कुसल परेराच्या शानदार नाबाद १५३ धावांमुळे श्रीलंकेचा दक्षिण आफ्रिकेवर १ गड्याने विजय, श्रीलंकेची मालिकेत १-० ने आघाडी

३०४ धावांचा पाठलाग करताना तीसऱ्या दिवसअखेर श्रीलंकेची अवस्था ३ बाद ८३ झाली होती. त्यामुळे श्रीलंका संघाची पुर्णपणे कुसल परेरा, निरोशन डिकवेला आणि धनंजय डी सिल्वावर होती. श्रीलंकेच्या युवा खेळाडुंसमोर  दक्षिण आफ्रिकेच्या तगड्या गोलंदाजांच मोठं आव्हान होतं. पहिल्या डावात श्रीलंकेच्या फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले होते त्यामुळे श्रीलंकेचे फलंदाज किती प्रतिकार करतात याकडे सर्वांचे लक्ष होते. दुखापतीमुळे वेरॉन फिलॅंडर चौथ्या दिवशी मैदानावर उतरला नव्हता त्यामुळे आफ्रिकेला चार गोलंदाजांसहच मैदानावर उतरावे लागणार होते.

चौथ्या दिवशी डेल स्टेनने पहिलाच सामना खेळणाऱ्या ओशाद फर्नांडोला ३७ धावांवर बाद करत श्रीलंकेला पहिला धक्का दिला आणि दोन चेंडूनंतर डीकवेलाला (०) बाद करत श्रीलंकेची अवस्था ५ बाद ११० केली होती. दोन गडी झटपट गमावल्याने श्रीलंकेचा संघ दबावात सापडला होता आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ सहज सामना जिंकेल असेच वाटत होते. पण कुसल परेरा आणि धनंजय डी सिल्वाने हळुहळु धावा जोडत संघाला सामन्यांत टिकुन ठेवले. त्यानंतर सलग दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी केली. त्याच्या खेळीत कोणताच दबाव जाणवत नव्हता आणि हाच आत्मविश्वास डी सिल्वाच्या खेळीतही जाणवु लागला होता. बघता-बघता दोघांनी दक्षिण आफ्रिकेच्या तगड्या गोलंदाजीचा यशस्वीपण सामना केला.

परेरा – डी सिल्वाची भागिदारीने दक्षिण आफ्रिकेवर दबाव वाढवला होता. डी सिल्वा आपल्या ६ व्या अर्धशतकाकडे आगेकुच करत होता पण केशव महाराजने डी सिल्वाला ४८ धावांवर बाद करत श्रीलंकेला ६ वा धक्का दिला तेव्हा श्रीलंकेनी ६ गडी गमावत २०६ धावा केल्या होत्या. परेरा आणि डी सिल्वाने ६ व्या गड्यासाठी ९६ धावा जोडल्या होत्या त्यामुळे श्रीलंकेला एखादी भागिदारी विजयासमीप नेऊ शकत होती पण पुढच्या २० धावात श्रीलंकेचे आणखी ३ गडी बाद करत दक्षिण आफ्रिकेनी सामन्यांवर वर्चस्व निर्माण केले होते. श्रीलंकेचा संघ ९ बाद २२६ अशा अडचणीत होता आणि परेरासोबत ११ व्या क्रमांकावरील विश्वा फर्नांडो मैदानात होता.

      परेराने १४६ चेंडूत कसोटी कारकिर्दीतले दुसरे शतक साजरे केले पण अजुनही श्रीलंकेला विजयासाठी ६४ धावांची आवश्यकता होती. ११ व्या क्रमांकावरील फलंदाजसोबत असल्याने परेराने फर्नांडोला प्रत्येक षटकांच्या ५ व्या अथवा ६ व्या चेंडूवर फलंदाजीस आणत होता. दुसऱ्या बाजूने परेरा शानदार फलंदाजी करत होता. त्याने डेन स्टेन, कागिसो रबाडा या तगड्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आणि बघता-बघता परेराने एकतर्फी विजय खेचुन आणला होता. रबाडाच्या गोलंदाजीवर चौकार मारत परेराने १५० चा टप्पा ही पार करत श्रीलंकेला १ गड्यानी विजय मिळवुन दिला. या विजयासह श्रीलंकेनी दोन सामन्यांच्या मालिकेच १-० ने आघाडी घेतली. २०११-१२ नंतर पहिल्यांदाच श्रीलंकेनी दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामना जिंकला तर मागिल ७ वर्षांतील श्रीलंकेचा आशिया बाहेरचा तीसरा कसोटी विजय आहे. परेरा आणि फर्नांडोनी शेवटच्या गड्यासाठी ७८ धावा जोडल्या. दक्षिण आफ्रिकेकडुन केशव महाराजने ३, ड्युयन ओलिवर व डेल स्टेनने प्रत्येकी २ तर वेरॉन फिलॅंडर व कागिसो रबाडाने प्रत्येकी १ गडी बाद केला. सामन्यांत ५१ आणि नाबाद १५३ धावांची खेळी करणाऱ्या कुसल परेराला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. मालिकेतील दुसरा आणि शेवटचा २१ फेब्रुवारी रोजी पोर्ट एलिझाबेथ येथे खेळविणात येणार आहे.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *