गोलंदाजांच्या कामगिरीनंतर गुप्टिलचे शानदार शतक, न्युझिलंडची मालिकेत २-० ने विजयी आघाडी

पहिल्या सामन्यांत ८ गड्यांनी विजय मिळवल्यानंतर न्युझिलंडने मालिकेत १-० ने आघाडी घेतली होती. त्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत टिकुन राहण्यासाठी बांग्लादेशला विजय आवश्यक होता तर न्युझिलंडचा संघ मालिका खिशात घालण्याच्या हेतुने मैदानात उतरणार होता. न्युझिलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकत बांग्लादेशला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले होते. न्युझिलंडने संघाता एक बदल करत मिशेल सॅंटनरच्या जागी टोड अॅस्टलला संधी दिली होती. बांग्लादेशचा यष्टिरक्षक मुशफिकर रहिमसाठी हा २०० एकदिवसीय सामना होता. त्यामुळे या सामन्यांत तो कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष होते.

बांग्लादेश प्रिमीयर लीग मध्ये शानदार कामगिरी करणारा तमिम इक्बाल मॅट हेनरी व ट्रेंट बोल्ट समोर चाचपडताना दिसत होता आणि पहिल्या सामन्यांप्रमाणे या सामन्यांतही बांग्लादेशच्या सलामीवीरांना झटपट माघारी धाडत न्युझिलंडच्या गोलंदाजांनी संघाला धडाक्यात सुरुवात करुन दिली होती. झटपट गडी गमावल्यानं बांग्लादेशची धावगती सुद्धा कमी होती. त्यानंतर सौम्य सरकार व मुशफिकर रहिमने थोडा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण ते ही जास्त वेळ टिकु शकले नाहीत आणि बांग्लादेशची अवस्था २०.५ षटकांत ५ बाद ९३ झाली होती.

नंतर पहिल्या सामन्यांतील अर्धशतकवीर मोहम्मद मिथुन आणि शब्बीर रहमानने डाव सावरत संघाची धावसंख्या १५० च्या पार नेली होती. या जोडीन ६ व्या गड्यासाठी ७४ धावांची भागिदारी केली. दोघेही चांगल्या लयीत दिसत होते पण अर्धशतक झळकावल्यानंतर लगेच मिथुन (५७) टोड अॅस्टलच्या गोलंदाजीर त्रिफळाचीत झाला आणि बांग्लादेशचा संघ पुन्हा एकदा अडचणीत सापडला होता. तळाच्या फलंदाजांनी काही छोट्या खेळी केल्या पण ४९.४ षटकांत बांग्लादेशचा डाव २२६ धावांत संपुष्टात आला. बांग्लादेशकडुन मोहम्मद मिथुनने सर्वाधित ५७ तर शब्बीर रहमान ने ४३ धावा केल्या. न्युझिलंडकडुन लॉकी फर्गुसनने ३, टोड अॅस्टन व जेमी निशमने प्रत्येकी २ तर कॉलीन डी ग्रॅंडहोम, मॅट हेनरी आणि ट्रेंट बोल्टने प्रत्येकी १ गडी बाद केला.

बांग्लादेशला २२६ धावांत रोखल्याने सामन्यांवर पुर्णपणे न्युझिलंडचे वर्चस्व होते. त्यातही पहिल्या सामन्यांत नाबाद शतकी खेळी केलेल्या मार्टिन गुप्टीलकडुन तश्याच कामगिरीची अपेक्षा होती. सलामीवीर मार्टिन गुप्टिल व हेनरी निकोल्सने संघाला शानदार सुरुवात करुन दिली. पण पहिल्या सामन्यांत शतक झळकावल्यामुळे गुप्टिलचा आत्मविश्वास चांगलाच वाढला होता आणि हे त्याच्या फलंदाजीतुन दिसुन येत होते. ४५ धावांची सलामी दिल्यानंतर निकोल्स १४ धावांवर मुस्तफिजुर रहेमानच्या गोलंदाजीवर बाद झाला. निकोल्स बाद झाल्यानंतरही गुप्टिलने आक्रमक पवित्रा कायम ठेवली होती. एकीकडे गुप्टिलने आक्रमक पवित्रा घेतला होता तर विल्यमसन सावध खेळ होता. ३३ चेंडूत अर्धशतक साजरे करत गुप्टिलने आपले इरादे स्पष्ट केले होते. बघता-बघता गुप्टिल-विल्यमसनची भागिदारी बांग्लादेशसाठी धोकादायक ठरताना दिसत होती. न्युझिलंडने १७.२ षटकांत १०० धावांचा टप्पा पार करत सामना पुर्णपणे आपल्याकडे वळवला होता. गुप्टिलचा आक्रमक पवित्रा पाहतो तो लवकर सामना संपवण्याच्या तयारीत होता. ७६ चेंडूत शतकी खेळी करत गुप्टिलने एकदिवसीय क्रिकेटमधील १६ वे शतक झळकावले.

      गुप्टिल- विल्यमसनची जोडीच न्युझिलंडला सामना जिंकुन देईल असे दिसत असताना मुस्तफिजुर रहेमानने गुप्टिलला ११८ (८८) बाद केले पण तो पर्यंत फार उशिर झाला होता. गुप्टिल व विल्यमसनने दुसऱ्या गड्यासाठी १४३ धावांची भागिदारी करत बांग्लादेशला सामन्यांत परतण्याची संधीच दिली नाही. गुप्टिल बाद झाल्यांनतर विल्यमसनने ३७ वे अर्धशतक साजरे केले आणि ३६.१ षटकांत संघाला ८ गड्यांनी विजय मिळवुन दिला. विल्यमसलन ६५ तर रॉस टेलर २१ धावांवर नाबाद राहिले. या विजयासह न्युझिलंडने ३ सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली. बांग्लादेशकडुन मुस्तफिजुर रहेमानने २ गडी बाद केले. न्युझिलंडकडुन ११८ धावांची खेळी करणाऱ्या मार्टिन गुप्टीलला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. मालिकेतील तीसरा आणि शेवटचा सामना २० फेब्रुवारी रोजी ड्युनेडीन येथे खेळविण्यात येणार आहे.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *