यजुवेंद्र चहलच्या ६ बळीनंतर धोनी आणि केदारच्या भागिदारीने भारताला मालिका जिंकुन दिली

सिडनीतल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यांत ३४ धावांनी पराभव स्विकारल्यानंतर एडलेडमध्ये खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यांत ६ गड्यांनी विजय मिळवत भारतीय संघाने मालिकेत १-१ ने बरोबरी साधली होती. त्यामुळे मेलबर्नमध्ये खेळविण्यात येणाऱ्या मालिकेतल्या शेवटच्या सामन्यांत विजय मिळवण्यात दोन्ही संघ आतुर होते. मालिकेत पहिल्यांदाच विराट कोहलीने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताने संघात तीन बदल करत अंबाती रायडु, कुलदिप यादव आणि मोहम्मद सिराजच्या जागी अनुक्रमे केदार जाधव, यजुवेंद्र चहल आणि विजय शंकरची वर्णी लागली तर ऑस्ट्रेलियानेही संघात दोन बदल करत बेहरेनडॉर्फ आणि नॅथन लायनच्या जागी बिली स्टॅनलेक आणि झंपाला संघात संधी मिळाली.

      पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच या सामन्यांतही भुवनेश्वर कुमारने भारतीय संघाला धडाक्यात सुरुवात करुन देत ऑस्ट्रेलियाची अवस्था ९ षटकांत २ बाद २७ केली होती. २७ धावांत सलामीवीर माघारी परतल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळण्याची जिम्मेदारी उस्मान ख्वाजा आणि मागच्या सामन्यांतील शतकवीर शॉन मार्शवर आली होती. दोघेही चांगल्या लयीत दिसत होते आणि ख्वाजा व मार्शच्या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी ७३ धावांची भागिदारी केली. एकवेळ ऑस्ट्रेलियाचा संघ २३ षटकांत २ बाद १०० अशा सुस्थितीत होता पण २४ व्या षटकांत यजुवेंद्र चहलने मार्श (३९) आणि ख्वाजाला ३४ धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाची अवस्था ४ बाद १०१ केली होती.

      ख्वाजा आणि मार्श बाद झाल्यानंतर स्टॉयनिसही जास्त काळ टिकु शकला नाही. पीटर हॅंडसकॉंम्बने एक बाजू लावुन धरली होती त्याने मॅक्सवेल सोबत ३८ धावांची भागिदारी केली त्यानंतर रिचर्डसनसोबत ४५ धावांची भागिदारी करत संघाची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला पण चहलच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही आणि ४८.४ षटकांत ऑस्ट्रेलियाच्या संघ फक्त २३० धावाच करु शकला. ऑस्ट्रेलियाकडुन पीटर हॅंडसकॉंम्बने सर्वाधिक ५८ धावा केल्या. तर भारताकडुन यजुवेंद्र चहलने कारकिर्दीतले सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करत ६ गडी तर भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी २ गडी बाद केले.

      एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी भारताला २३१ धावांची आवश्यकता होती पण ६ व्या षटकांत भारताला रोहित शर्माच्या रुपाने पहिला धक्का झाला पण त्यानंतर शिखर धवन आणि विराट कोहलीने दुसऱ्या गड्यासाठी ६२ चेंडूत ४४ धावांची भागिदारी केली. शिखर धवन २३ धावांवर धावांवर बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या धोनीमोबत कोहलीने ५४ धावा धावा जोडल्या. विराट कोहली ४६ धावांवर बाद झाला तेव्हा भारताने ३० षटकांत ११८ धावांची आवश्यकता होती. दुसऱ्या सामन्याप्रमाणेच या सामन्यांतही धोनी चांगल्या लयीत दिसत होता आणि रायडुच्या जागी संधी मिळालेला केदार जाधव धोनीसोबत मैदानात होता.

      धोनी आणि जाधवच्या जोडीने खेळपट्टीवर टिकण्यावर भर दिला. या दोघांनी आवश्यक धावगती आवाक्यात ठेवली होती आणि बघता – बघता धोनी – केदारची जोडी चांगलीच जमली होती. धोनीने एकदिवसीय कारकिर्दीतले ७० वे अर्धशतक झळकावले. शेवटच्या ३ षटकांत भारताला विजयासाठी २७ धावांची आवश्यकता होती. ४८ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर फिंचने धोनीला जिवनदान दिले याच षटकात केदार जाधवने एकदिवसीय कारकिर्दीतले ४ थे अर्धशतक झळकावले. ४८ व्या आणि ४९ व्या षटकात धोनी – केदारने प्रत्येकी १३ धावा करत या जोडीने सामना भारताच्या बाजूने झुकवला होता. शेवटच्या षटकांतील दुसऱ्या चेंडूवर केदार जाधवने चौकार मारत भारताला ७ गड्यांनी विजय मिळवून देत भारताला २-१ ने मालिका जिंकून दिली. भारताने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाविरुद्धची ऑस्ट्रेलियातील व्दिपक्षीय मालिका जिंकली. भारताकडुन धोनीने नाबाद ८७ तर केदार जाधवने नाबाद ६१ धावा काढल्या. ऑस्ट्रेलियाकडुन रिचर्डसन, पीटर सीडल आणि स्टॉयनिसने प्रत्येकी एक गडी बाद केला. ४२ धावांत ६ गडी बाद करणाऱ्या यजुवेंद्र चहलला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले तर मालिकेतील ३ सामन्यांत ३ अर्धशतकांसह १९३ धावा करणाऱ्या महेंद्रसिंग धोनीला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. टी-२० मालिका १-१ ने बरोबरीत, कसोटी मालिकेत २-१ ने विजय तर एकदिवसीय मालिकेत २-१ ने विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ न्युझिलंड दौऱ्यावर जाणार आहे. यात ५ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामने खेळवले जाणार आहेत.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *