‘खूब लडी मर्दानी’ वो तो झांसीवाली रानी थी!

‘मणिकर्णिका’ झाशीच्या राणीचा इतिहास, तीने गाजवलेलं शौर्य आपण यापूर्वी काही चित्रपट आणि मालिकांमधून पाहिलं आहे. इतिहासाचं हे पान विविध माध्यमातून आपल्यापुढं आलं आहे. ‘मणिकर्णिका’ हा सारा प्रवास भव्यदिव्य पद्धतीने पडद्यावर साकारतो. 

व्यावसायिक चौकटीत राहून ऐतिहासिक चरित्रपट निर्माण करणं म्हणजे खरं तर कठीणच. ऐतिहासिक नोंदींचा आधार घेत, तथ्याशी तडजोड न करता प्रेक्षकाला दोन-अडीच तास बांधून ठेवणं हीदेखील अवघड गोष्ट.

बिठूरमध्ये पेशव्यांची दत्तककन्या असलेल्या मणिकर्णिकेला लहानपणापासून सौंदर्य आणि साहसाचे जणू वरदानच आहे. झाशीचे राजा गंगाधरराव यांच्या विवाहासाठी मनूला मागणी घातली जाते आणि ती झाशी साम्राज्याची सून होते. राजाकडून राणी लक्ष्मीबाई असे तिचे नामकरण केले जाते. पुढे लहान बाळ सांभाळत आणि पतीच्या मृत्यूनंतर ती झाशीच्या गादीवर बसते आणि थेट इस्ट इंडिया कंपनीविरोधात एल्गार पुकारते. इंग्रजांविरोधात १८५७ मध्ये सशस्त्र लढा पुकारला जातो. झाशीची राणी त्यात सक्रिय सहभाग घेते. या प्रवासात तिचे घरचे तिच्या विरोधात जातात, तर इतर अनेक जण तिला मदत करतात. गौस खान यांची स्वामिनिष्ठा, झलकारीबाई यांची मदत, तात्या टोपे यांचे मार्गदर्शन असे अनेक प्रसंग यामध्ये येतात. झाशी इंग्रजांनी ताब्यात घेतल्यानंतर ग्वाल्हेरमध्ये मराठा साम्राज्याच्या निर्माणासाठी केलेले प्रयत्न असा सारा प्रवास सिनेमात दाखवला आहे. इंग्रजांना शरण न जाता ताठ मानेने मातृभूमीच्या रक्षणासाठी झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांनी दिलेले बलिदान हा या सिनेमाचा सर्वोच शण. त्यातील गंभीरता पडद्यावर पाहणाय्सारखा आहे

सुरुवातीपासून शेवटाकडे जाताना सिनेमाचा प्रवास मात्र काहीसा वर-खाली होतो. मध्यंतरापर्यंत तो काहीसा संथ आहे. मणकर्णिकेचे लग्न, पतीसोबतचे क्षण या साऱ्या गोष्टी दाखवताना सिनेमा रेंगाळतो. काही अनावश्यक गाण्यांमुळे त्याचा टेम्पोही जातो. मेलोड्रामाचाही बराच वापर केला जातो. झाशीच्या राणीला विरोध करणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या व्यक्तिरेखाही अतिशय खोट्या वाटतात. सिनेमा चा तो काळ जिवंत करण्यासाठी वापण्यात आलेले व्हीएफएक्स यामुळे सिनेमाचा आत्मा मात्र भटकते. सिनेमातील भव्यदिव्यता, इंग्रजविरोधी लढाया यांसाठी वापरलेले तंत्रज्ञान नजरेत भरण्यापेक्षा कृत्रिमतेकडेच जास्त झुकते. अनेक वेळा सिनेमाची भव्यदिव्यता डोळे दिपवून टाकतेही. 

 मात्र, भव्यदिव्यता हा सिनेमाचा निकष असू शकत नाही. झाशीच्या राणीचे चरित्र रंगवत असताना के. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी केलेली कथेची काहीशी हलकी मांडणी, व्यक्तिरेखांची संदिग्धता सिनेमाचा एकत्रित प्रभाव काहीसा कमी करते. सिनेमाचा शेवटही झाशीच्या राणीचा प्रत्यक्षातील शेवटापेक्षा वेगळा दाखवला जातो. हा चित्रपट कंगना राणावत तिच्या अप्रतिम अभिनयाच्या जोरावर तोलून धरते. दिग्दर्शक आणि अभिनेत्री अशा दोन्ही भूमिका ती साकारते. तिच्यासोबत सहदिग्दर्शक म्हणून राधाकृष्ण जगरलामुदी यांनी काम केले आहे. मात्र, दिग्दर्शनाच्या पातळीवर सिनेमाचा ट्रॅक सातत्याने बदलत राहतो. प्रसून जोशी यांचे संवाद एकदम टोकदार आहेत. सुरेश ओबेरॉय, अतुल कुलकर्णी, डॅनी, वैभव तत्त्ववादी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय देतात. शंकर-एहसान-लॉय यांचे संगीत श्रवणीय, पीरियॉडिक आहे. मात्र, सिनेमात वारंवार येणारी गाणी सिनेमाच्या वास्तववादी विषयाशी फारकत घेत असल्याने ती खटकतात.

मै रहू या ना रहू भारत ये रहना चाहिये हे गाणं मात्र अप्रतिम झाले आहे. प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीचं दर्शन घडवणारा आणि धगधगत्या इतिहासाचं पर्व मांडणारा मणिकर्णिका पाहण्यासारखा आहेच.

निर्मिती: झी स्टुडिओ आणि कमल जैन

सह निर्माते : निशांत पिट्टी 

दिग्दर्शक : कंगना राणावत , राधाकृष्ण जगरलामुदी 

कथा-पटकथा : के. व्ही. विजयेंद्र प्रसाद 

संवाद आणि गीते : प्रसून जोशी 

संगीत : शंकर-एहसान-लॉय 

कलाकार : कंगना राणावत , अतुल कुलकर्णी, जिशू सेनगुप्ता, डॅनी डेंग्जोप्पा, सुरेश ओबेरॉय, अंकिता लोखंडे, वैभव तत्त्ववादी.

या चित्रपटाला आम्ही देतोय – ४ / ५

6 thoughts on “‘खूब लडी मर्दानी’ वो तो झांसीवाली रानी थी!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *