लेगस्पिनर कॅमरुन बॉईसची अष्टपेलु कामगिरी, मेलबर्न रेनिगेड्सचा सिडनी थंडरवर २७ धावांनी विजय

बिगबॅश २०१८-१९ ची स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहचली असताना संघाला एक-एक विजय पुढच्या फेरीत जाण्यासाठी महत्त्वाचा होता. मेलबर्न रेनिगेड्स आणि सिडनी थंडर या दोन्ही संघाना विजय महत्त्वाचा होता. या सामन्यापुर्वी मेलबर्न रेनिगेड्सने १२ सामन्यांत १४ तर शेन वॉटसनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या सिडनी थंडरचे ११ सामन्यांत ११ गुण होते. मेलबर्न रेनिगेड्सचा कर्णधार अॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.

      कर्णधार अॅरॉन फिंचचा प्रथम फलंदाजीचा निर्णय त्याच्याच अंगाशी आला. दुसऱ्याच षटकांत मॅकेंझी हार्वे (८) बाद झाल्यानंतर रेनिगेड्सची अवस्था ५.२ षटकांत ३ बाद ३१ झाली होती. पहिल्या ६ षटकांत ३ गडी गमवल्यानंतर मैदानात आलेल्या मोहम्मद नबीने डॅनियल ख्रिस्टियनसोबत पाचव्या गड्यासाठी २४ धावांची भागिदारी केली. नबीने एक बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला पण दुसऱ्या बाजूने त्याला योग्य साथ मिळाली नाही. शेवटी १६ व्या षटकांत फवाद अहमदच्या गोलंदाजीवर ख्रिस जॉर्डनकडे झेल देऊन नबी ३४ चेंडूत ३६ धावा काढुन बाद झाला. नबी बाद झाल्या तेव्हा मेलबर्नने १५.३ षटकांत ७ गडी गमवत ९० धावा केल्या होत्या.

      ९० धावांत ७ गडी बाद केल्याने सामन्यांवर सिडनी थंडरचे वर्चस्व होते. आता शेवटचे चार फलंदाज किती धावांची भर घालतात याकडे सर्वांचे लक्ष होते. लेगस्पिनर कॅमरुन बॉईसने सिडनीच्या गुरींदर संधु आणि ख्रिस जॉर्डनवर जोरदार हल्ला चढवला. बॉईसने १९ व्या आणि २० व्या षटकांत प्रत्येकी १६ धावा कुटल्या. २० व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर चौकार मारत बॉईसने २२ चेंडूत अर्धशतक झळकावले आणि मेलबर्नने निर्धारित २० षटकांत ७ गडी गमवत १४० धावा केल्या. बॉईस आणि केन रिचर्डसनने आठव्या गडयासाठी २७ चेंडूत ५० धावांची भागिदारी केली यात केन रिचर्डसनचा वाटा होता फक्त ५ धावांचा. मेलबर्नकडुन कॅमरुन बॉईसने सर्वाधिक नाबाद ५१ धावा केल्या. सिडनी थंडरकडुन फवाज अहमद, जोनाथन कुक आणि ख्रिस जॉर्डनने प्रत्येकी २ तर डॅनियल सॅम्सने १ गडी बाद केला.

      टी-२० मध्ये १४१ धावांचे आव्हान तसे सोपेच पण छोटे आव्हानच कधी-कधी त्रासदायक ठरते. पहिल्याच षटकांत केन रिचर्डसनने कर्णधार शेन वॉटसनला बाद करत सिडनी थंडरला मोठा धक्का दिला त्यानंतर जेसन संघाही माघारी परतला. २.५ षटकांत १५ धावांत २ गडी गमावल्यानंतर कॅलम फर्ग्युसन आणि अॅन्टन डेवसिचने सिडनीचा डाव सावरला. पण ९ व्या षटकांत बॉईसने डेवसिचला १७ धावांवर बाद केल्यानंतर पुढच्याच चेंडूवर ख्रिस ग्रीन धावबाद झाला आणि पुन्हा एकदा सिडनीचा संघ अडचणीत सापडला होता. आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या यष्टिरक्षक बॅक्स्टर होल्टने फर्ग्युसन आणि डॅनियल सॅम्ससोबत प्रत्येकी २३ आणि २८ धावांची भागिदारी केली पण २८ चेंडूत ४५ धावांची आवश्यकता असताना केन रिचर्डसनच्या गोलंदाजीवर एक मोठा फटका मारण्याच्या नादात होल्ट (३७) सीमारेषेवर उभ्या असलेल्या ट्रिमेनकडे झेल देऊन परतला.

      होल्ट बाद होताच सिडनीचा डाव ११३ धावांत संपुष्टात आला आणि मेलबर्नने २७ धावांनी मिळवत गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले. सिडनीकडुन बॅक्स्टर होल्टने सर्वाधिक ३७ धावा केल्या तर मेलबर्नकडुन केन रिचर्डसनने सर्वाधिक ३, कॅमरुन बॉईसने २ तर डॅनियल ख्रिस्टियन, हॅरी गर्नी आणि ख्रिस ट्रिमेनने प्रत्येकी १ गडी बाद केला. सामन्यांत नाबाद ५१ धावा आणि २ गडी अशी अष्टपैलु कामगिरी करणाऱ्या कॅमरुन बॉईसला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *