३७२ धावांचा यशस्वी पाठलाग करत सौराष्टची उपांत्य फेरीत धडक

लखनऊ येथे उत्तर प्रदेश आणि सौराष्ट्रमध्ये झालेल्या उप-उपांत्य सामन्यांत उत्तर प्रदेशने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका गाजवलेला चेतेश्वर पुजारा सौराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार होता त्यामुळे सौराष्ट्रची फलंदाजी भक्कम झाली होती. १८.५ षटकांत ४ बाद ५४ अशा स्थितीत सापडल्यानंतर रिंकु सिंगने आधी प्रियम गर्गसोबत १४५ धावांची तर उपेंद्र यादवसोबत ८५ धावांची भागिदारी करत उत्तर प्रदेशचा डाव सावरला. रिंकु सिंग १५० धावांवर बाद झाल्यानंतर सौरभ कुमार आणि शिवम मावीने ८ व्या गड्यासाठी ७६ धावा जोडत संघाची धावसंख्या ३८५ पर्यंत नेऊन ठेवली.

      उत्तर प्रदेशच्या ३८५ धावांना उत्तर देताना सौराष्ट्रचा डाव २०८ धावांत गडगडला. सौराष्ट्रकडुन सलामीवीर हार्विक देसाई (८४) आणि प्रेरक मंकड (६७) वगळता इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. पहिल्या डावात तब्बल १७७ धावांची आघाडी घेतल्याने उत्तर प्रदेशने सामन्यांवर पकड मिळवली होती. त्यामुळे सौराष्ट्रला सामन्यांत टिकुन राहण्यासाठी उत्तर प्रदेशचा दुसरा डाव झटपट गुंडाळण्याची आवश्यकता होती. फिरकी गोलंदाज धमेंद्र जडेजाने सर्वाधिक ४ आणि चेतन सकारीने ३ बळी घेत उत्तर प्रदेशचा दुसरा डाव १९४ धावांत संपुष्टात आणला.

चौथ्या डावात ३७२ धावांच आव्हान तसं अवघडच पण सौराष्ट्राचा संघ या आव्हानाला गाठण्याचा प्रयत्न नक्कीच करणार होता यात शंका नव्हती. ३७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सौराष्ट्राला चांगल्या सलामीची आवश्यकता होती. पहिल्या डावात ८४ धावांची खेळी करणाऱ्या हार्विक देसाईने दुसऱ्या डावात स्नेल पटेलला सोबत घेत १३२ धावांची सलामी दिली. स्नेल ७२ धावांवर बाद झाल्यानंतर हार्विकने विश्वराज जडेजासोबत ५४ धावा जोडल्या. त्यानंतर कमलेश मकवाना (७) आणि रणजी कारकिर्दीतले पहिले शतक झळकावल्यानंतर हार्विक देसाई ११६ धावा काढुन बाद झाला. झटपट दोन गडी गमावल्यानंतर सौराष्ट्रचा संघ थोड्या दबावात आला होता तेव्हा सौराष्ट्रने ४ गडी गमावत २३६ धावा केल्या होत्या.

सौराष्ट्रला विजयासाठी आणखी १३६ धावांची तर उत्तर प्रदेशला ६ गड्यांची आवश्यकता होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका गाजावणारा चेतेश्वर पुजारा आणि शेल्डन जॅक्सन मैदानात होते. पहिल्या डावातील अपयश विसरुन दोघांनी डाव सांभाळण्यावर भर दिला आणि बघता-बघता सौराष्ट्राचा संघ विजयाकडे आगेकुच करत होता. दोघांनी आपापले अर्धशतक साजरे केले. चेतेश्वर पुजाराने नाबाद ६७ तर शेल्डन जॅक्सनने नाबाद ७३ धावांची खेळी करत पाचव्या गड्यासाठी नाबाद १३६ धावांची भागिदारी करत सौराष्ट्राला ६ गड्यांनी विजय मिळवून दिला. या विजयासह सौराष्ट्राने उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत सौराष्ट्रचा सामना कर्नाटकविरुद्ध बॅंगलोरमध्ये २४ ते २८ जानेवारी दरम्यान खेळविण्यात येईल. ३७२ धावांचा यशस्वी पाठलाग करत रणजी इतिहासातील यशस्वी पाठलागाची नोंद सौराष्ट्राने आपल्या नावे केली. याआधी २००८-०९ मध्ये आसामने सर्विसेसविरुद्ध ३७० धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. सामन्यांत ८४ आणि ११६ धावांची खेळी केलेल्या हार्विक देसाईला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *