टी- २० क्रिकेटमधील भारताचा मधील सर्वात मोठा पराभव!

सेइफर्ट ठरला सामनावीर

एकदिवसीय मालिकेत ४-१ ने विजय मिळवल्यानंतर टी-२० मालिकेतही शानदार कामगिरी करण्याच्या हेतूने भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात मैदानात उतरणार होता तर एकदिवसीय मालिकेतील पराभव विसरून न्युझिलंडचा संघ एक नवीन सुरुवात करण्यास उत्सुक होता. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. युवा खेळाडू डॅरील मिशेल आपला पदार्पणाचा सामना खेळत होता. तर एकदिवसीय मालिकेत शानदार कामगिरी केलेल्या कुलदिप यादवच्या जागी अष्टपैलु क्रुनाल पांड्याला संधी देण्यात आली. तर हार्दीक पांड्या आणि क्रुनाल पांड्या पहिल्यांदाच भारताकडुन एकत्र खेळणार होते.

सलामीला आलेल्या कॉलिन मुनरो आणि यष्टीरक्षक फलंदाज टीम सेइफर्टने न्युझिलंडला शानदार सुरुवात करून दिली. या दोघांनी भुवनेश्वर कुमार पाठोपाठ सगळ्याच गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला आणि या दोघांनी पहिल्या ६ षटकांत बिनबाद ६६ धावा केल्या होत्या. न्युझिलंडच्या धडाकेबाज सुरुवातीनंतर भारताचा कर्णधार दबावात आला होता पण गोलंदाजीत बदल करुन देखील भारताला यश मिळत नव्हते. टीम सेइफर्टने खेळलेले फटके डोळ्याचे पारणे फेडणारे होते. ९ व्या षटकांत टीम सेइर्टनेने ३० चेंडूत पहिले टी-२० अर्धशतक पुर्ण केले पण पुढच्याच चेंडूवर क्रुणालच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मुनरो ३४ धावांवर सीमारेषेवर उभ्या असलेल्या विजय शंकरकडे झेल देऊन बाद झाला हे भारतासाठी फार यश होते. मुनरो आणि सेइफर्टने ८६ धावांची भागिदारी केली. त्यानंतर दिनेश कार्तिकने सेइफर्टला ७१ धावांवर जिवनदान दिले. खलील अहमदच्या शानदार चेंडूवर सेइफर्ट ८४ धावांवर त्रिफळाचीत झाला त्याने केन विल्यमसनसोबत दुसऱ्या गड्यासाठी ४८ धावा जोडल्या. मिशेल (८) आणि विल्यमसन (३४) बाद झाले तेव्हा न्युझिलंडने १५.१ षटकांत १६४ धावा केल्या होत्या. त्यामुळे शेवटच्या २९ चेंडूत न्युझिलंडचा संघ किती धावा करतो याकडे सर्वांचे लक्ष्य होते. रॉस टेलर आणि स्कॉट कुगेलेंजने छोट्या पण मह्त्त्वाच्या खेळी करत संघाला २१९ धावांपर्यंत पोहचवले. भारताच्या खेळाडुंच्या क्षेत्ररक्षणातील चुका भारताला महाग पडल्या. भारताकडुन हार्दीक पांड्याने २ तर चहल, क्रुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि खलील अहमदने प्रत्येकी १ गडी बाद केला.

      २२० च्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघाला रोहित आणि धवनकडुन चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. धवनने तशी सुरुवात देखील केली होती पण कर्णधार रोहित शर्माच्या रुपाने भारताला पहिला धक्का बसला. त्यानंतर तीसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या विजय शंकरने काही सुंदर फटके खेळले. ६ व्या षटकांत लॉकी फर्ग्युसनच्या शानदार यॉर्करवर धवन त्रिफळाचीत झाला. धवन बाद झाला तेव्हा भारताने ५.३ षटकांत २ गडी गमावत ५१ धावा केल्या होत्या. नंतर मिशेल सॅंटनरने ९ व्या षटकांत रिषभ पंत आणि विजय शंकरला बाद करत भारताच्या अडचणीत वाढ केल्या. त्यानंतर भारताचा डाव गडगडला आणि भारताची अवस्था ११ षटकांत ६ बाद ७७ झाली होती.

      धवन आणि विजयच्या चांगल्या सुरुवातीनंतर भारताची मधली फळी सपक्षेल अपयशी ठरली. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीने क्रुणाल पांड्याच्या साथीने पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी ७ व्या गड्यासाठी ७ षटकांत ५२ धावा जोडल्या पण क्रुणाल पांड्या २० धावा काढुन बाद झाल्यानंतर पुढील १४ चेंडूत भारताचा डाव १९.२ षटकांत १३९ धावांवर संपुष्टात आला आणि न्युझिलंडने तब्बल ८० धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. हा भारतासाठी धावांच्या रुपाने सर्वात मोठा पराभव आहे. भारताकडुन धोनीने सर्वाधिक ३९ धावा काढल्या. न्युझिलंडकडुन टिम साऊदीने सर्वाधिक ३, फर्ग्युसन, ईश सोधी व मिशेल सॅंटनरने प्रत्येकी २ तर डॅरेल मिशेलने एक बाद केला. ४३ चेंडूत ८४ धावांची खेळी करणाऱ्या टीम सेयफर्टला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

मालिकेतील दुसरा सामना ८ फेब्रुवारी रोजी ऑकलंड येथे खेळविण्यात येणार आहे.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *