विदर्भने केरळविरुद्ध एक डाव आणि ११ धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली

उमेश यादवचे सामन्यांत १२ बळी

सत्रात अपराजित राहिलेल्या विदर्भने उपांत्य-पूर्व सामन्यांत उत्तराखंडचा एक डाव आणि ११५ धावांनी पराभव करत उपांत्य सामन्यांत धडक मारली होती तर केरळने सत्रात अपराजित राहिलेल्या गुजरातचा ११३ धावांनी पराभव करत केरळने रणजी चषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच उपांत्य फेरीत धडक मारली होती. २०१७-१८ च्या रणजी मोसमाचा विजेता विदर्भचा सामना उपांत्य फेरीत पहिल्यांदाच धडक मारणाऱ्या केरळ संघाशी सामना होणार होता. वायनाड, केरळ येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यांत विदर्भ संघाचा कर्णधार फैज फजलने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. विदर्भ आणि केरळच्या गोलंदाजांनी उपांत्य-पूर्व फेरीतील विजयात महत्त्वाची भुमिका निभावली होती त्यामुळे उपांत्य फेरीत दोघांचा सामना जबरदस्त होणार यात शंका नव्हती.

उपांत्य-पूर्व सामन्यांत दुखापतग्रस्त झाल्याने संजु सॅमसन उपांत्य सामन्यांत खेळणार नव्हता हा केरळसाठी मोठा धक्का होता.

केरळकडुन सलामीला उतरलेल्या पुनम राहुल आणि मोहम्मद अझरुद्दीनकडुन चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती पण उमेश यादवने चौथ्या षटकांत अझरुद्दीनला बाद करत केरळला पहिला धक्का दिला. उमेश यादव आणि रजनीश गुर्बानीच्या गोलंदाजीसमोर केरळच्या फलंदाजांचा टिकाव लागताना दिसत नव्हता. कर्णधार सचिन बेबीने थोडा वेळ प्रतिकार केला पण तो ही जास्त वेळ टिकला नाही आणि केरळची अवस्था १९.२ षटकांत ७ बाद ५५ झाली होती. विष्णु विनोदने बासिल थंपीसोबत ८ व्या गड्यासाठी १६, संदिप वॉरियरसोबत ९ व्या गड्यासाठी १० तर शेवटच्या गड्यासाठी निधिशसोबत डावातील सर्वाधिक २५ धावांची भागिदारी केली. केरळचा पहिला डाव पहिल्या दिवशी पहिल्याच सत्रात २८.४ षटकांत १०६ धावांत संपुष्टात आला. केरळकडुन विष्णु विनोदने सर्वाधिक नाबाद ३७ धावा केल्या. विदर्भकडुन उमेश यादवने ४८ धावांत ७ तर रजनीश गुर्बानीने ३८ धावांत ३ गडी बाद केले.

पहिल्या डावात केरळला १०६ धावांत बाद केल्याने विदर्भने सामन्यांवर पकड मिळवली होती. गोलंदाजांच्या कामगिरीनंतर फलंदाजांकडुनही विदर्भला अश्याच कामगिरीची अपेक्षा होती. कर्णधार फैज फजल आणि संजय रघुनाथने विदर्भला ८ षटकांत ३३ धावांची सलामी दिली. निधिशने संजय रघुनाथला १९ धावांवर त्रिफळाचीत करत विदर्भला पहिला धक्का दिला. संजय बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या वासिम जाफर आणि फैज फजलची जोडी चांगलीच जमली होती. दोघांचा सध्याचा फॉर्म पाहता ही जोडी विदर्भला मोठी धावसंख्या उभारुन देईल असेच दिसत होते आणि या दोघांनी संघाला पहिल्या डावात आघाडी मिळुन दिली. जाफर आणि फजलने दुसऱ्या गड्यासाठी ८० धावांची भागिदारी केली पण निधिशनेच जाफरला ३४ धावांवर बाद करत विदर्भला ११३ धावांवर दुसरा धक्का दिला.

जाफर बाद झाल्यानंतर फजलने अथर्व तायडेसोबत भागिदारी करण्यावर भर दिला त्यातच फैज फजलने प्रथम श्रेणी क्रिकेटमधले ३६ वे तर सत्रातले २ रे अर्धशतक झळकावले. तायडेसोबत ५७ धावांची भागिदारी केल्यानंतर फजल ७५ धावा काढुन बाद झाला. त्यानंतर पुढील दोन षटकांत विदर्भने  एका धावेत २ गडी गमावले आणि पहिल्या दिवसअखेर विदर्भने ५ बाद १७१ धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच षटकांत बासिल थंपीने गणेश सतीश आणि अक्षय वाडकरला बाद करत विदर्भची अवस्था ७ बाद १७२ केली होती. त्यानंतर उमेश यादवने नाबाद १७ आणि मोहित काळेनी १२ धावा करत धावसंख्या वाढवण्यास हातभार लावला आणि विदर्भचा पहिला डाव २०८ धावांत संपुष्टात आला. विदर्भने पहिल्या डावात १०२ धावांची आघाडी घेतली होती. एकवेळ २ बाद १७० अशा सुस्थितीत असताना ३८ धावांत विदर्भने शेवटचे ८ गडी गमावले. विदर्भकडुन कर्णधार फैज फजलने सर्वाधिक ७५ धावा केल्या. केरळकडुन संदिप वॉरियरने ५, बासिल थंपीने ३ तर निधिशने २ गडी बा केले.

      १०२ धावांनी पिछाडीवर असलेल्या केरळने अरुण कार्तिक आणि जलज सक्सेना या नवीन सलामीवीरांची जोडी मैदानात धाडली होती. पहिल्या डावातील अपयश विसरुन अरुण कार्तिकने धडाक्यात सुरुवात करुन दिली. पहिल्या डावात ७ गडी बाद करणाऱ्या उमेश यादवने जलज सक्सेनाला ७ धावांवर बाद करत केरळला २८ धावांवर पहिला झटका दिला. त्यानंतर कार्तिकने विष्णु विनोदसोबत दुसऱ्या गड्यासाठी ३१ धावांची भागिदारी केली. पण विदर्भच्या गोलंदाजांसमोर केरळच्या फलंदाजांनी शरणागती पत्कारली आणि १ बाद ५९ वरुन केरळची अवस्था ७ बाद ६६ झाली होती. सिजोमोन जोसेफने २१ चेंडूत १७ धावांची खेळी करत थोडा प्रतिकार केला पण केरळचा दुसरा डाव फक्त ९१ धावांत संपुष्टात आला आणि विदर्भने एक डाव व ११ धावांनी विजय मिळवत सलग दुसऱ्या वर्षी विदर्भने रणजी चषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. केरळकडुन अरुण कार्तिकने सर्वाधिक ३६ धावा केल्या तर विदर्भकडुन उमेश यादवने ३१ धावांत ५ तर यश ठाकुरने २८ धावांत ४ गडी बाद केले. ७९ धावांत १२ गडी बाद करणाऱ्या उमेश यादवने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वोत्तम प्रदर्शन केले. सामन्यांत १२ गडी बाद करणाऱ्या उमेश यादवला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. अंतिम फेरीत विदर्भचा सामना कर्नाटक आणि सौराष्ट्रमधील विजयी संघाविरुद्ध ३ ते ७ फेब्रुवारी दरम्यान खेळविण्यात येईल.  

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *