हनुमा विहारीच्या ११४ आणि मयंक अगरवालच्या ९५ धावांनंतरही शेष भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३३० धावा

सलग दोन वर्षे रणजी चषक जिंकल्यानंतर इराणी चषकात विदर्भचा सामना होता तो अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या शेष भारत संघाशी. शेष भारत संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेनी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. २०१८ च्या इराणी चषकाच्या सामन्यांत २८६ धावांची खेळी केलेला वासिम जाफर आणि उमेश यादव दुखापतीमुळे या सामन्यांत खेळणार नव्हते हा विदर्भासाठी मोठा धक्का होता.

      शेष भारतीय संघाकडुन फलंदाजीला आलेल्या मयंक अगरवाल व अनमोलप्रित सिंगने संघाला चांगली सुरुवात करुन देत ४६ धावांची सलामी दिली. अनमोलप्रित सिंग (१५) बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या हनुमा विहारीने मयंक अगरवालसोबत संघाचा डाव सावरला. मयंक व विहारी मध्ये मयंक जास्त आक्रमक दिसत होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत पदार्पण केलेला मयंक अगरवाल आपल्या ९ व्या प्रथम श्रेणी शतकाकडे आगेकुच करत होता पण यश ठाकुरने मयंकला ९५ धावांवर बाद करत मयंक व विहारीची १२५ धावांची भागिदारी फोडली. मयंक बाद झाला तेव्हा शेष भारताने ३८.३ षटकांत २ गडी गमावत १७१ धावा केल्या होत्या.

मयंक बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या कर्णधार अजिंक्य रहाणेनी विहारी सोबत ११.३ षटकांत फक्त १५ धावा जोडल्या. रणजी स्पर्धेच्या अंतिम सामन्यांत ११ गडी बाद करणाऱ्या आदित्य सरवटेनी रहाणेला बाद करत विदर्भाला मोठे यश मिळवुन दिले. त्यानंतर मैदानात आलेल्या श्रेयस अय्यरची विहारीसोबत भागिदारी जमली असे दिसत असतानाच कर्नेवारने अय्यरला पायचित व वखारेनी इशान किशनला बाद करत शेष भारतीय संघाची कंबर मोडली होती. शेष भारत संघाची अवस्था १ बाद १७१ वरुन ७ बाद २५८ धावा अशी झाली होती. एक चांगल्या भागिदारीनंतर संघाचा डाव गडगडला होता पण विहारीने एक बाजू लावुन धरली होती आणि आपल्या शतकाक़डे आगेकुच करत होता.

विहारीने राहुल चहरसोबत ८ व्या गड्यासाठी ४७ धावांची भागिदारी केली यादरम्यान विहारीने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील १६ वे शतक झळकावले आणि विहारी ११४ धावा काढुन सरवटेच्या गोलंदाजीवर फैज फजलकडे झेल देउन बाद झाला. शेवटी शेष भारत संघाचा डाव ८९.४ षटकांत ३३० धावांवर आटोपला. महत्त्वाचे म्हणजे २०१८ च्या इराणी चषकातही हनुमा विहारीने १८३ धावांची खेळी केली होती. शेष भारत संघाकडुन हनुमा विहारीने सर्वाधिक ११४ धावा केल्या तर विदर्भकडुन अक्षय वखारे व आदित्य सरवटेनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.

      विहारी (११४) आणि मयंक अगरवाल (९५) या दोघांनी संघाला सुस्थितीत नेले होते पण त्यानंतर शेष भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी कच खाल्ली व संघाचा डाव घसरला आणि संघाला फक्त ३३० धावा करता आला. त्यामुळे पहिल्या दिवसअखेर विदर्भचा सामन्यांवर वरचष्मा होता. वासिम जाफरच्या अनुपस्थित विदर्भच्या फलंदाजीची जिम्मेदारी कर्णधार फैज फजल, गणेश सतीश, संजय रघुनाथ आणि अक्षय वाडकरवर असेल तर शेष भारत संघाच्या गोलंदाजीची जिम्मेदारी अंकित राजपुत, धर्मेंद्रसिंग जडेजा, राहुल चहल आणि कृष्णप्पा गौतमवर असेल. आता कोणता संघ कोणावर वरचढ ठरतो हे पाहावे लागेल.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *