न्युझिलंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यांत भारताचा ८ गड्यांनी विजय, शमी ठरला सामनावीर

न्युझिलंड – भारत मालिकेपुर्वी न्युझिलंड श्रीलंकेचा ३-० ने तर भारताने ऑस्ट्रेलियाचा २-१ ने पराभव केला होता. त्यामुळे ही मालिका जबरदस्त होणार यात शंका नव्हती. न्युझिलंडचा कर्णधार विल्यमसनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मॅकलिन पार्क, नेपियारची खेळपट्टी फलंदाजीसाठी उपयुक्त असते त्यामुळे न्युझिलंडचा संघ प्रथम फलंदाजी करत ३०० धावांचा टप्पा गाठेल असे वाटत होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीसऱ्या एकदिवसीय सामन्यांत खेळलेल्या संघात भारताने दोन बदल केले. दिनेश कार्तिक आणि रविंद्र जडेजाच्या जागी अनुक्रमे अंबाती रायडु आणि कुलदिप यादवला संधी मिळाली.

फलंदाजीला उतरलेल्या न्युझिलंडला दुसऱ्याच षटकांत मोहम्मद शमीने मार्टिन गुप्टिलला त्रिफळाचीत करत पहिला झटका दिला आणि यासोबतच शमीने एकदिवसीय कारकिर्दीत १०० बळी पुर्ण केले. सर्वात कमी सामन्यांत १०० बळी पुर्ण करणारा मोहम्मद शमी भारताकडुन पहिला तर जागतिक क्रिकेटमधील ६ वा खेळाडु ठरला.

त्यानंतर चौथ्या षटकांत शमीने एका शानदार चेंडूवर कॉलिन मुनरोला त्रिफळाचीत करत न्युझिलंडची अवस्था २ बाद १८ केली होती. त्यामुळे संघाचा डाव सांभाळण्याची जिम्मेदारी कर्णधार विल्यमसन आणि रॉस टेलरवर आली होती. तीसऱ्या गड्यासाठी ३४ धावा जोडुन टेलर २४ धावांवर बाद झाला त्यानंतर आलेला टॉम लेथमही फार काळ टिकला नाही आणि तो ही चहलचा बळी ठरला. एका बाजूने गडी बाद होते पण विल्यमसनने एक बाजू सांभाळली होती. विल्यमसन २० धावांवर असताना विजय शंकरच्या गोलंदाजीवर केदार जाधवने विल्यमसनला जिवनदान दिले. विल्यमसनने निकोल्ससोबत ३१ तर सॅंटनरसोबत २६ धावा जोडल्या पण तो संघाला अडचणीतुन बाहेर काढु शकला नाही. एकदिवसीय कारकिर्दीतले ३६ वे अर्धशतक झळकावणारा विल्यमसन ६४ धावा काढुन कुलदिप यादवच्या गोलंदाजीवर  विजय शंकरकडे झेल देऊन परतला. विल्यमसन बाद झाला तेव्हा न्युझिलंडने ७ गडी गमावत १४६ धावा केल्या होत्या आणि न्युझिलंडचा डाव १५७ धावांत संपुष्टात आला. न्युझिलंडकडुन कर्णधार विल्यमसनने सर्वाधिक ६४ धावा केल्या तर भारताकडुन कुलदिप यादवने ४, शमीने ३, चहलने २ तर केदार जाधवने १ गडी बाद केला.

न्युझिलंडला १५७ धावांत गुंडाळल्याने सामन्यांवर भारताचे वर्चस्व होते. १५८ धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या रोहित शर्मा आणि शिखर धवनने भारताला शानदार सलामी दिली. या जोडीत रोहितपेक्षा धवन चांगल्या लयीत दिसत होता. ट्रेंट बोल्ट शानदार गोलंदाजी करत होता. रोहित – धवनच्या जोडीने ९.२ षटकांत ४१ धावांची सलामी दिली. पण १० व्या षटकांत लॉकी फर्गुसनने रोहित शर्माला मार्टिन गुप्टीलकरवी झेलबाद केले. सुर्याची किरणे फलंदाजाच्या डोळ्यावर येत असल्याने १० व्या षटकानंतर खेळ काही काळ थांबवण्यात आला. पण जेव्हा खेळ चालु झाला तेव्हा भाराताला ४९ षटकांत १५६ धावांचे आव्हान देण्यात आले. धवन आणि कोहलीची जोडी चांगलीच जमली होती. मागील काही सामन्यांत अपयशी ठरत असलेल्या धवनला ही एक चांगली संधी होती. धवनने कारकिर्दीतले २६ वे अर्धशतक झळकावले आणि कोहली ही आपल्या अर्धशतकाकडे आगेकुच करत होता पण कोहली ४५ धावांवर असताना ब्रेसवेलने कोहलीला लॅथमकरवी झेलबाद केले. ४५ धावांच्या खेळीत कोहलीने ब्रायन लाराचा १०४०५ धावांचा विक्रम मोडीत काढत एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांत १० वे स्थान पटकावले. धवन – कोहलीने दुसऱ्या गड्यासाठी ९१ धावांची भागिदारी केली.

      कोहली बाद झाला तेव्हा भारताला २४ धावांची आवश्यकता होती. ३४.५ षटकांत भारताने १५६ धावांचे आव्हान पार करत ८ गड्यांनी विजय मिळवला. धवन ७५ तर रायडु १३ धावांवर नाबाद राहिले. ७५ धावांच्या खेळीत धवनने एकदिवसीय क्रिकेटमधील ५ हजार धावांचा टप्पा पार केला. धवन भारताकडुन ५ हजार धावांचा टप्पा पार करणारा १३ वा खेळाडु ठरला. न्युझिलंडकडुन ब्रेसवेल आणि फर्गुसनने प्रत्येकी १ गडी बाद केला. १९ धावांत ३ गडी बाद करणाऱ्या मोहम्मद शमीला सामनावीर पुरस्काराने गोरविण्यात आले. मालिकेतील दुसरा सामना २६ जानेवारी २०१९ ला माऊंट मौनगुई येथे खेळविण्यात येणार आहे.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *