एकता बिष्ट आणि शिखा पांडेसमोर इंग्लंडची घसरगुंडी, पहिल्या सामन्यांच भारताचा इंग्लंडवर ६६ धावांनी विजय!!

न्युझिलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकल्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीस संघाचा आत्मविश्वास वाढला होता त्यामुळे भारत आणि इंग्लंडमधील मालिका रोमांचक होणार यात शंका नव्हती. पण मालिकेपुर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला कारण खांद्याच्या दुखापतीमुळे हरमनप्रित कौर संपुर्ण मालिकेला मुकणार होती. इंग्लंडची कर्णधार हेथर नाईटने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.

न्युझिलंडविरुद्धच्या मालिका विजयात महत्त्वाची भुमिका बजावणाऱ्या भारताच्या सलामीजोडी कडुन भारतीय संघाला पुन्हा एकदा चांगल्या सलामीची आवश्यकता होती. अपेक्षेनुसार जेमिमाह रॉडरीग्स आणि स्मृती मंधनाने भारताला शानदार सुरुवात करुन दिली. मंधना पेक्षा जेमिमाह जबरदस्त लयीत दिसत होती. बघता-बघता जेमिमाह आणि मंधनाने १५.१ षटकांत ६९ धावांची सलामी दिली पण १६ व्या षटकांत मंधना, इल्विसच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाली. मंधना नंतर जेमिमाहने दिप्ती शर्मासोबत १६ धावा जोडल्या पण त्यानंतर भारताचा डाव गडगडला आणि १० धावांत भारताने ४ गडी गमावले आणि भारताची अवस्था २२ षटकांत ५ गडी गमावत ९५ धावा केल्या होत्या.

आता भारताचा डाव सांभाळण्याची जिम्मेदारी कर्णधार मिताली राज आणि तानिया भाटियावर होती. या दोघींनी हळु-हळु डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण दोघींचा जम बसला असे दिसत असतानाच तानिया ४१ चेंडूत २५ धावा काढुन धावबाद झाली. तानियानंतर मिताली सुद्धा ४४ धावा काढुन बाद झाली. आता शेवटचे ४ फलंदाज किती धावांची भर घालतात याकडे सर्वांचे लक्ष होते. पण झुलन गोस्वामीने आपल्या अनुभवाचा उपयोग करत शिखा पांडेसोबत ८ व्या गड्यासाठी २३ धावांची तर शेवटच्या गड्यासाठी १३ धावांची भागिदारी केली. झुलन गोस्वामी (३०) बाद होणारी शेवटीच खेळाडु ठरली आणि भारताचा डाव ४९.४ षटकांत २०२ धावांत संपुष्टात आला. भारताकडुन कर्णधार मिताली राजने सर्वाधिक ४४ धावा केल्या तर इंग्लंडकडुन इल्विस, एक्सेलस्टोन आणि सायवरने प्रत्येकी २ गडी बाद केले.

२०३ धावांच आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडची अडखळती सुरुवात झाली. दुसऱ्याच षटकांत शिखा पांडेनी जोन्सला बाद करत इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर बेवमॉंट आणि साराह टेलरने सावध पवित्रा घेतला होता. पण भारताच्या गोलंदाजीसमोर त्यांचा टिकाव लागला नाही आणि इंग्लंडची अवस्था १३.२ षटकांत ३ बाद ३८ झाली होती. ३ बाद ३८ अशा बिकट स्थितीतुन बाहेर येण्यासाठी इंग्लंडला चांगल्या भागिदारीची आवश्यकता होती. याची जिम्मेदारी कर्णधार नाईट आणि सायवरने घेतली होती. दोघीही हळु-हळु लक्ष्याकडे आगेकुच करत होत्या त्यामुळे या दोघींची भागिदारी भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरताना दिसत होती.

      कर्णधार नाईट आणि सायवरच्या भागिदारीमुळे सामना भारताच्या हातातुन निसटताना दिसत होता पण ३१ व्या षटकांत सायवर ४४ धावांवर धावबाद झाली आणि इंग्लंडला मोठा धक्का बसला. पण त्यानंतर इंग्लंडची कोणतीच खेळाडु भारताच्या गोलंदाजीमसोर टिकाव धरु शकली नाही. ३ बाद १११ वरुन इंग्लंडचा डाव १३६ धावांत संपुष्टात, कर्णधार नाईट ३९ धावांवर नाबाद राहिली आणि भारताने ६६ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० ने आघाडी घेतली. भारताकडुन एकता बिष्टने सर्वाधिक ४ गडी बाद केले. भारताच्या विजयात महत्त्वाची भुमिका बजावणाऱ्या एकता बिष्टला सामन्यांतील सर्वोत्कृष्ट खेळाडु म्हणुन गौरविण्यात आले.

मालिकेतील दुसरा सामना २५ फेब्रुवारी रोजी मुंबईत खेळविला जाणार आहे.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *