दुसऱ्या एकदिवसीय सामन्यांत भारताचा ६ गडी राखून विजय, मालिका १-१ ने बरोबरीत

पहिल्या सामन्यांत ३४ धावांनी पराभव झाल्यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यांत विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्याच्या दृष्टीने भारतीय संघ मैदानात उतरला होता तर दुसरा सामना जिंकुन मालिका खिशात घालण्याच्या प्रयत्नात ऑस्ट्रेलियाचा संघ होता. पहिल्या सामन्याप्रमाणेच या सामन्यांत सुद्धा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाने संघात एकही बदल केला नव्हता तर भारताने खलील अहमदच्या जागी मोहम्मद सिराजला पदार्पणाची संधी दिली होती.

      ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर फिंच आणि कॅरी यांनी सावध सुरुवात करत संघाला भक्कम सलामी देण्याच्या तयारीत होते पण पहिल्या सामन्याप्रमाणेत या सामन्यांतही भुवनेश्वर कुमारने शानदार इनस्विंगरवर त्रिफळाचीत केले आणि पुढच्याच षटकांत शमीने कॅरीला धवनकरवी झेलबाद करत ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला आणि ७.४ षटकांत ऑस्ट्रेलियाची अवस्था २ बाद २६ केली. झटपट दोन गडी बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाचा संघ दबावात आला होता त्यामुळे ख्वाजा आणि शॉन मार्शने भागिदारी करण्यावर भर दिला पण या भागिदारीत ख्वाजापेक्षा मार्शचा वाटा मोठा होता. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी ५६ धावा जोडल्या. जडेजाच्या थेट फेकीवर ख्वाजा २१ धावांवर धावबाद झाल्यानंतर शॉन मार्शने पीटर हॅंड्सकॉम्ब आणि मार्कस स्टॉयनिस सोबत अनुक्रमे ५२ आणि ५५ धावांची भागिदारी केली.

      स्टॉयनिस बाद झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाने ३६.४ षटकांत ५ गडी गमावत १८९ धावा केल्या होत्या पण मार्शने एक बाजू लावुन धरली होती. ५ गडी गमावल्याने संघाची जिम्मेदारी पूर्णपणे मार्श व मॅक्सवेलवर आली होती आणि मिळालेल्या संधीचा या दोघांनी चांगलाच फायदा घेतला. यातच शॉन मार्शने एकदिवसीय कारकिर्दीतले ६ वे शतक झळकावले. ग्लेन मॅक्सवेलला दोनदा जिवनदान मिळाले आणि या संधीचा त्याने पुरेपुर फायदा उठवला. मार्श आणि मॅक्सवेलच्या जोडीने मोहम्मद सिराज, कुलदिप यादवचा चांगलाच समाचार घेतला. एकवेळ ऑस्ट्रेलियाची धावसंख्या २५०-२६० पर्यंत पोहचेल असे दिसत होते पण या जोडीने ऑस्ट्रेलियाची धावसंख्या २८० पार नेली होती. भुवनेश्वर कुमारने ४८ व्या षटकांत ग्लेन मॅक्सवेल (४८) आणि शॉन मार्शला (१३३) बाद करत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ३०० पार नेण्यावर पाणी फेरले. ५ चेंडूत नाबाद १२ धावांची खेळी करत नॅथन लायनने संघाची धावसंख्या २९८ पर्यंत नेली. ऑस्ट्रेलियाकडुन शॉन मार्शने सर्वाधिक १३१ धावांची खेळी केली तर भारताकडुन भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक ४ तर मोहम्मद शमीने ३ तर रविंद्र जडेजाने १ गडी बाद केला.

      २९९ धावांचे आव्हान यशस्वीपणे पार करण्यासाठी भारताला चांगल्या सलामीची आवश्यकता होती. पहिल्या सामन्यांत शून्यावर बाद झालेल्या शिखर धवनने भारताला चांगली सुरुवात करुन दिली. धवन चांगल्या लयीत दिसत असल्याने रोहित शर्माने खेळपट्टीवर टिकण्यावर भर दिला. रोहित – धवनची जोडी जमली असे दिसत असतानाच धवन ३२ धावा काढुन बेहरेनडॉर्फच्या गोलंदाजीवर ख्वाजाकडे झेल देऊन परतला. ४७ धावांच्या सलामीत धवनचा वाटा ३२ धावांचा होता. त्यानंतर पहिल्या सामन्यांत शतकी खेळी करणारा रोहित शर्मा ४३ धावांवर बाद झाला हा भारतासाठी मोठा धक्का होता.

      रोहित बाद झाल्यानंतर आलेल्या रायडुनकडुन चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. विराटने रायडुसोबत तीसऱ्या गड्यासाठी ५९ धावांची भागिदारी केली. ३०.४ षटकांत भारताने ३ गडी गमावत १६० धावा केल्या होत्या आणि मैदानात होते विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी. भारताला ११६ चेंडूत १३९ धावांची आवश्यकता होती. दोघांनी मोठ्या फटक्यापेक्षा एक – एक दोन – दोन धावांवर भर दिला. विराट- धोनीची जोडीच भाराताला विजय मिळवून देईल असेच दिसत होते पण एकदिवसीय कारकिर्दितले ३९ शतक झळकावुन लगेचच कोहली १०४ धावांवर बाद झाला. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी ८२ धावा जोडल्या.

      भारताला विजयासाठी ३८ चेंडूत ५७ धावांची आवश्यकता होती. धोनीचा चांगलाच जम बसला होता पण त्याला चांगल्या साथीची आवश्यकता होती. धोनी आणि कार्तिकनेही एक – एक दोन – दोन धावा काढण्यावर भर दिला. या दोघांनी आवश्यक धावगती आवाक्यात ठेवली होती. शेवटच्या ३ षटकांत भारताला विजयासाठी २५ धावांची आवश्यकता होती पण २ षटकांत १८ धावा काढल्याने विजय भारताच्या आणला होता. शेवटच्या षटकांत भारताला ७ धावांची आवश्यकता होती.

बेहरेनडॉर्फन् टाकलेल्या शेवटच्या षटकांतील पहिल्याच चेंडूवर षटकार खेचत धोनीने ६९ वे एकदिवसीय अर्धशतक झळकावले. पुढच्याच चेंडूवर एक धाव घेत भारताला ६ गड्यांनी विजय मिळवून दिला आणि भारताला मालिकेत १-१ अशी बरोबरी साधुन दिली.

      भारताकडुन विराट कोहलीने १०४, धोनीने नाबाद ५५ आणि कार्तिकने नाबाद २५ धावांची खेळी केली. पहिल्या सामन्यात धोनीनने ९६ चेंडूत ५१ धावांची खेळी केली होती त्यामुळे त्याच्यावर जोरदार टिका झाली पण या सामन्यांत धोनीने फिनीशरची भुमिका पुन्हा एकदा निभावत भारताला शानदार विजय मिळवून दिला. धोनीसोबतच १४ चेंडूत २५ धावांची नाबाद खेळी करत धोनीला मोलाची साथ दिली. ऑस्ट्रेलियाकडुन ग्लेन मॅक्सवेल, स्टॉयनिस, बेहरेनडॉर्फ आणि रिटर्डसनने प्रत्येकी १ गडी बाद केला. १०४ धावांची खेळी करणाऱ्या विराट कोहलीला सामनावीर पुरस्काराने गौरविणात आले. मालिकेतील शेवटचा सामना मेलबर्नमध्ये १८ जानेवारीला खेळण्यात येणार आहे. मालिका बरोबरीत असल्याने शेवटचा सामना रोमांचक होणार यात शंका नाही.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *