मंधना आणि जेमिमाहच्या तडाखेबाद फलंदाजीनंतरही भारताचा २३ धावांनी पराभव, तहुहु ठरली सर्वोत्कृष्ट खेळाडु

मिताली राजच्या नेतृत्वात एकदिवसीय मालिकेत २-१ ने विजय मिळवल्यानंतर टी-२० मालिकेवरही कब्जा करण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतारणार होता तर दुसरीकडे एकदिवसीय मालिकेतील अपयश धुवून टाकण्याच्या दृष्टीने न्युझिलंडचा संघ मैदानात उतरणार होता. एकदिवसीय संघाची कर्णधार मिताली राजला संघात स्थान मिळाले नाही आणि तिच्या जागी युवा खेळाडू प्रिया पुनियाला संघात स्थान मिळाले. भारतीय कर्णधार हरमनप्रित कौरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.

फलंदाजीला आलेल्या न्युझिलंडच्या संघाला दुसऱ्याच षटकात सुझी बेट्सच्या रूपाने पहिला धक्का बसला. पण त्यानंतर डीवाईनने कैटलिन गरीसोबत ३६ धावांची  भागीदारी करत डाव सावरला. कैटलिन गरी १५ धावांवर त्रिफळाचीत झाल्यानंतर डीवाईनने कर्णधार सटर्थवेटसोबत संघाचा डाव तर सावरलाच पण त्याचबरोबर मोठी डावसंख्या उभारण्यासाठी पायाही रचला. डीवाईनने ऑफ साईडला मारलेले फटके अप्रतिम होते. डीवाईनसोबत कर्णधार सॅटर्थवेटही चांगल्या लयीत दिसत होती. त्यातच डीवाईन ४२ धावांवर असताना जेमिमाह रॉडरीग्सने तीचा सोपा झेल सोडला. त्यानंतर डीवाईन ने टी-२० कारकिर्दीतील ९ वे अर्धशतक पूर्ण केले.

      न्युझिलंडने १४ व्या षटकांत १०० चा आकडा पार केला होता त्यामुळे उर्वरित ६ षटकांत न्युझिलंडचा संघ किती धावा काढतो याकडे सर्वांचे लक्ष होते. १६ व्या षटकांत एक मोठा फटका मारण्याच्या नादात डीवाईन ४८ चेंडुत ६२ धावा काढुन बाद झाली आणि पुढच्याच षटकांत फुलटॉस चेंडूला लेग साईडला मारण्याच्या नादात सॅटर्थवेट बाद झाली. जम बसलेल्या दोन्ही खेळाडुंना दोन षटकांत माघारी धाडल्याने भारतीय संघाच मनोबल वाढलं होते. पण कॅटी मार्टिन (२७*) आणि फ्रान्सेस मॅकेय (१०*) ने २१ चेंडूत ३८ धावांची भागिदारी करत संघाला १५९ धावांपर्यंत मजल मारुन दिली. न्युझिलंडकडुन डीवाईनने सर्वाधिक ६२ धावा केल्या तर भारताकडुन दिप्ती शर्मा, पुनम यादव, अरुंधती रेड्डी आणि राधा यादवने प्रत्येकी एक गडी बाद केला.

      १६० धावांचा पाठलाग करण्यास भारताकडुन स्मृती मंधना आणि पदार्पणाचा सामना खेळणारी प्रिया पुनिया मैदानात आल्या होत्या पण सॅटर्थवेटने पहिल्याच षटकांत प्रियाला ४ धावांवर झेलबाद करत भारताला पहिला झटका दिला. पण त्यानंतर मंधनाने आक्रमक पवित्रा घेत न्युझिलंडच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. मंधनाने मारलेले षटकार लाजवाब होते. सुरुवातीला सावध खेळल्यानंतर रॉडरीग्सही चांगल्या लयीत दिसत होती. ९ व्या षटकांत एक शानदार षटकार खेचत मंधनाने २४ चेंडूत अर्धशतक झळकावले. मंधना आणि रॉडरीग्सने अवश्यक धावगती कायम राखली होती. १२ व्या षटकात भारताने १०० धावा पूर्ण केल्या पण त्याच षटकात अॅमेलिया केरला मोठा फटका मारण्याच्या नादात मंधाना ५८ धावा काढुन बाद झाली. ५८ धावांच्या खेळीत मंधनाने ७ चौकार आणि ३ षटकार मारले. मंधना आणि रॉडरीग्सने दुसऱ्या गड्यासाठी ९८ धावा जोडल्या.

      ५ चेंडूत मंधना आणि रॉडरीग्स बाद झाल्याने भारतीय संघ अडचणीत सापडला होता. त्यानंतरही भारतीय संघ सामन्याचा प्रमुख दावेदार दिसत होता पण भारताच्या मध्ल्या फळीने न्युझिलंडच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. एक वेळ भारतीय संघ १ बाद १०२ अशा सुस्थितीत होता पण त्यानंतर भारताचा डाव गडगडला आणि भारताचा संपुर्ण डाव १९.१ षटकांत १३६ धावांत संपुष्टात आला आणि न्युझिलंडने मालिकेतला पहिला सामना २३ धावांनी जिकत मालिकेत १-० ने आघाडी घेतली. न्युझिलंडकडुन तहुहुने सर्वाधिक ३, अॅमेलिया केर व कॅसपरेकने प्रत्येकी २ तर सॅटर्थवेट, मेर व डीवाईनने प्रत्येकी १ गडी बाद केला. २० धावांत ३ गडी बाद करणारी ली तहुहु ठरली सर्वोत्कृष्ट खेळाडु.

मालिकेतील दुसरा सामना ८ फेब्रुवारी रोजी ऑकलंड येथे खेळविण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *