सुरंगा लकमलच्या तडाख्यानंतर मेंडीस आणि फर्नांडोची शानदार अर्धशतके, ८ गड्यांनी विजय मिळवत श्रीलंकेचा २-० ने मालिका विजय!

पहिल्या सामन्याप्रमाणेच दुसऱ्या सामन्यांतही श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची डाळ शिजली नाही आणि दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव फक्त २२२ धावांत संपुष्टात आला. त्यामुळे पहिल्या दिवसअखेर सामन्यांवर श्रीलंकेचं वर्चस्व होतं. पण दुसऱ्या दिवशी कगिसो रबाडा आणि ओलीवरच्या तडाख्या समोर निरोशन डिकवेला सोडता एकही फलंदाज  तग धरू शकला नाही आणि श्रीलंकेचा पहिला डाव १५४ धावांत संपुष्टात आला. श्रीलंकेकडून निरोशन डिकवेलाने सर्वाधिक ४२ धावा केल्या तर आफ्रिकेकडून रबाडाने ४ तर ओलीवरने ३ गडी बाद केले. पहिल्या डावात २२२ धावा केल्यानंतरही आफ्रिकेनी पहिल्या डावांत ६८ धावांची आघाडी घेत श्रीलंकेला बॅकफुट वर ढकलले होते.

पहिल्या डावात अपयशी ठरलेल्या डीन एल्गार आणि पहिल्या डावात ६० धावांची खेळी केलेल्या मार्कम कडून आफ्रिकेला चांगल्या सलामीची अपेक्षा होती पण श्रीलंकेच्या युवा गोलंदाजासमोर दोघेही अपयशी ठरले आणि आफ्रिकेची अवस्था २ बाद ३१ झाली होती त्यानंतर रजीथाने बवूमाला बाद करत आफ्रिकेच्या अडचणीत वाढ केली होती. आता आफ्रिकेच्या फलंदाजीची मदार कर्णधार डु प्लेसिस आणि हाशिम आमलावर होती. या दोघांनी डाव सावरत संघाची धावसंख्या १०० च्या जवळ नेऊन ठेवली. डु प्लेसिस आणि हाशिम आमलाची जोडी श्रीलंकेसाठी धोकादायक वाटत असताना धनंजय डी सिल्वाने आमलाला तर लकमाल ने डी कॉक ला बाद करत आफ्रिकेनी अवस्था ५ बाद ९१ केली होती. आता खालच्या क्रमांकावरील फलंदाजांना सोबत घेऊन डु प्लेसिस कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष होते. डु प्लेसिसने एक बाजू लावून धरली होती पण दुसऱ्या बाजूने त्याला योग्य साथ मिळाली नाही आणि लकमाल व धनंजय डी सिल्वा समोर आफ्रिकेचा डाव गडगडला. आफ्रिकेचा दुसरा डाव १२८ धावात संपुष्टात आला. आफ्रिकेकडून कर्णधार डु प्लेसिसने सर्वाधिक नाबाद ५० धावा काढल्या तर श्रीलंकेकडून लकमलने ४, धनंजय डी सिल्वाने ३, रजीथाने २ तर फर्नांडोने १ गडी बाद केला. सलग दोन डावात श्रीलंकेच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत संघाला सामन्यात टिकून ठेवले होते.

      मागच्या सामन्यांत श्रीलंकेने कुशल परेराच्या शतकाच्या बळावर ३०४ धावांचे आव्हाने यशस्वीरीत्या पार केले होते त्यामुळे आता १९७ धावांच आव्हान पार करण्यासाठी श्रीलंकेच्या खेळाडुंचा आत्मविश्वास वाढला होता. एक मोठी भागिदारी संघाला विजय मिळवुन देण्यास आवश्यक होती. १९७ धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या श्रीलंकेला सलामीवीर कर्णधार करुणारत्ने आणि थिरीमानेकडून चांगल्या सलामीचा अपेक्षा होती. या दोघांनी डेल स्टेन आणि कगिसो रबाडाचा यशस्वीपणे सामना पहिल्या गड्सासाठी ३२ धावा जोडल्या पण रबाडाने थिरीमानेला १० धावांवर तर ओलिवरने करुणारत्नेला १९ धावांवर बाद करत श्रीलंकेची अवस्था १०.१ षटकांत २ बाद ३४ केली होती. दोन झटपट गडी गमावल्यामुळे श्रीलंकेचा संघ थोडा दडपणात आला होता पण दुसऱ्या दिवसअखेर श्रीलंकेनी २ गडी गमावत ६० धावा केल्या होत्या.

      सामन्याचे अजुन तीन दिवस बाकी होते त्यामुळे श्रीलंकेल्या चांगल्या भागिदारीची आवश्यकता होती तर दक्षिण आफ्रिकेला झटपट गडी बाद करण्याची गरज होती. श्रीलंकेकडुन मैदानात होते कुसल मेंडीस आणि आपला दुसराच सामना खेळणार ओशिंदो फर्नांडो. पण या दोघांच्या चेहऱ्यावर कोणतेच दडपण दिसत नव्हते. या दोघांनी आफ्रिकेच्या प्रत्येक गोलंदाजांचा यशवस्वीपणे सामना करत दक्षिण आफ्रिकेला सामन्यांत संधी दिलीच नाही आणि बघता-बघता मेंडीसने कसोटी कारकिर्दीतले ९ वे तर फर्नांडोने पहिले कसोटी अर्धशतक झळकावले. डेल स्टेन, कगिसो रबाडा, ओलिवर, केशव महाराज यांसारख्या गोलंदाजांचा भरना असलेल्या आफ्रिकेच्या संघाला श्रीलंकेच्या युवा संघाने जोरदार धक्का देत ४६ व्या षटकांत महाराजाच्या गोलंदाजीवर एक धाव घेत फर्नांडोनी संघाला ८ गड्यांनी विजय मिळवुन दिला आणि श्रीलंकेनी २-० ने मालिका खिशात घातली. कुसल मेंडीसने नाबाद ८४ तर ओशिंदो फर्नांडोने नाबाद ७५ धावा केल्या. आफ्रिकेकडुन रबाडा आणि ओलिवरे प्रत्येकी १ गडी बाद केला.

दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकलेला श्रीलंकेचा संघ पहिला आशिया संघ ठरला. मॅथ्युज, चांदिमलच्या अनुपस्थितीत करुणारत्नेने यशस्वीरीत्या संघाचे नेतृत्व केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ०-२ ने पराभव स्विकारल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच देशात २-० ने धुळ चाळत श्रीलंकेनी मालिकेवर कब्जा केला. मागिल काही वर्षातील श्रीलंका आणि वेस्ट इंडीजची कसोटीतील कामगिरी पाहता दोन्ही संघानी आपला ठसा उमटवला आणि हे कसोटी क्रिकेटसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. दुसऱ्या डावात नाबाद ८४ धावांची खेळी करणाऱ्या कुसल मेंडीसला सामनावीर पुरस्काराने तर मालिकेत सर्वाधिक २२४ धावा आणि पहिल्या सामन्यांत १५३ धावांची नाबाद खेळी करणाऱ्या कुसल परेराला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

यानंतर ३ मार्च ते १६ मार्च दरम्यान श्रीलंकेचा संघ ५ एकदिवसीय सामने तर १९ मार्च ते २४ मार्च दरम्यांन ३ टी-२० सामने खेळणार आहे.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *