वेस्ट इंडिजचा इंग्लंडवर ३८१ धावांनी विजय

द्विशतकवीर जेसन होल्डर ठरला सामनावीर

गेल्या काही वर्षातील वेस्ट इंडिजची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी पाहता वेस्ट इंडिज – इंग्लंड मधील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचेच वर्चस्व राहिल असेच दिसत होते. ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे खेळविण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यांत वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. डॅरेन ब्राव्हो तब्बल २७ महिन्यांनतर कसोटी सामना खेळत होता तर जमैकाचा खेळाडु जॉन कॅमबेल पदार्पणाचा सामना खेळत होता. इंग्लंडच्या संघात जॉनी बेअरस्टो, जॉस बटलर असे दोन यष्टिरक्षक असताना बेन फोक्स या तीसऱ्या यष्टिरक्षकाला संघात संधी मिळाली. इंग्लंडचा संघ दोन जलदगती गोलंदाज, एक फिरकी गोलंदाज आणि दोन अष्टपैलु खेळांडुसोबत मैदानात उतरला होता.

      क्रेग ब्राथवेट आणि पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या जॉन कॅमबेलने वेस्ट इंडिजला शानदार सुरुवात करुन दिली. ब्राथवेटपेक्षा कॅमबेल चांगल्या लयीत दिसत होता. ब्राथवेट आणि कॅमबेलने ५३ धावांची सलामी दिली यात कॅमबेलचा वाटा ४४ धावांचा होता. १९ व्या षटकांत मोईन अलीने कॅमबेलला पायचित करत  वेस्ट इंडिजला पहिला धक्का दिला. त्यानंतर शाय होपने ब्राथवेटसोबत दुसऱ्या गड्यासाठी ७३ धावांची भागिदारी करत डाव सावरला. वेस्ट इंडिजचा संघ चांगल्या स्थितीत दिसत होता पण १० चेंडूत क्रेग ब्राथवेट (४०) आणि डॅरेन ब्राव्हो (२) बाद झाल्यानं वेस्ट इंडिजची अवस्था ३ बाद १२८ झाली होती. त्यानंतर होप आणि रोस्टन चेसची जोडी जमली. होपने कारकिर्दीतले ५ वे अर्धशतक साजरे केल्यानंतर होप ५४ धावांवर बाद झाला. होप बाद झाल्यानंतर चेसने हेटमायरसोबत ५ व्या गड्यासाठी ६६ धावा जोडल्या आणि तो ही अर्धशतक झाल्यावर लगेच बाद झाला.

      चेस बाद झाल्यानंतर हेटमायरने एक बाजू लावुन धरली होती पण दुसऱ्या बाजूने त्याला योग्य साथ मिळाली नाही. वेस्ट इंडिजच्या शेवटच्या ५ गड्यांनी ४९ धावा जोडल्या त्यात शेवटच्या ५ खेळाडुंचा वाटा होता फक्त ५ धावांचा. ८१ धावांवर बाद होणारा हेटमायर वेस्ट इंडिजचा अखेरचा खेळाडु होता. वेस्ट इंडिजने पहिल्या डावात २८१ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडुन शिमरॉन हेटमायरने सर्वाधिक ८१ धावा केल्या तर इंग्लंडकडुन जेम्स एंडरसनने ५, बेन स्टोक्सने ४ तर मोईन अलीने १ गडी बाद केला.

      वेस्ट इंडिजला पहिल्या डावात २८९ धावांत रोखल्यानंतर इंग्लंडला चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती पण जेसन होल्डरने किटॉन जेनिंग्सला १७ धावांवर बाद करत इंग्लंडला पहिला धक्का दिला त्यानंतर केमार रोचने  रॉरी बर्न्सला बाद करत इंग्लंडची अवस्था २ बाद ३५ केली होती. त्यानंतर केमार रोचच्या तडाखेबाज गोलंदाजीसमोर इंग्लंडचा डाव गडगडला आणि इंग्लंडचा डाव फक्त ७७ धावांत संपुष्टात आला. इंग्लंडला ७७ धावांत बाद करत वेस्ट इंडिजने पहिल्या डावात तब्बल २१२ धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळे सामन्यांवर वेस्ट इंडिजचे वर्चस्व होते. वेस्ट इंडिजकडुन केमार रोचने १७ धावांत ५, जेसन होल्डर आणि अल्झारी जोसेफने पत्येकी २ तर गेब्रिलने १ गडी बाद केला.

      पहिल्या डावात २१२ धावांची आघाडी घेतल्यानंतर क्रेग बार्थवेट (२४) आणि जॉन कॅमबेलने (३३) ५२ धावांची सलामी देत संघाला धडाक्यात सुरुवात करुन दिली पण मोईन अली आणि बेन स्टोक्सच्या गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजचा डाव बिनबाद ५२ वरुन ५ बाद ६१ असा घसरला. झटपट ५ गडी गमावल्यानंतर हेटमायरने यष्टिरक्षक शेन डावरिचसोबत ६ व्या गड्यासाठी ५९ धावांची भागिदारी रचली. दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजने १२० धावांत ६ गडी गमावले होते आणि वेस्ट इंडिजची आघाडी ३०० च्या पार गेली होती. झटपट ६ गडी गमावल्याने वेस्ट इंडिजचा दुसरा डाव लवकर गुंडाळला जाईल असे दिसत होते पण डावरिच आणि कर्णधार जेसन होल्डरने वेस्ट इंडिजचा डाव सावरला. सामन्याचे अजुन अडीच दिवस बाकी असल्याने वेस्ट इंडिज लवकर डाव घोषीत करणार नव्हता पण झटपट ६ गडी गमावल्यानंतरही डावरिच आणि होल्डरने दडपण न घेता फलंदाजी केली.

      बघता – बघता दोघांनी आपापली अर्धशतक साजरे केले आणि दोघेही शतकाकडे आगेकुच करत होते. डावरिचपेक्षा जेसन होल्डर एका वेगळ्याच लयीत दिसत होता. जेम्स एंडरसन, सॅम करन, मोईन अली, बेन स्टोक्स आणि आदिल रशीद या तगड्या गोलंदाजीचा डावरिच आणि होल्डरने सहजपणे सामना केला. ९९ तेंडूत १०० धावा करत जेसन होल्डरने कसोटी कारकिर्दीतले तीसरे शतक झळकावले. होल्डर आणि डावरिचची जोडी संघाला मोठ्या धावसंख्येकडे नेत होते. होल्डर पाठोपाठ डावरिचनेही कसोटी कारकिर्दीतले तीसरे शतक झळकावले आणि होल्डर कसोटी कारकिर्दीतल्या पहिल्या द्विशतकाकडे आगेकुच करत होता. २२९ चेंडूत २३ चौकार आणि ८ षटकारांच्या सहाय्याने जेसन होल्डरने नाबाद २०२ धावा करत कसोटी कारकिर्दीतले पहिले द्विशतक झळकावले. होल्डरने द्विशतक झळकावताच वेस्ट इंडिजने ६ गडी गमावत ४१५ धावांवर दुसरा डाव घोषीत केला तेव्हा होल्डर २०२ तर डावरिच ११६ धावांवर नाबाद राहिले. होल्डर आणि डावरिचने ७ व्या गड्यासाठी २९५ धावा जोडल्या. इंग्लंडकडुन मोईन अलीने ३, बेन स्टोक्सने २ तर सॅम करनने १ गडी बाद केला.

      वेस्ट इंडिजने इंग्लंडसमोर ६२८ धावांचे अशक्यप्राय आव्हान ठेवले होते. पहिल्या डावातील अयश विसरुन रॉरी बर्न्स आणि किटॉन जेनिंग्सने संघाला सावध सुरुवात करुन दिली. ७९ चेंडूत ५० धावा करत बर्न्सने कारकिर्दीतले दुसरे अर्धशतक झळकावले. जेनिंग्स बाद झाल्यानंतर बर्न्सने बेअरस्टोसोबत ४९ धावांची भागिदारी केली पण त्यानंतर इंग्लंडने झटपट ३ गडी गमावले त्यानंतर बेन स्टोक्स (३४) आणि जोस बटलर (२६) ने ५ व्या गड्यासाठी ४८ धावांची भागिदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण रोस्टन चेसच्या गोलंदाजीसमोर इंग्लंडचा दुसरा डाव गडगडला. इंग्लंडचा दुसरा डाव २४६ धावांत संपुष्टात आला आणि वेस्ट इंडिजने तब्बल ३८१ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० ने आघाडी घेतली. हा वेस्ट इंडिजसाठी धावांच्या मानाने तीसरा सर्वात मोठा विजय आहे. इंग्लंडकडुन रॉरी बर्न्सने सर्वाधिक ८४ धावा केल्या तर वेस्ट इंडिजकडुन रोस्टन चेसने ६० धावांत ८ गडी बाद करत कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आणि वेस्ट इंडिजच्या विजयात महत्त्वाची भुमिका पार पाडली. दुसऱ्या डावात नाबाद २०२ धावा करणाऱ्या जेसन होल्डरला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. मालिकेतील दुसरा सामना सर व्हिवियन रिचर्डस स्टेडियम, एंटिगुवा येथे ३१ जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान खेळविण्यात येणार आहे.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *