गोलंदाजीच्या बळावर मेलबर्न रेनिगेड्सची विजेतेपदाला गवसणी, डॅनियल ख्रिस्टियन ठरला सामनावीर

उपांत्य फेरीत ग्लेन मॅक्सवेलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मेलबर्न स्टार्सने २०१७-१८ चा उपविजेता होबार्ट हरीकेन्सचा पराभव करत दुसऱ्यांदा बिग बॅश लिगच्या अंतिम फेरीत धडक मारली होती तर तर मेलबर्न रेनिगेड्सने सिडनी सिक्सर्सचा पराभव करत पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली होती. मेलबर्न स्टार्सचा कर्णधार ग्लेन मॅक्सवेलने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मेलबर्न रेनिगेड्सने उपांत्य फेरीतील संघ कायम ठेवला होता तर मेलबर्न स्टार्सने एक बदल करत इवान गुल्बीसच्या जागी जॅक्सन बर्डचा समावेश केला होता.

मेलबर्न रेनिगेड्सचे सलामीवीर मार्कस हॅरिस आणि कर्णधार एरॉन फिंचकडुन संघाला चांगल्या सलामीची अपेक्षा होती. दुसऱ्या षटकांत हॅरिसने आक्रमक फटके खेळले पण त्याच षटकांत जॅक्सन बर्डच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात हॅरिस १२ धावांवर बाद झाला त्यानंतर बर्डनेच सॅम हार्परला बाद करत रेनिगेड्सची अवस्था ३.४ षटकांत २ बाद २५ केली होती. त्यानंतर कर्णधार फिंच आणि कॅमरुन व्हाईटने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण ते ही अपयशी ठरले आणि बघता-बघता रेनिगेड्सची अवस्था १०.२ षटकांत ५ बाद ६५ झाली होती. १०० धावांच्या आत ५ गडी गमावल्याने रेनिगेड्सचा संघ दडपणात आला होता आणि रेनिगेड्सची मदार पुर्णपणे टॉम कुपर आणि डॅनियल ख्रिस्टियनवर होती.

झटपट ५ गडी बाद झाल्याने टॉम कुपर आणि डॅनियल ख्रिस्टियनने भागिदारी बनवण्यावर भर देत रेनिगेड्सने १६ व्या षटकांत १०० धावांचा टप्पा पार केला. शेवटच्या ४ षटकांत रेनिगेड्सचा संघ किती धावा करतो याकडे सर्वांचे लक्ष होते. १७ व्या षटकांत या जोडीने ११ धावा काढल्या पण त्यानंतरच्या षटकांत ड्वेन ब्राव्होने शानदार गोलंदाजी करत फक्त ३ धावा दिल्या. स्टार्सचा संघ रेनिगेड्सला १४० धावांच्या आत रोखेल असे दिसत होते पण कुपरने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर रेनिगेड्सने २० षटकांत ५ गडी गमावत १४५ धावा केल्या. कुपर ४३(३५) तर ख्रिस्टियन ३८(३०) धावांवर नाबाद राहिले. या दोघांनी ८० धावांची भागिदारी केली. स्टार्सकडुन जॅक्सन बर्ड आणि एडम झंपाने प्रत्येकी २ गडी बाद केले. संदिप लामिछानेने शानदार गोलंदाजी केली पण तो गडी बाद करणात अपयशी ठरला.

      अंतिम सामन्यांत रेनिगेड्सला १४५ धावांवर रोखल्याने सामन्यांवर पुर्णपणे स्टार्सचे वर्चस्व होते. आता फक्त स्टार्सला चांगल्या सुरुवातीची आवश्यकता होती. सलामीवीर बेन डंक आणि मार्कस स्टॉयनिसने संघाला शानदार सुरुवात करुन दिली. या जोडीने रेनिगेड्सच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत ७.४ षटकांत बिनबाद ५० धावा जोडल्या. स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणारा केन रिचर्डसन देखील त्यांच्यासमोर फिका पडला. या जोडीने आवश्यक धावगती आवाक्यात ठेवली होती. १२ व्या षटकांत केन रिचर्डसनला एक शानदार चौकार मारत बेन डंकने अर्धशतक झळकावले. सामना एकतर्फी होतो की काय असे दिसत असताना स्टॉयनिस कॅमरुन बॉइसला मोठा फटका मारण्याच्या नादात त्रिफळाचीत झाला तेव्हा स्टार्सने १ गडी गमवत ९३ धावा केल्या होत्या.

      स्टार्सला विजयासाठी ४२ चेंडूत ५३ धावांची आवश्यकता होती आणि त्यांचे अजुन ९ गडी शिल्लक होते. पण पुढील ३.१ षटकांत रेनिगेड्सच्या गोलंदाजांनी ६ धावा देत ३ गडी बाद करत स्टार्सची अवस्था १५.१ षटकांत ४ बाद ९९ केली होती. त्यातही जम बसलेला बेन डंकही ५७ धावा काढुन माघारी परतला होता. आता स्टार्सची भिस्त निक मॅडीसन, सेब गोच आणि ड्वेन ब्राव्होवर होती पण तेही सपशेल अपयशी ठरले आणि स्टार्सचा डाव गडगडला.  बिनबाद ९३ वरुन स्टार्सची अवस्था १७.५ षटकांत ७ बाद ११२ झाली होती. त्यामुळे मधली फळी पुर्णपणे अपयशी ठरल्यामुळे स्टार्सच्या हातातुन सामना निसटला. एडम झंपा १० चेंडूत १७ धावांची खेळी केली खरी पण तो संघाला पराभवापासुन वाचवु शकला नाही आणि मेलबर्न स्टार्सचा १३ धावांनी पराभव करत मेलबर्न रेनिगेड्सने विजेतेपदाला गवसणी घातली. मेलबर्न स्टार्सकडुन बेन डंकने सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली. मेलबर्न रेनिगेड्सकडुन ख्रिस ट्रिमॅन, कॅमरुन बॉइस आणि डॅनियल ख्रिस्टियने प्रत्येकी २ गडी बाद केले तर हॅरी गुर्नेने १ गडी बाद केला. सामन्यांत नाबाद ३८ धावा आणि २ गडी बाद करणाऱ्या डॅनियल ख्रिस्टियनला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

बीग बॅश लिग २०१८-१९

संघाच्या सर्वाधिक धावा – होबार्ट हरीकेन्स १९६/३ (१९.१) वि. सिडनी थंडर्स

निच्चांकी धावसंख्या सिडनी सिक्सर्स ७४ वि. मेलबर्न स्टार्स

सर्वाधिक धावा – डार्सी शॉर्ट (होबार्ट हरीकेन्स) ६३७ धावा

सर्वाधिक बळी – केन रिचर्डसन (मेलबर्न रेनिगेड्स) २४ बळी

सर्वोच्च धावा – कॅलम फर्ग्युसन (सिडनी थंडर्स) नाबाद ११३ धावा

सर्वात मोठी भागिदारी – जोश फिलिपे व जेम्स विन्स (सिडनी सिक्सर्स) नाबाद १६७ धावा वि. होबार्ट हरीकेन्स

सामन्यांत सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचे पृथ्थकरण – जोश ललोर (ब्रिसबेन हिट) ५/२६ वि. सिडनी सिक्सर्स

सर्वाधिक झेल व यष्टिचीत – जोश फिलिपे (सिडनी सिक्सर्स) ९ झेल ३ यष्टिचीत

सर्वाधिक झेल – ग्लेन मॅक्सवेल (मेलबर्न स्टार्स) १६ झेल

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *