थंपी आणि वॉरियरसमोर गुजरातची शरणागती, केरळची पहिल्यांदाच उपांत्य फेरीत धडक

वायनाड येथे खेळविण्यात आलेल्या गुजरात आणि केरळमधील उप-उपांत्य सामन्यांत गुजरातचा कर्णधार पार्थिव पटेलने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत गुजरातच्या गोलंदाजांनी केरळचा पहिला डाव ३९.३ षटकांत १८५ धावांत संपुष्टात आला. केरळकडुन बासिल थंपीने सर्वाधिक ३७ धावांची खेळी केली होती. केरळच्या १८५ धावांना उत्तर देताना गुजरातची अवस्था २ बाद १४ झाली होती पण त्यानंतर पार्थिव पटेलने राहुल शहासोबत तिसऱ्या गड्यासाठी ५२ धावांची भागिदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण पार्थिव पटेल बाद झाल्यानंतर राहुल शहाही माघारी परतला. त्यानंतर राजुल भट आणि ध्रुव रावलने पाचव्या गड्यासाठी २६ धावांची भागिदारी करत शंभरचा टप्पा पार केला पण सहा धावांत तीन गडी गमावल्याने गुजरातच्या अडचणीत वाढ झाली.

      ७ बाद १०७ वरुन गुजरातचा पहिला डाव १६२ धावांत संपुष्टात आला. गुजरातकडुन कर्णधार पार्थिव पटेलने ४३ आणि रश कलारीयाने ३६ धावांची खेळी केली. केरळकडुन संदिप वॉरियरने सर्वाधिक ४ तर बासिल थंपी आणि निधेशने प्रत्येकी ३ गडी बाद करत केरळला २३ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. केरळच्या दुसऱ्या डावाची सुरुवात निराशजनक झाली. २ बाद १२ अशा परिस्थितीत असताना सिजोमोन जोसोफने विनुप मनोहरन, सचिन बेबीसोबत छोट्या भागिदाऱ्या केल्या पण जोसेफने जलज सक्सेना सोबतची सहाव्या गड्यासाठी ५३ धावांची भागिदारी महत्त्वपूर्ण होती. पहिल्या डावात दुखापतग्रस्त झाल्याने संजु सॅमसन ११ व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता.

दुसऱ्या दिवसअखेर केरळचा डाव १७१ धावांत संपुष्टात आला. केरळकडुन जोसेफने ५६ तर जलज सक्सेनाने नाबाद ४४ धावांची खेळी केली. गुजरातकडुन रश कलारीया आणि अक्षर पटेलने पत्येकी ३ तर अर्झान नागवसवाला, चिंतन गजा आणि पियुष चावलाने रश आणि अक्षरला योग्य साथ दिली. १९५ धावांच आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या गुजरातने ६ व्या षटकांतील पहिल्याच चेंडूवर पहिला गडी गमावला आणि त्यानंतर गुजरातची अवस्था ९ षटकांत ४ बाद १८ झाली होती.

झटपट ४ गडी गमावल्यानंतर राहुल शहा आणि ध्रुव रावलने पाचव्या गड्यासाठी ३९ धावा जोडल्या. संघाच्या ५७ धावा झाल्या असताना ध्रुव रावल १७ धावांवर बाद झाला आणि बासिल थंपी व संदिप वॉरियरसमोर गुजरातचा डाव गडगडला. गुजरातचा दुसरा डाव फक्त ८१ धावांत संपुष्टात आला आणि केरळने ११३ धावांनी सामना जिंकत रणजी इतिहासात पहिल्यांदाच केरळने रणजीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. गुजरातकडुन राहुल शहाने सर्वाधिक नाबाद ३३ धावा केल्या तर केरळकडुन बासिल थंपीने ५ तर संदिप वॉरियरने ४ गडी बाद केले. सामन्यांत ८ गडी आणि पहिल्या डावात ३७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केलेल्या बासिल थंपीला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. उपांत्य फेरीत केरळचा सामना विदर्भ आणि उत्तराखंडमधील विजयी संघासोबत २४ जानेवारीला होईल.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *