पुरुषांपाठोपाठ भारतीय महिलांचा न्युझिलंडवर ९ गड्यांनी विजय!

मंधनाच्या १०५ तर जेमिमाहच्या नाबाद ८१ धावा

भारतीय पुरुष संघाबरोबरच भारतीय महिलांचा संघ ही ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामने खेळण्यासाठी न्युझिलंड दौऱ्यावर आला आहे. नवीन प्रशिक्षक वुरकेरी रमण यांच्यासाठी ही पहिलीच मालिका. २०१८ च्या टी-२० विश्वचषकानंतर भारतीय संघ पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना खेळणार होता. भारतीय कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सुझी बेट्स आणि सोफी डिवाईन ही न्युझिलंडची अनुभवी सलामी जोडी मैदानात आली होती. तर भारताकडुन झुलन गोस्वामी आणि शिखा पांडेने गोलंदाजीची धुरा सांभाळली होती.

      सुरुवातीची काही षटके सावध खेळुन काढल्यानंतर बेट्स आणि डिवाईनने धावांचा वेग वाढवत ५० धावांची भागिदारी पार केली पण न्युझिलंडच्या १३.४ षटकांत ६१ धावा झाल्या असताना दिप्ती शर्माच्या थेट फेकीवर सोफी डिवाईन २८ धावांवर धावबाद झाली. त्यापुढील ९ धावांत लॉरेन डाऊन (०) आणि सुझी बेट्स (३६) बाद झाल्या. न्युझिलंडची अवस्था बिनबाद ६१ वरुन ३ बाद ७० झाली होती त्यामुळे संघाचा डाव सांभाळण्याची जिम्मेदारी कर्णधार एमी सॅटर्थवेट आणि अमेलिया केरवर होती. एकता बिष्ट, दिप्ती शर्मा आणि पुनम यादव ही फिरकी गोलंदाजांची तिकडी जबरदस्त गोलंदाजी करत होती त्यामुळे सॅटर्थवेट आणि केरला सहज धावा मिळत नव्हत्या. या दोघींनी चौथ्या गड्यासाठी १४.४ षटकांत ४९ धावा जोडल्या.

३१ व्या षटकांत पुनम यादवच्या गोलंदाजीवर जेमिमाह रॉडरीग्सने झेल घेत सॅटर्थवेटला ३१ धावांवर बाद केले आणि पुढील २९ धावांत न्युझिलंडने आणखी ३ गडी गमावले. एकवेळ न्युझिलंडची अवस्था ८ बाद १६१ झाली होती पण हनाह रोव आणि हॉली हडलस्टोनने छोट्या खेळी करत संघाची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. पण न्युझिलंडचा डाव ४८.४ षटकांत १९२ धावांत संपुष्टात आला. न्युझिलंडकडुन सुझी बेट्सने सर्वाधिक ३६ धावांची खेळी केली. भारताकडुन एकता बिष्ट आणि पुनम यादवने प्रत्येकी ३ गडी, दिप्ती शर्माने २ गडी तर शिखा पांडेने १ गडी बाद केला.

१९३ धावांचा पाठलाग करण्यासाठी भारताकडुन स्मृती मंधना आणि जेमिमाह रॉडरीग्सची जोडी मैदानात उतरली होती. पहिली काही षटके खेळुन काढल्यानंतर दोघीही जबरदस्त फटके खेळत होत्या. स्मृती मंधनाने खेळलेले मोठे फटके आणि जेमिमाह ऱॉडरीग्सने खेळलेले फ्लिकचे फटके डोळ्याचे पारणे फेडणारे होते. पहिल्या १० षटकांत बिनबाद ५३ धावा करत मंधना आणि ऱॉडरीग्सने भारताला शानदार सुरुवात करुन दिली. या दोघींची जोडी चांगलीच जमली होती. ४३ चेंडूत मंधनाने एकदिवसीय कारकिर्दीतले १४ वे अर्धशतक झळकावले. १७.३ षटकांत भारताने बिनबाद १०० धावांचा टप्पा पार करत सामन्यांवर पूर्णपणे वर्चस्व निर्माण केले होते. त्यानंतर ६१ चेंडूत ५० धावा करत जेमिमाह ऱॉडरीग्सने एकदिवसीय क्रिकेटमधले पहिले अर्धशतक झळकावले.

मंधना आणि ऱॉडरीग्सची जोडी भारताला विजय मिळवून देईल असेच दिसत होते. ३२ व्या षटकांत हनाह रोवच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत मंधनाने एकदिवसीय क्रिकेटमधील ४ थे शतक झळकावले. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्युझिलंडमध्ये एकदिवसीय शतक झळकावणारी मंधना, क्लेअर टेलरनंतर दुसरी महिला खेळाडु ठरली. भारताला विजयासाठी ३ धावांची आवश्यकता असताना ३३ व्या षटकांत अमेलिया केरच्या गोलंदाजीवर एक मोठा फटका मारुन विजय मिळवण्याच्या नादात मंधना १०५ धावांवर तहुहुकडे झेल देऊन परतली. ३४ व्या षटकाची सुरुवात हनाह रोवने वाईड टाकुन केली आणि भारताने न्युझिलंडवर ९ गड्यांनी विजय मिळवत ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. भारताकडुन स्मृती मंधनाने १०५ (१०४) धावा केल्या तर जेमिमाह ऱॉडरीग्स ८१ (९४) आणि दिप्ती शर्मा शून्यावर नाबाद राहिल्या. न्युझिलंडकडुन अमेलिया केरने एकमेव गडी बाद केला. मालिकेतला दुसरा सामना २९ जानेवारीला माऊंट मौनगुई येथे खेळविण्यात येणार आहे.     

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *