सलग दुसऱ्या सामन्यांत भारतीय ‘फिरकी गोलंदाजांचा दबदबा’, रोहित शर्मा ठरला सामनावीर!

नेपियारमध्ये झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यांत ८ गड्यांनी विजय मिळवून भारताने मालिकेत १-० ने आघाडी घेतली होती. त्यामुळे भारतीय संघ मालिकेत विजयी लय कायम राखण्यास उत्सुक होता तर न्युझिलंडचा संघ ही विजयी पथावर येण्यास उत्सुक होता. भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने पहिल्या सामन्यांतील संघच कायम ठेवला होता तर न्युझिलंडने मिशेल सॅंटनर आणि टिम साऊथीच्या जागी अनुक्रमे ईश सोढी आणि कॉलिन डी ग्रॅंडहोमची वर्णी लागली होती.

      फलंदाजीला उतरलेल्या शिखर धवन आणि रोहित शर्माकडुन भारताला चांगल्या सलामीची अपेक्षा होती. पहिल्याच षटकांत रोहित शर्माचा झेल उडाला होता पण यष्टिरक्षक टॉम लेथम झेल घेण्यात अपयशी ठरला पण त्यानंतर रोहित शर्मा आणि पहिल्या सामन्यांत नाबाद ७५ धावांची खेळी केलेल्या शिखर धवनने भारताला धडाक्यात सुरुवात करुन देत कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवला. शिखर धवन पहिल्या सामन्यांतील नाबाद ७५ धावांची खेळी पुढे नेत होता असे दिसत होते तर रोहित शर्मा जणु मोठी खेळी करण्याच्या इराद्यानेच मैदानात आला होता. १८ व्या षटकांत रोहित शर्माने षटकांर ठोकत संघाच्या बिनबाद १०० धावा पुर्ण केल्या आणि स्वत:चे ३८ वे एकदिवसीय अर्धशतकही झळकावले. रोहित आणि शिखरच्या जोडीसाठी ही एकदिवसीय क्रिकेटमधली १४ वी शतकी भागिदारी ठरली. त्यानंतर शिखरनेही २७ वे एकदिवसीय अर्धशतक पूर्ण केले.

दोघेही चांगल्या लयीत दिसत होते पण २६ व्या षटकांत ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक लॅथमकडे झेल देऊन धवन ६६ धावांवर बाद झाला. रोहित शर्मा आपल्या २३ व्या शतकाकडे आगेकुच करत होता पण मोठा फटका मारण्याच्या नादात तो ८७ धावांवर बाद झाला. झटपट दोन गडी बाद झाल्यानंतर अंबाती रायडुने कोहलीसोबत ६४ धावांची तर धोनीसोबत ३५ धावांची भागिदारी केली. रायडु बाद झाला तेव्हा भारताने ४५.४ षटकांत ४ गडी गमवत २७१ धावा केल्या होत्या. शेवटच्या २६ चेंडूत भारतीय संघ किती धावा जोडतो याकडे सर्वांचे लक्ष होते. ४७ व्या आणि ४८ व्या षटकांत भारताला अनुक्रमे ७ आणि ६ धावा काढता आल्या पण ४९ व्या षटकांत धोनीने बोल्टवर तर ५० व्या षटकांत केदार जाधवने लॉकी फर्गुसनवर हल्ला चढवत अनुक्रमे १४ आणि २१ धावा काढत निर्धारित ५० षटकांत भारताने ४ गडी गमावत ३२४ धावा काढल्या.

धोनी ४८(३३) तर केदार जाधव २२(१०) धावांवर नाबाद राहिले. भारताकडुन रोहित शर्माने सर्वाधिक ८७ धावा काढल्या तर न्युझिलंडकडुन ट्रेंट बोल्ट आणि लॉकी फर्गुसनने प्रत्येकी २ गडी बाद केले.

३२५ धावांचा यशस्वी पाठलाग करण्यासाठी न्युझिलंडला चांगल्या सलामीची आवश्यकता होती. काही शानदार फटके खेळल्यानंतर ५ व्या षटकांतील शेवटच्या चेंडूवर भुवनेश्वर कुमारला अप्पर कट मारण्याच्या प्रयत्नात मार्टिन गुप्टिल (१५) सीमीरेषेवर उभ्या असलेल्या चहलकडे झेल देऊन परतला आणि २३ धावांवर न्युझिलंडला पहिला झटका लागला. गुप्टिल बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या कर्णधार विल्यमसनने धडाक्यात सुरुवात केली. ८ व्या षटकांत विल्यमसनने शमीच्या गोलंदाजीवर दोन षटकांर आणि एक चौकार मारला. पण पाचव्या चेंडूवर विल्यमसनच्या बॅटची कड घेऊन चेंडू यष्टिवर आदळला आणि ११ चेंडूत २० धावा काढुन विल्यमसन बाद झाला. भारताच्या फिरकी गोलंदाजीसमोर सलग दुसऱ्या सामन्यांत न्युझिलंडचा डाव गडगडला आणि न्युझिलंडची अवस्था ८ बाद १६६ झाली होती. डग ब्रेसवेलने ल़ॉकी फर्गुसनसोबत नवव्या गड्यासाठी ५८ धावांची भागिदारी केली. डग ब्रेसवेलने ४६ चेंडूत ५८ धावांची खेळी करत एकदिवसीय कारकिर्दीतले पहिले अर्धशतक झळकावले पण तो संघाला पराभवापासुन वाचवु शकला नाही आणि न्युझिलंडचा डाव २३४ धावांत संपुष्टात आला. भारताने ९० धावांनी विजय मिळवत मालिकेत २-० ने आघाडी घेतली. न्युझिलंडकडुन डग ब्रेसवेलने सर्वाधिक ५८ धावांची खेळी केली तर भारताकडुन कुलदिप यादवने ४ गडी, भुवनेश्वर कुमार आणि चहलने प्रत्येकी २ गडी तर केदार जाधव आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी १ गडी बाद केला. सामन्यांत ८७ धावांची खेळी करणाऱ्या रोहित शर्माला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

मालिकेतील तीसरा सामना मॉंट मौन्गनुई येथेच २८ जानेवारी रोजी खेळविण्यात येणार आहे.

शंतनु कुलकर्णी

One thought on “सलग दुसऱ्या सामन्यांत भारतीय ‘फिरकी गोलंदाजांचा दबदबा’, रोहित शर्मा ठरला सामनावीर!

 • January 30, 2019 at 4:54 PM
  Permalink

  सलग दुसऱ्या सामन्यांत भारतीय ‘फिरकी गोलंदाजांचा दबदबा’, रोहित शर्मा ठरला सामनावीर! – Marathi Katta – मराठी कट्टा
  acmeighhrx
  cmeighhrx http://www.gu8ydnar55ozt9l467x9jn23b61530p3s.org/
  [url=http://www.gu8ydnar55ozt9l467x9jn23b61530p3s.org/]ucmeighhrx[/url]

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *