वासिम जाफर आणि संजय रमास्वामीच्या नाबाद शतकाने विदर्भ भक्कम स्थितीत!

नागपुर येथे खेळविण्यात येत असलेल्या विदर्भ आणि उत्तराखंडमधील उप-उपांत्य सामन्यातील पहिल्या दिवशी उत्तराखंडने ९० षटकांत ६ गडी गमावत २९३ धावा केल्या होत्या. पहिल्या दिवसअखेर सौरभ रावत ६८ तर मयंक मिश्रा १ धावांवर नाबाद होते. पण दुसऱ्या दिवसाच्या ५ व्या षटकांत मयंक मिश्रा (३) सुनिकेत बिंगेवारच्या गोलंदाजीवर पायचित झाला. त्यानंतर सौरभ रावतने सनी राणाला साथीला घेत ८ व्या गड्यासाठी ३५ धावांची भागिदारी केली यातच रावतने या सत्रातील तीसरे शतक झळकावले. उत्तराखंडने शेवटचे तीन गडी फक्त १० धावांत गमावले आणि उत्तराखंडचा पहिला डाव ३५५ धावांत संपुष्टात आला.

      पहिल्यांदाच रणजी स्पर्धेत खेळणाऱ्या आणि बाद फेरीत प्रवेश मिळवणाऱ्या उत्तराखंडकडुन सौरभ रावतने सर्वाधिक १०८ धावा केल्या आणि त्याला अव्निश सुधा ९१ आणि वैभव पनवारने ६७ धावांची खेळी करत  सौरभ रावतला योग्य साथ दिली.

     
विदर्भाकडुन उमेश यादवने सर्वाधिक ४, रजनिश गर्बानी आणि अक्षय वखारेने प्रत्येकी २ तर सुनिकेत बिंगेवार आणि आदित्य सरवतने प्रत्येकी १ गडी बाद केला. उत्तराखंडच्या ३५५ धावांना उत्तर देताना कर्णधार फैज फजल आणि संजय रमास्वामीने १४.३ षटकांत ४५ धावांची सलामी दिली पण दिपक धापोळाने फैज फजलला २९ धावांवर बाद करत विदर्भाला पहिला धक्का दिला. पण त्यानंतर संजय रमास्वामी आणि फॉर्ममध्ये असलेल्या वासिम जाफरची जोडी चांगलीच जमली होती. बघता – बघता संजय आणि जाफरच्या जोडीने विदर्भाची धावसंख्या दोनशेपार नेली. त्यानंतर संजय रमास्वामीने सत्रातले पहिले शतक झळकावले तर वासिम जाफरने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ५७ वे तर या सत्रातील ४ थे शतक झळकावले.

दिवसअखेर विदर्भाने १ गडी गमावत २६० धावा केल्या तर संजय रमास्वामी ११२ आणि वासिम जाफर १११ धावांवर खेळत होते. पहिल्या डावात विदर्भाचा संघ ९५ धावांनी पिछाडीवर आहे तर त्यांचे अजुन ९ गडी बाकी आहेत त्यामुळे तिसऱ्या दिवशी विदर्भाचा संघ मोठी आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असेल यात शंका नाही आणि याची जिम्मेदारी वासिम जाफर आणि संजय रमास्वामी सोबतच गणेश सतीश, अक्षय वाडकरवर असेल. तर उत्तराखंडचे गोलंदाज विदर्भाचा पहिला डाव लवकरात लवकर गुंडाळण्याच्या प्रयत्नात असतील.

रणजी उप-उपांत्य सामने

(दुसऱ्या दिवसअखेर)

१) उत्तराखंड ३५५ वि. विदर्भ २६०/

२) उत्तर प्रदेश ३८५ वि. सौराष्ट १७०/

३) राजस्थान २२४ आणि ११/० वि. कर्नाटक २६३

४) केरळ १८५ आणि १७१ वि. गुजरात १६२

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *