झुलन गोस्वामीच्या धारदार गोलंदाजीनंतर मंधना आणि मितालीची अर्धशतके !

मालिकेत भारताची २-० ने विजयी आघाडी!

नेपियारमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यांत एकतर्फी विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाकडुन दुसऱ्या सामन्यांतही अशाच कामगिरीची अपेक्षा होती तर मालिकेत टिकुन राहण्यासाठी न्युझिलंडला विजय आवश्यक होता. त्यामुळे न्युझिलंडचा संघ पुर्णपणे जोशात मैदानावर उतरणार यात शंका नव्हती. पहिल्या सामन्यांप्रमाणेच या सामन्यांतही भारतीय कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने पहिल्या सामन्यांतील संघच कायम ठेवला होता तर न्युझिलंडने हॉली हडलस्टोनच्या जागी अॅना पीटरसनला संधी दिली होती.

कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत झुलन गोस्वामीने पहिल्याच षटकांत अनुभवी सुझी बेट्सला आणि चौथ्या षटकांत शिखा पांडेनी सोफी डीवाईनला बाद करत न्युझिलंडची अवस्था ३.४ षटकांत २ बाद ८ केली होती. झटपट दोन गडी गमावल्याने न्युझिलंडचा संघ अडचणीत सापडला होता. लॉरेन डाऊन आणि अॅमी सॅटर्थवेट यांनी डाव सावरण्याचा छोटासा प्रयत्न केला पण १५ चेंडूत लॉरेन डाऊन आणि अॅमेलिया केर बाद झाल्याने न्युझिलंडची स्थिती १४ षटकांत ४ बाद ३८ झाली होती. न्युझिलंडच्या वरच्या क्रमांकावरील फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर हात टेकल्यानंतर कर्णधार अॅमी सॅटर्थवेटने मात्र एक बाजू लावुन धरली होती. अॅमी सॅटर्थवेटने आधी मॅडी ग्रीनमोबत पाचव्या गड्यासाठी २४ धावा आणि त्यानंतर लेह कॅसपरेकसोबत सहाव्या गड्यासाठी ५८ धावा जोडल्या. त्यातच अॅमी सॅटर्थवेटने एकदिवसीय कारकिर्दीतले १९ वे अर्धशतक झळकावले.


८७ चेंडूत ७१ धावांची खेळी केल्यानंतर सॅटर्थवेट पुनम यादवच्या गोलंदाजीवर तानिया भाटियाकडे झेल देऊन परतली तेव्हा न्युझिलंडने ३३.१ षटकांत ६ गडी गमवत १२० धावा केल्या होत्या. पण भारताच्या गोलंदाजीसमोर न्युझिलंडचा डाव गडगडला आणि न्युझिलंडने शेवटचे ४ गडी ४१ धावांत गमवत न्युझिलंडचा डाव १६१ धावांत संपुष्टात आला. न्युझिलंडकडुन कर्णधार अॅमी सॅटर्थवेटने सर्वाधिक ७१ धावा केल्या. भारताकडुन अनुभवी झुलन गोस्वामीने ३, एकता बिष्ट, पुनम यादव आणि दिप्ती शर्माने प्रत्येकी २ गडी तर शिखा पांडेनी एक गडी बाद केला.

न्युझिलंडला १६१ धावांत गुंडाळल्याने सामन्यांवर भारताचे वर्चस्व होते. पहिल्या सामन्यांप्रमाणेच या सामन्यांतही मंधना आणि जेमिमाहकडुन चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती पण पहिल्या सामन्यांत नाबाद ८१ धावांची खेळी करणारी जेमिमाह रॉडरीग्स दुसऱ्याच षटकांत अॅना पीटरसनला मोठा फटका मारण्याच्या नादात अॅमेलिया केरकडे झेल देऊन परतली. त्यानंतर दिप्ती शर्माही लगेचच परतली आणि ४.४ षटकांत भारताची अवस्था २ बाद १५ झाली होती. झटपट दोन गडी गमावल्याने पाचव्याच षटकांत कर्णधार मिथाली राज मैदानात आली होती. झटपट गडी गमावण्याच दडपण न घेता स्मृती मंधना न्युझिलंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत होती. ती प्रत्येक खराब चेंडूला सीमारेषेबाहेर धाडत होती.  पहिल्या सामन्यांत शतकी खेळी करणारी स्मृती त्याच खेळीला पुढे नेत आहे असेच दिसत होते.

     २५ व्या षटकांत स्मृती मंधनाने एकदिवसीय कारकिर्दीतले १४ वे अर्धशतक झळकावले तर दुसऱ्या बाजुने मिताली राज खेळपट्टीवर ठाण मांडुन होती. ३२ व्या षटकांत मिताली राजने १०२ चेंडूत ५० धावांची खेळी करत कारकिर्दीतले ४९ वे अर्धशतक झळकावले. ३६ व्या षटकांत मिताली राजने अॅमोलिया केरच्या गोलंदाजीवर षटकार मारत भारताला ८ गड्यांनी विजय मिळवून दिला. मंधना ९० तर मिताली राज ६३ धावांवर नाबाद राहिल्या. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली. न्युझिलंडकडुन लिया तहुहु आणि अॅना पीटरसनने प्रत्येकी एक गडी बाद केला. मालिकेतला शेवटचा सामना १ फेब्रुवारी रोजी हॅमिल्टन मध्ये खेळविण्यात येणार आहे.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *