मंधनाच्या ८६ धावानंतरही भारताचा तीसऱ्या टी-२० सामन्यांत २ धावांनी पराभव, न्युझिलंडचा ३-० ने मालिका विजय

पहिले दोन सामने जिंकत न्युझिलंडने मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली होती त्यामुळे न्युझिलंडचा संघ मालिका ३-० ने जिंकण्याच्या प्रयत्नात होता तर मालिकेचा शेवट गोड करण्याच्या इराद्याने भारतीय महिला संघ मैदानात उतरणार होता. मागील दोन्ही सामन्यांत भारतीय संघाला सलामीवीर स्मृती मंधना आणि जेमिमाह रॉडरीग्सने चांगली सुरुवात करुन दिली होती पण मधल्या फळीतील फलंदाजांच्या अपयशामुळे भारताला पऱाभवाला सामोरे जावे लागले. न्युझिलंडची कर्णधार अॅमी सॅटर्थवेटने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. न्युझिलंडने संघात एक बदल करत कॅटलिन गरीच्या जागी हेली जेन्सनला संधी मिळाली. तर भारताने संघात एक बदल करत हेमलताच्या जागी मिताली राजचा संघात समावेश करण्यात आला.

      कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत सलामीवीर सोफी डीवाईन आणि सुझी बेट्सने संघाला शानदार सुरवात करुन दिली. या दोघींनी मोठ्या धावसंख्येचा पाया रचत ५.३ षटकांत ४६ धावांची सलामी दिली. बेट्स (२४) बाद झाल्यानंतर हनाह रोवही लगेच बाद झाली आणि ८.४ षटकांत न्युझिलंडची अवस्था २ बाद ६९ झाली होती. पण सलामीवीर सोफी डीवाईनने एक बाजू लावुन धरली होती आणि तिला कर्णधार सेटर्थवेटची चांगली साथ मिळाली. या दोघींनी फिरकी गोलंदाज राधा यादव व पुनम यादवचा यशस्वीपणे सामना केला आणि न्युझिलंडचा संघ मोठ्या धावसंख्येकडे आगेकुच करत होता.

      त्यातच डीवाईनने टी-२० मधील १० वे अर्धशतक झळकावले. डीवाईन आणि सेटर्थवेटच्या भागिदारीमुळे भारतीय संघ दबावात आला होता. या दोघींनी तीसऱ्या गड्यासाठी ८ षटकांत ७१ धावांची भागिदारी करत महत्त्वपुर्ण भुमिका निभावली. शेवटी मानसी जोशीने डीवाईनला ७२ धावांवर तर पुनम यादवने सेटर्थवेट ३१ धावांवर बाद करत न्युझिलंडच्या धावंसख्येवर अंकुश ठेवला आणि त्यानंतरच्या १५ चेंडूत न्युझिलंडचा संघ १९ धावाच काढु शकला. निर्धारीत २० षटकांत न्युझिलंडने ७ गडी गमावत १६१ धावा काढल्या. न्युझिलंडकडुन सलामीवीर सोफी डीवाईनने सर्वाधिक ७२ धावा काढल्या तर भारताकडुन दिप्ती शर्माने सर्वाधिक २ गडी बाद केले.

      १६२ धावांच आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला स्मृती मंधना व जेमिमाह रॉडरीग्ससोबतच कर्णधार हरमनप्रित कौरकडुन ही चांगल्या खेळीची अपेक्षा होती. पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच या सामन्यांतही स्मृती मंधनाने संघाला धडाक्यात सुरुवात करुन दिली पण युवा खेळाडु प्रिया पुनिया सलग तिसऱ्या सामन्यांत अपयशी ठरली. मंधना आणि पुनियाने २.४ षटकांत २९ धावांची दिली पण त्यात पुनियाचा वाट होता फक्त १ धावेचा. त्यानंतर पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच या सामन्यांतही मंधना व जेमिमाहची जोडी जमली. या दोघींनी न्युझिलंडच्या सर्वच गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत आवश्यक धावगती कायम राखली होती त्यामुळे भारतीय संघ चांगल्यांच स्थितीत होता.

      मंधना आणि जेमिमाहने दुसऱ्या गड्यासाठी ३८ चेंडूत ४७ धावांची भागिदारी केली. पण ९ व्या षटकांत डीवाईनच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात जेमिमाह २१ धावा काढुन बाद झाली. ९ षटकांत २ बाद ७६ या स्थितीनंतर मंधनाने टी-२० मधले ८ वे अर्धशतक झळकावले आणि मंधना व हरमनप्रितची जोडी जमली असतानाच हरमनप्रित बाद झाली. त्यानंतर भारतीय संघाची मदार मंधनावर होती पण तीही टी-२० मधील सर्वोच्च धावा नोंदवुन ८६ धावांवर बाद झाली. मंधना बाद झाली तेव्हा भारताला विजयासाठी २७ चेंडूत ३९ धावांची आवश्यकता त्यावेळेस मैदानात होत्या मिताली राज आणि दिप्ती शर्मा. या दोघींनी भारताला सामन्यांत टिकुन ठेवले होते.

      शेवटच्या षटकांत भारताला विजयासाठी १६ धावांची आवश्यकता होती. लेह कॅस्परेकने टाकलेल्या शेवटच्या षटकांतील पहिल्या चेंडूवर चौकार मारत मितालीने शानदार सुरुवात केली होती त्यानंतर तीसऱ्या चेंडूवर चौकार दिप्तीने आपले इरादे स्पष्ट केले होते. शेवटच्या चेंडूवर ४ धावांची आवश्यकता असताना मिताली फक्त एकच धाव काढु शकली आणि भारताला २ धावांनी पराभव स्विकारावा लागला. भारताकडुन स्मृती मंधनाने सर्वाधिक ८६ धावा काढल्या तर न्युझिलंडकडुन सोफी डीवाईनने सर्वाधिक २ गडी बाद केले. या विजयासह न्युझिलंडने टी-२० मालिका ३-० ने खिशात घातली.

सामन्यांत ७२ धावा व २ गडी तर मालिकेत १५३ धावा व ४ गडी अशी अष्टपैलु कामगिरी करणाऱ्या सोफी डिवाईनला सामन्यांतील व मालिकेतील सर्वोत्कृष्ट खेळाडुच्या पुरस्काराने गोरविण्यात आले.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *