वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडच्या फलंदाजांचे लोटांगण, वेस्ट इंडिजची मालिकेत २-० ने आघाडी

कर्णधार जेसन होल्डरचे नाबाद द्विशतक, यष्टीरक्षक  शेन डॉरिचचे नाबाद शतक आणि गोलंदाजांच्या कामगिरिवर वेस्ट इंडिंज ने पहिला सामना तब्बल ३८१ धावांनी जिंकत मालिकेत आघाडी घेत सर्वांनाच आश्चर्यचकित केले. मालिकेतल्या पहिल्या सामन्यात आघाडी घेतल्याने वेस्ट इंडीच्या खेळाडूंचा आत्मविश्वास चांगलाच वाढला होता तर ०-१ ने पिछाडीवर पडलेला इंग्लंडचा संघ मालिकेतील आव्हान टिकून ठेवण्याच्या हेतूने दुसऱ्या सामन्यात उतरणार होता. वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने नाणेफेक जिंकत इंग्लडला फलंदाजीस आमंत्रित केले. इंग्लंडच्या संघात स्टुअर्ट ब्रॉडचा समावेश झाल्याने इंग्लंडची गोलंदाजी आणखीन मजबूत झाली होती तर वेस्ट इंडिजने पहिल्या सामन्यांतील संघच कायम ठेवला होता.


      पहिल्या सामन्यात ७७ आणि २४३ धावांवर बाद झाल्याने या सामन्यात इंग्लंडला चांगल्या सलामीची अपेक्षा होती. ५ व्या षटकांत रॉरी बर्न्स बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या जॉनी बेअरस्टोने शानदार सुरुवात केली आणि तो चांगल्या लयीत दिसत होता. २० वे कसोटी अर्धशतक होताच तो ६४ चेंडूत ५२ धावा काढुन रोचच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. पण या सामन्यातही इंग्लंडच्या मधल्या फळीतील फलंदाज टिकाव धरू शकले नाही आणि इंग्लंडने पहिले ६ गडी १०० धावांच्या आत गमवत वेस्ट इंडिजच्या संघाला वर्चस्व निर्माण करण्याची संधी दिली. २८ षटकांत ६ बाद ९३ अशी स्थिती झाल्यानंतर मोईल अली आणि यष्टिरक्षक बेन फोक्स यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्यातच मोईन अलीने १४ अर्धशतकही झळकावले. या दोघांनी ७ व्या गड्यासाठी ८५ धावांची महत्त्वाची भागिदारी केली पण मोईन अली ६० धावा काढुन बाद होताच इंग्डलंने ९ धावांत ४ गडी गमावले आणि इंग्लंडचा पहिला डाव फक्त १८७ धावांत संपुष्टात आला. इंग्लडकडुन मोईन अलीने सर्वाधिक ६० तर  वेस्ट इंडिजकडुन केमार रोचने सर्वाधिक ४ तर शॅनोन गॅब्रिल, अलझारी जोसेफ आणि जेसन होल्डने त्याला मह्त्त्वाची साथ दिली.

      इंग्लडला 200 धावांच्या आत बाद करत वेस्ट इंडिजने पहिल्याच दिवशी सामन्यावर वर्चस्व मिळवले होते. गोलंदाजांच्या धडाकेबाज कामगिरीनंतर फलंदाजकडून अश्याच कामगिरीची अपेक्षा होती. कॅमबेल आणि बर्थवेट या सलामी जोडीने पहिल्या दिवसीतील २१ षटके खेळुन काढत बिनबाद ३० धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही या जोडीने चांगली सुरवात करुन देत पहिल्या गड्यासाठी ७० धा जोडल्या. त्यानंतर बार्थवेटने शाई होपसोबत ६३ धावा जोडल्या. पण २२ धावांत गमावल्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ ४ बाद १५५ अशा स्थितीत सापडला होता. पण तब्बल दोन वर्षानंतर संघात स्थान मिळवलेल्या डॅरेन ब्राव्होने एक बाजू लावुन धरली होती. ब्राव्होने हेटमायरसोबत ३१ धावा जोडत संघाला आघाडी मिळवुन दिली. त्यानंतर त्याने डाऊरीचसोबत ५० आणि कर्णधार होल्डरसोबत ४५ धावा जोडत आघाडी वाढवली. होल्डर (२२) बाद होताच वेस्ट इंडिजचा डाव गडगडला. २१५ चेंडूत अर्धशतक झळकावल्यानंतर लगेच ब्राव्हो बाद झाला आणि तीसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजचा पहिला डाव ३०६ धावात संपुष्टात आला. ब्राव्होने धिम्यागतीने धावा जरी काढल्या असल्या तरी या ५० धावा वेस्ट इंडिजसाठी फार महत्त्वाच्या होत्या. बाव्हो वगळता बार्थवेट, कॅमबेल आणि होपने प्रत्येकी ४९, ४७ आणि ४४ धावा केल्या. इंग्लंडकडुन मोईन अली व स्टुअर्ट ब्रॉडने प्रत्येकी ३ तर बेन स्टोक्स आणि जेम्स अॅडरसनने प्रत्येकी २ गडी बाद केले.

      वेस्ट इंडिजने पहिल्या डावात ११९ धावांची आघाडी घेतल्याने इंग्लंडच्या फलंदाजावर दडपण निर्माण झाले होते. मागील तीन डावातील अपयशानंतर इंग्लंडचे फलंदाज वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा कसा सामना करतात याकडे सर्वांचे लक्ष होते. सलामीवीर रॉरी बर्न्स आणि जो डेन्लीने आश्वासक सुरुवात करुन दिली असे वाटत असतानाच होल्डरने आधी बर्न्सला (१६) पायचीत आणि बेअरस्टोला (१४) त्रिफळाचीत करत इंग्लंडला दोन धक्के दिले. त्यानंतर जोसेफने रुट आणि डेन्लीला बाद करत इंग्लंची अवस्था ४ बाद ५९ केली होती. सलग दुसऱ्या डावात इंग्लंडची मधली फळी पुर्णपणे अपयशी ठरली. केमार रोच व जेसन होल्डरच्या तडाख्यासमोर इंग्लंडचा संपुर्ण डाव १३२ धावांत संपुष्टात आला आणि इंग्लंडने विजयासाठी वेस्ट इंडिजसमोर १४ धावांचे आव्हान ठेवले. इंग्लंडकडुन जोस बचलरने सर्वाधिक २४ धावा केल्या तर वेस्ट इंडिजकडुन जेसन होल्डर आणि कोमार रोचने प्रत्येकी ४ तर अलजारी जोसेफने २ गडी बाद केले.

      १४ धावांच आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या बार्थवेटने चौकाराने सुरुवात केली. विजयासाठी ३ धावांची आवश्यकता असताना तीसऱ्या षटकांत कॅमबेलने जेम्स अॅडरसनच्या पहिल्याच चेंडूवर मिडविकेटला षटकांर खेचत संघाला १० गड्यांनी विजय मिळवून दिला आणि मालिकेतला एक सामना बाकी असतानाच संघाला २-० अशी विजयी आघाडी घेऊन दिली. तब्बल १० वर्षांनंतर वेस्ट इंडिजने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकली यापूर्वी वेस्ट इंडिजने २००८-०९ ची मालिका १-० ने जिंकली होती. तर तब्बल ६ वर्षांनंतर वेस्ट इंडिजने एका मोठ्या संघाविरुद्ध मालिका जिंकली यापुर्वी २०१२-१३ मध्ये वेस्ट इंडिजने न्युझिलंडविरुद्धची मालिका २-० ने जिंकली होती. सामन्यांत ८२ धावांत ८ गडी बाद करणाऱ्या केमार रोचला सामनावीर पुरस्काराने गोरविण्यात आले.

मालिकेतील तीसरा आणि शेवटची सामना ९ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियम, सेंट ल्युसिया येथे खेळविण्यात येणार आहे.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *