रोमांचक सामन्यांत दक्षिण आफ्रिकेचा पाकिस्तानवर ६ धावांनी विजय, क्षेत्ररक्षणात शानदार कामगिरी करणारा मिलर ठरला सामनावीर

दक्षिण आफ्रिकेनी एकदिवसीय मालिकेत ३-२ ने विजय मिळवल्यानंतर टी-२० मालिकाही रोमांचक होईल यात शंका नव्हती. टी-२० मालिकेत हाशिम अमला, डेल स्टेन, इम्रान ताहिर, कागिसो रबाडा या तगड्या खेळाडुंना विश्रांती दिल्याने कर्णधार फाफ ड्यु प्लेसिसच्या नेतृत्वात एक नवखा संघ खेळणार होता. त्यातच दुखापतीमुळे क्विंटन डी कॉकने सुद्धा मालिकेतुन माघार घेतली होती. त्यामुळे नवख्या आफ्रिकेची टी-२० क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या पाकिस्तानविरुद्ध मोठी परिक्षा होती. तसेच या मालिकेपुर्वी पाकिस्तानने सलग ११ टी-२० मालिका जिंकल्या होत्या त्यामुळे या मालिकेत पाकिस्तानचा संघ कसे प्रदर्शन करतो याकडे सर्वांचे लक्ष्य होते. पाकिस्तानचा कर्णधार शोएब मलिकने नाणेफेक जिंकत आफ्रिकेला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले.

      प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या पाकिस्तानकडुन कर्णधार शोएब मलिकने पहिले षटक टाकले पण हा निर्णय पाकिस्तानला चांगलाच महागात पडला या षटकांत आफ्रिकेनी १२ धावा काढल्या. त्यानंतर इमाद वासिमने युवा क्लोएटला १३ धावांवर बाद करत आफ्रिकेला पहिला झटका दिला. त्यानंतर आलेल्या कर्णधार फाफ ड्यु प्लेसिसने रेझा हेंड्रीक्सच्या साथीने पाकितस्तानच्या प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला आणि संघाला शानदार सुरुवात करुन दिली. ११ व्या षटकांत फहिम आश्रफच्या गोलंदाजीवर चौकार मारत फाफ ड्यु प्लेसिसने संघाच्या १०० धावासोबत टी-२० कारकिर्दीतले ८ वे अर्धशतक झळकावले.

      ड्यु प्लेसिस आणि हेंड्रीक्सची जोडी पाकिस्तानचे दडपण वाढवत होती आणि आफ्रिकेचा संघ मोठ्या धावसंख्येकडे आगेकुच करत होता. १४ व्या षटकांत हेंड्रीक्सने ही २ रे टी-२० अर्धशतक झळकावले. ड्यु प्सेसिस आणि हेंड्रीक्सच्या जोडीन दुसऱ्या गड्यासाठी  ७३ चेंडूत १३१ धावा जोडल्या. पण १५ व्या षटकांत उस्मान शेनवारीने  फाफ डुय प्लेसिस (७८) आणि वॅन डर ड्युसेन (०) ला बाद करत आफिकेच्या धावगतीवर रोख लावला. डेविड मिलरसोबत १९ धावा जोडल्यानंतर हेंड्रीक्स ७४ धावा काढुन बाद झाला आणि आफ्रिकेनी  निर्धारित २० षटकांत ६ गडी गमवत १९२ धावा काढल्या. शेवटच्या ५ षटकांत आफ्रिकेनी ५ गडी गमावत फक्त ३५ धावा काढल्या. पाकिस्तानकडुन उस्मान शेनवारीने सर्वाधिक ३ गडी बाद केले.

      १९३ धावांचा यशस्वी पाठलाग करण्यासाठी पाकिस्तानला चांगल्या सुरुवातीची आवश्यकता होती. पहिल्या षटकांतील पहिल्याच चेंडूवर चौकार मारत फखर जमानने आपले इरादे स्पष्ट केले होते पण त्याच षटकांत ब्युरन हेंड्रीक्सने फखर जमानला बाद करत पाकिस्तानला मोठा झटका दिला. फखर बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या हुसेन तलातने सलामीवीर बाबर आझमला चांगली साथ दिली. दोघेही जलदगती गोलंदाजांबरोबरच फिरकी गोलंदाज शम्सीचा यशस्वीपणे सामना करत होते. या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी ८१ धावा जोडल्या पण १० व्या षटकांत शम्सीला मोठा फटका मारण्याच्या नादात तलात ४० धावांवर बाद झाला आणि पुढच्याच षटकांत बाबरही ३८ धावांवर धावबाद झाला.

      १ बाद ८५ वरुन पाकिस्तानची अवस्था १३.३ षटकांत ५ बाद ११८ झाली होती नंतर शोएब मलिकने फहिम आश्रफसोबत २६ धावा जोडल्या पण दुसऱ्या बाजूने गडी बाद होत होते. त्यानंतरही कर्णधार शोएबने संघाला सामन्यांत टिकुन ठेवले होते. शेवटच्या षटकांत पाकिस्तानला विजयासाठी १६ धावांची आवश्यकता होती पण शेवटच्या षटकांतील तीसऱ्या चेंडूवर ख्रिस मॉरीसला मोठा फटका मारण्याच्या नादात शोएब मलिक ४९ धावांवर डेविड मिलरकडे झेल देऊन परतला आणि पाकिस्तानचा संघ २० षटकांत ९ गडी गमवत १८६ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेनी ६ धावांनी विजय मिळवत ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. आफ्रिकेकडुन तबरेज शम्सी, ख्रिस मॉरीस आणि ब्युरन हेंड्रीक्सने प्रत्येकी २ गडी बाद केले तर फेहल्युकवायोने एक गडी बाद केला. चार झेल आणि दोन फलंदाजांना धावबाद अशी क्षेत्ररक्षणात शानदार कामगिरी करणाऱ्या डेविड मिलरला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

मालिकेतील दुसरा सामना ३ फेब्रुवारी रोजी जोहान्सबर्ग येथे खेळविण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *