क्रुणाल पंड्या आणि रोहित शर्माच्या कामगिरीच्या जोरावर भारताने मालिकेत साधली बरोबरी

पहिल्या सामन्यांत तब्बल ८० धावांनी पराभव स्विकारल्यानंतर मालिकेत टिकुन राहण्यासाठी भारताला विजय आवश्यक होता तर एकदिवसीय मालिकेतील पराभव विसरुन टी-२० मालिका आपल्या नावे करण्याच्या इराद्याने न्युझिलंडचा संघ मैदानात उतरणार होता. पहिल्या सामन्यांत सगळ्याच विभागात शानदार कामगिरी करत न्युझिलंडने विजय मिळवला होता तर गोलंदाजांच्या अपयशामुळे भारताला पहिला सामना गमवावा लागला होता.  न्युझिलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकत फ्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. दोन्ही संघानी पहिल्या सामन्यांतील संघच कायम ठेवला होता.

पहिल्या सामन्यांत धडाक्यात सुरुवात करुन दिलेल्या टीम सेइफर्ट आणि कॉलिन मुनरोकडुन या सामन्यांत ही तश्याच सुरुवातीची अपेक्षा होती. पहिल्या दोन षटकांत सलामीवीरांना फक्त ५ धावा काढता आल्या. त्यानंतर भुवनेश्वर कुमारने टाकलेल्या तीसऱ्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूवर १० काढुन सेइफर्टने आपले इरादे स्पष्ट केले होते पण तीसऱ्या चेंडूवर तो धोनीकडे झेल देऊन परतला. त्यानंतर मुनरो आणि विल्यमसनने २६ धावांची भागिदारी केली. पावरप्लेच्या शेवटच्या षटकांत रोहितने क्रुणाल पंड्याला गोलंदाजीस आणले आणि कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत क्रुणालने या षटकांत दोन गडी बाद केले आणि न्युझिलंडची अवस्था ६ षटकांत ३ बाद ४३ केली होती. दोन षटकांनंतर विल्यमसनही क्रुणालचा बळी ठरला आणि न्युझिलंडचा संघ अडचणीत सापडला होता. पहिल्या ८ षटकांत ४ गडी गमावल्यानंतरही कॉलिन डी ग्रॅंडहोमने दडपण न घेता चहल व क्रुणाल पंड्याच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवला आणि रॉस टेलरने त्याला योग्य साथ दिली.

      १६ व्या षटकांत ग्रॅंडहोमने २७ चेंडूत आंतरराष्ट्रीय टी-२० मधील पहिले अर्धशतक झळकावले पण पुढच्याच चेंडूवर तो रोहित शर्माकडे झेल देऊन माघारी परतला. पण टेलरने एक बाजू लावुन धरली होती. १९ व्या षटकांत विजय शंकरच्या थेट फेकीवर रॉस टेलर ३६ चेंडूत ४२ धावा काढुन धावबाद झाला. शेवटच्या षटकांत खलील अहमदने दोन गडी बाद करत न्युझिलंडच्या धावसंख्येवर रोख लावला. न्युझिलंडने निर्धारीत २० षटकांत ८ गडी गमवत १५८ धावा केल्या. न्युझिलंडकडुन कॉलिन डी ग्रॅंडहोमने सर्वाधिक ५० धावा केल्या तर क्रुणाल पंड्याने सर्वाधिक ३ गडी बाद केले.

      १५९ धावांच लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या कर्णधार रोहित शर्मा व शिखर धवनकडुन चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. विराट कोहलीच्या अनुपस्थित कर्णधारपद भुषवणाऱ्या रोहित शर्माने भारताला शानदार सुरुवात करुन दिली. ६ षटकांत बिनबाद ५० धावा धावफलकावर लावत भारताच्या सलामी जोडीने न्युझिलंडवर दडपण वाढवले. रोहित शर्मा प्रत्येक खराब चेंडूला सीमारेषेबाहेर धाडत होता. ९ व्या षटकांत एकेरी धाव घेत रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी-२० मधील विक्रमी २० वे अर्धशतक झळकावले पण पुढच्याच षटकांत इश सोढीला मोठा फटका मारण्याच्या नादात रोहित ५० धावांवर बाद झाला. रोहित-धवनने पहिल्या गड्यासाठी ७९ धावा जोडल्या. त्यानंतर धवनही ३० धावा काढुन बाद झाला.

      तीसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेला रिषभ पंत आणि विजय शंकर चांगल्या लयीत दिसत होता पण १४ व्या षटकांत डॅरील मिशेलला सलग दुसरा षटकार खेचण्याच्या नादात विजय १४ धावांवर बाद झाला आणि त्याने एक चांगली संधी सोडली. शेवटी पंत आणि धोनीच्या जोडीने भारताला ७ गडी राखुन विजय मिळवुन देत मालिकेत १-१ ने बरोबरी साधुन दिली. पंत ४० तर धोनी २० धावांवर नाबाद राहिले. न्युझिलंडकडुन डॅरील मिशेल, इश सोढी आणि लॉकी फर्ग्युसनने प्रत्येकी एक गडी बाद केला. भारताकडुन कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ५० धावा काढल्या. २८ धावांत ३ गडी बाद करणाऱ्या क्रुणाल पंड्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. ५० धावांच्या खेळीत रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी-२० मधील सर्वाधिक धावांचा आणि सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम आपल्या नावे केला. यासोबतच भारताकडुन आंतरराष्ट्रीय  टी-२० मध्ये १०० षटकार मारणार रोहित पहिला भारतीय ठरला.

मालिकेतील तीसरा आणि शेवटचा सामना १० फेब्रुवारी रोजी हॅम्लिटन येथे खेळविण्यात येणार आहे.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *