गोलंदाजांच्या तडाख्यानंतर रोहित, कोहलीची अर्धशतके, भारताची मालिकेत ३-० ने विजयी आघाडी

पहिल्या दोन सामन्यांत विजय मिळवल्यानंतर तीसरा सामना जिंकुन मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरणार होता तर मालिकेत टिकुन राहण्यासाठी न्युझिलंडला विजय आवश्यक होता. केन विल्यमसनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. न्युझिलंडने संघात एक बदल करत कॉलिन डी ग्रॅडहोमच्या जागी मिशेल सॅंटनरला संधी दिली तर भारताने दुखापतग्रस्त महेंद्रसिंग धोनी आणि विजय शंकरच्या जागी दिनेश कार्तिक आणि बीसीसीआयने बंदी उठवल्यानंतर संघात समावेश करण्यात आलेल्या हार्दिक पांड्याला संघात संधी मिळाली.

पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच या सामन्यांतही भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीने भारताला धडाक्यात सुरुवात करुन देत २६ धावांत न्युझिलंडची सलामी जोडी माघारी धाडली होती. झटपट दोन गडी गमावल्यांनतर कर्णधार केन विल्यमसन आणि रॉस टेलरनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या जोडीने तीसऱ्या गड्यासाठी ६१ चेंडूत ३३ धावांची भागिदारी केली. चहलच्या गोलंदाजीवर हार्दिक पांड्याने एक शानदार झेल घेत विल्यमसनला २८ धावांवर बाद केले. ५९ धावांत ३ गडी गमावल्याने न्युझिलंडच्या अडचणी वाढल्या होत्या पण अनुभवी खेळाडु ऱॉस टेलरने टॉम लेथमला साथीला घेत संघाचा डाव तर सावरलाच आणि धावगती सुद्धा ५ च्या जवळ कायम राखली होती. रॉस टेलरने ७१ चेंडूत ४६ वे अर्धशतक साजरे केले. रॉस टेलर बरोबरच लेथमने ही कारकिर्दीतले १३ वे अर्धशतक झळकावले.

      अर्धशतक झळकावल्यानंतर चहलच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात लेथम (५१) धावांवर रायडुकडे झेल देऊन परतला. टेलर आणि लेथमने चौथ्या गड्यासाठी ११९ धावा जोडल्या. चांगल्या भागिदारीनंतर न्युझिलंडने २० धावांत आणखी दोन गडी गमावले आणि ४१.३ षटकांत न्युझिलंडची अवस्था ६ बाद १९८ झाली होती. शतकाकडे आगेकुच करणाऱ्या रॉस टेलरने डग ब्रेसवेलसोबत ७ व्या गड्यासाठी २४ धावा जोडल्या पण त्यानंतर १०६ चेंडूत ९३ धावा काढुन रॉस टेलर मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर कार्तिककडे झेल देऊन परतला. रॉस टेलर बाद झाल्यानंतर पुढील २१ धावांत न्युझिलंडचा डाव ४९ व्या षटकांत २४३ धावांत संपुष्टात आला. न्युझिलंडकडुन रॉस टेलरने सर्वाधिक ९३ धावा काढल्या तर भारताकडुन मोहम्मद शमीने सर्वाधिक ३ तर हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि यजुवेंद्र चहलने प्रत्येकी २ गडी बाद केले.

      २४४ धावांचे आव्हान फॉर्मात असलेल्या भारतीय संघासाठी मोठे नव्हते. पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच या सामन्यांतही धवन – रोहितच्या जोडीकडुन भारतीय संघाला चांगल्या सलामीची अपेक्षा होती. पहिल्या दोन सामन्यांतील अर्धशतकवीर शिखर धवनने धडाक्यात सुरुवात केली पण ९ व्या षटकांत शिखर धवन २८ धावा काढुन बोल्टच्या गोलंदाजीवर रॉस टेलरकडे झेल देऊन परतला. धवन बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या विराट कोहलीने रोहित शर्मासोबत डाव सावरण्यासोबतच आवश्यक धावगती आवाक्यात ठेवली होती. रोहित शर्माने सलग दुसऱ्या सामन्यांत अर्धशतक झळकावले आणि विराट – रोहितच्या जोडीने १६ वी शतकी भागिदारी केली. रोहितनंतर विराटने ही कारकिर्दीतले ४९ वे अर्धशतक साजरे केले. त्यानंतर  मिशेल सॅंटनरला मोठा फटका मारण्याच्या नादात रोहित शर्मा यष्टिचित झाला. रोहितनंतर विराटही लगेच बाद झाला.

      विराट कोहली (६०) बाद झाला तेव्हा भारताने ३ गडी गमावत ३१.१ षटकांत १६८ धावा केल्या होत्या. तेव्हा अंबाती रायडु आणि दुखापतग्रस्त धोनीच्या जागी संघाता स्थान मिळालेला दिनेश कार्तिक मैदानात होते. अंबाती रायडने ऑफ साइडला खेळलेले फटके जबरदस्त होते आणि दिनेश कार्तिकही त्याला योग्य साथ देत होता. रायडु आणि कार्तिकच्या जोडीने एकही गडी न गमवता भारताला ४३ व्या षटकांत ७ गड्यांनी विजय मिळवून देत भारताला मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. रायडु व कार्तिकने चौथ्या गड्यासाठी ७१ चेंडूत ७७ धावा जोडल्या. रायडु ४० तर दिनेश कार्तिक ३८ धावांवर नाबाद राहिले.

   भारताकडुन रोहित शर्माने ६२ तर विराट कोहलीने ६० धावांची खेळी केली. न्युझिलंडकडुन ट्रेंट बोल्टने २ तर मिशेल सॅंटनरने एक गडी बाद केला. ४१ धावांत ३ गडी बाद करणाऱ्या मोहम्मद शमीला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. शेवटच्या दोन एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा उर्वरित २ एकदिवसीय सामने आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व करेल. मालिकेतील चौथा सामना ३१ जानेवारी रोजी हॅमिल्टन येथे खेळविण्यात येणार आहे.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *