स्नेल पटेलच्या शतकानंतर जयदेव उनाडकटची ४६ धावांची महत्वाची खेळी, तिसऱ्या दिवस अखेर विदर्भची ६० धावांची आघाडी

जामठा मैदान, नागपुर येथे खेळविण्यात येत असलेल्या रणजी २०१८-१९ च्या अंतिम सामन्यांत विदर्भ आणि सौराष्ट्रचे संघ एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते. विदर्भचा कर्णधार फैज फजलने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. विदर्भचे वरच्या क्रमांकावरील फलंदाज अपयशी ठरल्यानंतर अक्षय कर्नेवरच्या नाबाद ७३ आणि अक्षय वाडकरच्या ४५ धावांच्या जोरावर विदर्भने पहिल्या डावात ३१२ धावा केल्या. यात अक्षय कर्नेवरने अक्षय वखारेसोबत ८ व्या गड्यासाठी तब्बल ७८ धावांची भागिदारी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात मह्त्त्वाची भुमिका निभावली. सौराष्ट्रकडून कर्णधार जयदेव उनाडकटने सर्वाधिक ३ गडी बाद केले आणि त्याला चेतन सकारीया व मकवनाने महत्वाची साथ दिली.

३१२ धावांचा पाठलाग करताना सौराष्ट्राची सुरुवात खराब झाली होती पण त्यानंतर सलामीवीर स्नेल पटेलनी विश्वराज जडेजा सोबत दुसऱ्या गड्यासाठी ६१ धावांची भागीदारी केली पण त्यानंतर जडेजा आणि उपांत्य सामन्यांत नाबाद शतक झळकावणारा चेतेश्वर पुजारा झटपट बाद झाले आणि सौराष्ट्राची अवस्था ३ बाद ८१ झाली होती. झटपट दोन गडी गमावल्यानंतरही स्नेल पटेल खेळपट्टीवर  टिकून होता. जम बसल्यानंतर पटेलने काही शानदार फटके खेळले. त्याने वसवडा, शेलडन जॅक्सन आणि प्रेरक मंकडसोबत छोट्या पण महत्वाच्या भागीदाऱ्या रचल्या. तिसऱ्या दिवशी स्नेल पटेलने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील दुसरे शतक झळकावले. पण शतक साजरं केल्यानंतर पटेल १०२ धावा काढून उमेश यादवच्या गोलंदाजीवर अक्षय वाडकरकडे झेल देऊन परतला.

      पटेल बाद झाला तेव्हा सौराष्ट्राने १८४ धावांत ७ गडी गमावले होते आणि सौराष्ट्रचा संघ संकटात सापडला होता. विदर्भाचा संघ मोठी आघाडी घेईल असेच दिसत होते पण सौराष्ट्रच्या खालच्या क्रमांकावरील फलंदाजांच्या मनात मात्र वेगळेच चालू होते. मकवानाने धरमेंद्र जडेजासोबत ३८ धावा जोडल्या. २४७ धावांत ९ गडी गमावल्यानंतर कर्णधार जयदेव उनाडकटने चेतन सकारीयासोबत शेवटच्या गड्यासाठी तब्बल ६० धावा जोडल्या ही सौराष्ट्राच्या डावातील दुसऱ्या क्रमांकाची भागिदारी ठरली आणि सौराष्ट्रचा पहिला डाव ३०७ धावांत संपुष्टात आला. सौराष्ट्रकडुन स्नेल पटेलने सर्वाधिक १०२ तर कर्णधार जयदेव उनाडकटने ४६ धावा केल्या. विदर्भकडुन अदित्य सरवटेने सर्वाधिक ५ तर अक्षय वखारेनी ४ गडी बाद केले.

      उनाडकट आणि सकारीयाच्या भागिदारीने विदर्भला फक्त ५ धावांची आघाडी घेऊ दिली त्यामुळे सौराष्ट्रचा संघ सामन्यांत टिकुन राहिला. दुसऱ्या डावाची सुरुवात विदर्भने धिम्यागतीने केली. कर्णधार फैज फजल आणि संजय रघुनाथ यांनी १४.४ षटकांत १६ धावांची सलामी दिली पण धर्मेंद्र जडेजाच्या गोलंदाजीवर फजल बाद झाल्यानंतर संजयने गणेश सतीशसोबत दुसऱ्या गड्यासाठी १० षटकांत २९ धावा जोडल्या पण त्यानंतर संजय जडेजाच्या गोलंदाजीवर १६ धावांवर यष्टिचीत झाला. तीसऱ्या दिवसअखेर विदर्भने २ बाद ५५ धावा केल्या तर गणेश सतीश २४ तर वासीम जाफर ५ धावांवर खेळत होते. आता चौथ्या दिवशी कोणता संघ कोणावर भारी ठरतो हे पाहावे लागेल.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *