भारतीय संघाला ९२ धावांत गारद करत न्युझिलंडचा ८ गड्यांनी विजय!!!

ट्रेंट बोल्ट ठरला सामनावीर

मालिकेत ३-० ने विजयी आघाडी घेतल्याने भारतीय संघ आपले वर्चस्व कायम ठेवेल असेच दिसत होते तर न्युझिलंडचा संघ अस्तित्व टिकवण्याचा उद्देशाने मैदानात उतरणार होता. मालिकेतील शेवटचे दोन एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत विराट कोहलीला विश्रांती देण्यात आल्याने उपकर्णधार रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार होता. न्युझिलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकत भारतीय संघाला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. न्युझिलंडने संघात तब्बल चार बदल करत कॉलिन मुनरो, ईश सोधी, टीम साउदी आणि लॉकी फर्ग्युसनच्या जागी टोड अॅस्टल, जेम्स निशम, कॉलिन डी ग्रँडहोम आणि मॅट हेनरीला संधी दिली तर महेंद्र सिंग धोनी दुखापतीतून बाहेर न आल्याने या सामन्याला सुद्धा मुकणार होता. विराट कोहलीच्या जागी शुभमान गिलला पदार्पणाची संधी मिळाली तर मागील तीन सामन्यांत दोनदा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या मोहम्मद शमीला विश्रांती देत त्याच्या जागी खलील अहमदला संधी दिली. 

      प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाला सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन कडुन चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. मॅट हेनरीला एकाच षटकात चौकार आणि षटकांर मारत धवनने आपले इरादे स्पष्ट केले होते पण ट्रेंट बोल्टसमोर त्याची डाळ शिजली  नाही आणि तो १३ धावांवर पायचीत झाला. दोन षटकांनंतर रोहित सुद्धा माघारी परतला तेव्हा भारताने ८ षटकांत २ गडी गमावत २३ धावा केल्या होत्या. पहिल्या ८ षटकांत दोन अनुभवी खेळाडु बाद झाल्याने भारताच्या मधल्या फळीवर दडपण आले होते. मागील तीन सामन्यांत लय गमावलेला ट्रेंट बोल्ट आज मात्र चांगल्याच लयीत दिसत होता. दोन्ही बाजूने स्विंग करत तो प्रत्येक चेंडूवर भारतीय फलंदाजांची परिक्षा पाहत होता. त्याला कॉलीन डी ग्रॅंडहोमने चांगली साथ दिली. या जोडीने भारताच्या मधल्या फळीला भगदाड पाडत भारताची स्थिती १६.४ षटकांत ७ बाद ४० केली होती.

      भारतीय संघ ५० धावांचा आकडा पार करेल की नाही असेच दिसत होते. त्यानंतर हार्दिक पांड्याने कुलदिप यादवसोबत ८ व्या गड्यासाठी १५ धावांची आणि यजुवेंद्र चहलने कुलदिप यादवसोबत ९ व्या गड्यासाठी २५ धावांची भागिदारी केली. आपल्या शेवटच्या षटकांत बोल्टने पांड्याला बाद करत एकदिवसीय कारकिर्दीत ५ व्यांदा डावात ५ गडी बाद करण्याची किमया केली. उष्ण आणि दमट वातावरणात ट्रेंट बोल्ट आणि कॉलीन डी ग्रॅंडहोमने सलग १०-१० षटके टाकली. शेवटी ३१ व्या षटकांत जेम्स निशमने खलील अहमदला त्रिफळाचीत करत भारताला ९२ धावांवर गारद केले. ही भारताची एकदिवसीय क्रिकेटमधील ७ व्या क्रमांकाची निच्चांकी धावसंख्या ठरली. भारताकडुन यजुवेंद्र चहलने सर्वाधिक नाबाद १८ धावा केल्या तर न्युझिलंडकडुन ट्रेंट बोल्टने ५, कॉलीन डी ग्रॅंडहोमने ३ तर टोड अॅस्टल आणि जेम्स निशमने प्रत्येकी १ गडी बाद केला.

      ९३ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेला न्युझिलंडचा संघ किती षटकांत विजय मिळवतो याकडे सर्वांचे लक्ष होते. सलामीवीर मार्टिन गुप्टील सामना लवकर संपवण्याच्या मुड मध्ये होता. डावाची सुरुवात षटकारने करत त्याने आपले इरादे स्पष्ट केले होते त्यानंतर पुढील दोन चेंडूवर दोन चौकार मारत पहिल्या तीन चेंडूत १४ धावा वसुल केल्या पण चौथ्या चेंडुवर पांड्याकडे झेल देऊन गुप्टिल परतला. त्यानंतर आलेला विल्यमसनही जास्त काळ टिकला नाही आणि तो ही भुवनेश्वरचा गोलंदाजीवर कार्तिककडे झेल देऊन बाद झाला तेव्हा न्युझिलंडला विजयासाठी ५४ धावांची आवश्यकता होती. विल्यमसन बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या रॉस टेलरने चहलच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवला तर हेनरी निकोल्सने त्याला योग्य साथ दिली. १५ व्या षटकांतील चौथ्या चेंडूवर रॉस टेलरने चहलच्या गोलंदाजीवर चौकार मारत न्युझिलंडला ८ गड्यांनी विजय मिळवुन दिला. रॉस टेलर (३७) आणि हेनरी निकोल्सने (३०) तीसऱ्या गड्यासाठी ५० चेंडूत ५४ धावा जोडल्या. न्युझिलंडने विक्रमी २१२ चेंडू राखत मालिकेतील पहिला विजय मिळवला. भारताकडुन भुवनेश्वर कुमारने २ गडी बाद केले. २१ धावांत ५ गडी बाद करणाऱ्या ट्रेंट बोल्टला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना ३ फेब्रुवारी रोजी वेलिंग्टन येथे खेळविण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *