा काढल्या. ऑस्ट्रेलियाकडुन काउंटर नीलने सर्वाधिक ३ गडी बाद केले.

      १२७ धावांचे लक्ष्य मोठे नव्हते त्यामुळे भारताला सुरुवातीला झटपट गडी बाद करण्याची आवश्यकता होती. बिग बॅश २०१८-१९ मध्ये मेलबर्न स्टार्सकडुन सलामीची भुमिका यशस्वीपणे पार पाडलेल्या मार्कस स्टॉयनिस, डार्सी शॉर्टसोबत सलामीला आला होता. दुसऱ्याच षटकांत कोहलीने यजुवेंद्र चहलला गोलंदाजीस आणत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. याच षटकांत स्टॉयनिस धावबाद झाला आणि त्यानंतर बुमराहने तीसऱ्या क्रमांकावर आलेल्या कर्णधार अॅरॉन फिंचला पायचित करत ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका दिला होता. २.१ षटकांत २ बाद ५ अशी अवस्था झाल्यानंतर आलेल्या मॅक्सवेलने आपल्या नेहमीच्या शैलीत सुरुवात केली होती आणि मॅक्सवेल व शॉर्टच्या फटकेबाजीने सामना भारताच्या हातातुन निसटताना दिसत होता. मॅक्सवेलने आपले अर्धशतक देखील साजरे केले पण चहलच्या गोलंदाजीवर चेंडूला सीमारेषेपार भिरकावण्याच्या प्रयत्नात मॅक्सवेल ५६ धावा काढुन बाद झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ३९ चेंडूत ३८ धावांची आवश्यकता होती.

      त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला सहज धावा दिल्या नाहीत आणि या दबावात ऑस्ट्रेलियाने आणखी २ गडी गमावले आणि ऑस्ट्रेलियाची अवस्था ५ बाद १०२ झाली होती. ऑस्ट्रेलिया संघाची जिम्मेदारी होती ती हॅंडस्कॉम्बवर. क्रुणाल पांड्या आणि मयंक मार्कंडेयने दोन शानदार षटके टाकल्यानंतर ऑस्ट्रेलियाला शेवटच्या २ षटकांत विजयासाठी १६ धावांची आवश्यकता होती. १९ वे षटक टाकलेल्या जसप्रित बुमराहने २ धावा देत २ गडी बाद करत सामना भारताच्या बाजूने झुकवला होता. आता शेवटच्या षटकांत १४ धावांची आवश्यकता होती तेव्हा मैदानात होते पॅक कमिन्स आणि जाय रिचर्डसन तर शेवटचे षटक टाकणार होता तो उमेश यादव. यातील पहिल्या ४ चेंडूत ८ धावा काढल्यानंतर ऑस्ट्रेलियाला मोठ्या फटक्याची आवश्यकता होती. त्यात कमिन्सने ५ व्या चेंडूवर चौकार तर शेवटच्या चेंडूवर २ धावा काढत ऑस्ट्रेलियाला सामना जिंकुन दिला आणि २ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. बुमराह, पांड्याने सामना भारताच्या बाजूने झुकवला होता पण कमिन्स व रिचर्डसनने त्यावर पाणी फेरले. ऑस्ट्रेलियाकडुन ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक ५६ धावा काढल्या तर भारताकडुन बुमराहने ३ गडी बाद केले. २६ धावांत ३ गडी बाद करणाऱ्या  कुल्टर नाईलला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना २७ फेब्रुवारी रोजी बेंगलोर येथे खेळविण्यात येणार आहे.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *