शेवटच्या एकदिवसीय सामन्यांत न्युझिलंडच्या महिलांचा भारतीय महिलांवर ८ गड्यांनी विजय

स्मृती मंधना ठरली मालिकावीर

पहिल्या दोन सामन्यांत एकतर्फी विजय मिळवत भारतीय महिलांनी मालिकेत २-० ने विजय आघाडी घेतली होती त्यामुळे मालिकेतल्या शेवटच्या सामन्यांतही भारतीय खेळाडु कामगिरीत सातत्य राखुन मालिकेत ३-० ने विजय मिळवण्यासाठी उत्सुक होत्या. तर न्युझिलंडचा संघ मालिकेचा शेवट गोड करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार होत्या. न्युझिलंडची कर्णधार अॅमी सॅटर्थवेटने नाणेफेक जिंकत भारतीय संघाला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. न्युझिलंडने संघात एक बदल करत मॅडी ग्रिनच्या जागी कॅटी पर्किन्सला संघात स्थान दिले तर भारताने मागिल सामन्यांतील संघच कायम ठेवला होता.

भारतीय कर्णधार मिताली राजसाठी हा २०० वा सामना होता.

      दोन सामन्यांत एक शतक आणि एक अर्धशतक झळकावत १९५ धावा करणाऱ्या स्मृती मंधना कडुन अशाच कामगिरीची अपेक्षा होती. पण भारताची सलामी जोडी स्मृती मंधना व जेमिमाह रॉडरीग्स १३ धावांत माघारी परतल्या आणि भारतीय संघ अडचणीत सापडला होता. त्यानंतर २०० वा सामना खेळणारी कर्णधार मिताली राजकडुन चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती पण ती सुद्धा २८ चेंडूत ९ धावा काढुन बाद झाली. त्यानंतर दिप्ती शर्मा आणि पहिल्या दोन सामन्यांत फलंदाजीची संधी न मिळालेली हरमनप्रित कौर मैदानात होती. या दोघींनी भारताचा डाव सांभाळला आणि दोघींनी न्युझिलंडच्या गोलंदाजांचा यशस्वीपणे सामना केला. या दोघी भारताला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत पोहचवतील असे दिसत असतानाच अॅना पीटरसनला मोठा फटका मारण्याच्या नादात हरमनप्रित कौर २४ धावांवर त्रिफळाचीत झाली. त्यानंतर दिप्तीने हेमलताला साथीला घेता पाचव्या गड्यासाठी ३० धावांची भर घातली पण ३५ व्या षटकांत अॅमेलिया केरने हेमलता आणि तानिया भाटियाला बाद करत भारताची अवस्था ६ बाद ११७ केली होती. त्यानंतर दिप्ती शर्माने कारकिर्दीतले १० वे अर्धशतक झळकावले पण अर्धशतक झळकावल्यानंतर लगेचच दिप्ती बाद झाली आणि भारताचा डाव १४९ धावांत संपुष्टात आला. भारताकडुन दिप्ती शर्माने सर्वाधिक ५२ धावा केल्या तर न्युझिलंडकडुन अॅना पीटरसनने सर्वाधिक ४ गडी बाद केले.

      पहिल्या दोन सामन्यांत भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत न्युझिलंडला रोखले होते. त्यामुळे १५० धावांच संरक्षण करण्याचं लक्ष्य भारतीय गोलंदाजांपुढे होते. लक्ष्य तसं मोठं नव्हंत त्यामुळे न्युझिलंडला डावाच्या सुरुवातीला झटके देण्याची आवश्यकता होती. झुलन गोस्वामी आणि एकता बिश्ट विरुद्ध सुझी बेट्स व लॉरेन डाऊनने सावध सुरुवात केली. त्यानंतर ७ व्या षटकांत सुझी बेट्सने मारलेला स्ट्रेट ड्राईव्ह झुलन गोस्वामीच्या हाताला लागुन यष्टिवर आदळला आणि लॉरेन डाऊन धावबाद झाली. त्यानंतर मैदानात आलेल्या कर्णधार अॅमी सॅटर्थवेटने सुझी बेट्ससोबत संघाचा डाव सांभाळलाच आणि या दोघींनी भारतीय गोलंदाजांचा यशस्विपणे सामना करत धावगती ५ च्या आसपास राखली होती. बघता-बघता न्युझिलंडचा संघ मालिकेतल्या पहिल्या विजयाकडे आगेकुच करत होता. बेट्स आणि सॅटर्थवेटने दुसऱ्या गड्यासाठी ८४ धावा जोडल्या. २० षटकांत हेमलताच्या गोलंदाजीवर चौकार मारत सुझी बेट्स एकदिवसीय कारकिर्दीतले २५ वे अर्धशतक झळकावले पण २१ व्या षटकांत पुनम यादवच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात चेंडू बॅटची कड घेऊन यष्टिवर आदळला आणि ६४ चेंडूत ५७ धावा काढुन सुझी बेट्स बाद झाली.

      सुझी बेट्स बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या सोफी डीवाईनला पहिल्याच चेंडूवर मिताली राजने जिवनदान दिले. त्यानंतर अॅमी सॅटर्थवेटने कारकिर्दीतले २० अर्धशतक झळकावले आणि ३० षटकांतील पहिल्या दोन चेंडूवर दोन चौकार मारत सॅटर्थवेटने न्युझिलंडला ८ गड्यांनी विजय मिळवुन दिला पण भारताने २-१ ने मालिका जिंकली. सॅटर्थवेट ६६ तर डीवाईन १७ धावांवर नाबाद राहिल्या. भारताकडुन पुनम यादवने एकमेव गडी बाद केला. सामन्यांत २८ धावांत ४ गडी बाद करणाऱ्या अॅना पीटरसनला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले तर मालिकेत ३ सामन्यांत ९८ च्या सरासरीने १९६ धावा करणाऱ्या स्मृती मंधनाला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

न्युझिलंड आणि भारत दरम्यान ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळविण्यात येणार आहे यातील पहिला सामना ६ फेब्रुवारी रोजी वेलिंग्टन येथे खेळविण्यात येणार आहे.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *