एकदिवसीय सामन्यांत भारताचा ३४ धावांनी पराभव

 सिडनीतल्या एकदिवसीय सामन्यांत भारताचा ३४ धावांनी पराभव, रोहितचे २२ वे शतक व्यर्थ

कसोटी मालिकेत २-१ ने विजय मिळवल्यानंतर एकदिवसीय मालिकाही खिशात घालण्याच्या दृष्टिने भारतीय संघ मैदानात उतरणार होता तर कसोटी मालिकेतला पराभव विसरुन फिंचच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाचा संघ विजय मिळवण्यास उत्सुक होता. फिंचने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. जलदगती गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फ पदार्पणाचा सामना खेळत होता तर पीटर सिडल तब्बल ८ वर्षांनंतर पहिल्यांदाच एकदिवसीय सामना खेळत होता.

      सामन्यांच्या तीसऱ्याच षटकांत भुवनेश्वर कुमारने फिंचला त्रिफळाचीत करत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्यानंतर यष्टिरक्षक – फलंदाज कॅरी (२४) आणि उस्मान ख्वाजा डाव सावरत आहेत असे दिसत असतानाच कुलदिप यादवच्या  गोलंदाजीवर कट मारण्याच्या नादात कॅरी स्लिपला उभ्या असलेल्या रोहित शर्माकडे झेल देऊन परतला. दोन गडी बाद झाल्यानंतर ख्वाजा आणि शॉन मार्शने डाव सावरला. ख्वाजा आणि शॉन मार्शची ९२ धांवाची भागिदारी भारतासाठी घातक ठरत आहे असे दिसत असतानाच जडेजाने ख्वाजाला ५९ धावांवर पायचित करत ऑस्ट्रेलियाला तीसरा धक्का दिला तेव्हा ऑस्ट्रेलियाने २८.२ षटकांत १३३ धावा केल्या होत्या.

ख्वाजा बाद झल्यानंतरही मार्शने एक बाजू लावून धरली होती आणि त्याला पीटर हॅंड्सकॉम्बही योग्य साथ देत होता. ऑस्ट्रेलियाचा संघ मोठ्या धावसंख्येकडे आगेकुच करत होता पण कुलदिप यादवच्या गोलंदाजीवर शॉन मार्श (५४) मोहम्मद शमीकडे झेल देऊन परतला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या ३७.३ षटकांत १८६ धावा झाल्या होत्या. शेवटच्या १२.३ षटकांत ऑस्ट्रेलियाचा संघ किती धावा करतो याकडे सर्वांचे लक्ष होते. हॅंड्सकॉम्ब आणि मार्कस स्टॉयनिस यांनी भागिदारी सोबतच धावगती वाढवण्यावर भर दिला. बघता-बघता या जोडीने ९.५ षटकांत ६८ धावा जोडल्या. ६१ चेंडूत ७३ धावांची खेळी केल्यानंतर हॅंड्सकॉम्ब बाद झाला पण त्यानंतर स्टॉयनिस व मॅक्सवेलने १६ चेंडूत ३४ धावांची नाबाद भागिदारी करत ऑस्ट्रेलियाने निर्धारित ५० षटकांत ५ गडी गमावत २८८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडुन हॅंड्सकॉम्ब (७३), ख्वाजा (५९) आणि शॉन मार्श (५४) यांनी अर्धशतकी खेळी केल्या तर ४३ चेंडूत ४७ धावांची नाबाद खेळी करत स्टॉयनिसने ही महत्त्वाची कामगिरी केली. भारताकडुन कुलदिप यादव व भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी २ तर जडेजाने १ गडी बाद केला.

२८९ धावांच आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला चांगल्या सलामीची आवश्यकता होती पण पहिलाच एकदिवसीय सामना खेळणाऱ्या जेसन बेहरेनडॉर्फने पहिल्याच षटकांत शिखर धवनला शून्यावर पायचित करत भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर जेय रिचर्डसनने चौथ्या षटकांत विराट कोहली (३) आणि अंबाती रायडुला शून्यावर बाद करत ३.५ षटकांत भारताची अवस्था ३ बाद ४ केली होती. चार षटकांत ३ गडी गमावल्याने भारतीय संघ अडचणीत सापडला होता त्यामुळे भारताचा डाव सांभाळण्याची जिम्मेदारी रोहित शर्मा व महेंद्रसिंग धोनीवर आली होती.

      झटपट ३ गडी गमावल्याने रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनीने सावध पवित्रा घेतला होता. दोघांनाही सहजपणे धावा निघत नव्हत्या त्यामुळे आवश्यक धावगती वाढली होती. पण जम बसल्यानंतर दोघेही ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा सहजपणे सामना करत होते आणि बघता – बघता भारतीय संघ लक्ष्याकडे आगेकुच करत होता. दोघांनी अर्धशतक साजरे केले आणि रोहित – धोनीने चौथ्या गड्यासाठी १३७ धावांची भागिदारी केली पण धोनी ५१ धावांवर असताना धोनी पंचाच्या चूकीच्या निर्णयाचा बळी ठरला. हा भारतासाठी मोठो धक्का होता. भारताला १०६ चेंडूत १४८ धावांची आवश्यकता होती.

      रोहित शर्माने एक बाजू लावुन धरली होती. रोहितने दिनेश कार्तिकसोबत ३५ धावांची भागिदारी केली पण मोठा फटका मारण्याच्या नादात कार्तिक १२ धावांवर त्रिफळाचीत झाला. ४० व्या षटकांत रोहितने एकदिवसीय कारकिर्दीतले २२ वे शतक झळकावले. शेवटच्या १० षटकांत भारताला १०९ धावांची आवश्यकता होती. रोहित शर्मावर संघाची जिम्मेदारी होती आणि रोहितने फटकेबाजी करत भारताला विजय मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण दोन षटकांत जडेजा (८) आणि रोहित शर्मा (१३३) माघारी परतले आणि भारताच्या विजयाच्या आशा मावळल्या. २३ चेंडूत २९ धावांची नाबाद खेळी करत भुवनेश्वर कुमारने थोडा प्रयत्न केला पण त्याचा प्रयत्न अपुरा पडला आणि ऑस्ट्रेलियाने ३४ धावांनी विजय मिळवत ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. भारताकडुन रोहित शर्माने १३३ तर महेंद्रसिंग धोनीने ५१ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडुन जेय रिचर्डसनने सर्वाधिक ४, बेहरेनडॉर्फ व स्टॉयनिसने प्रत्येकी २ तर पीटर सिडलने १ गडी बाद केला. २६ धावांत ४ गडी बाद करणाऱ्या जेय रिचर्डसनला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. मालिकेतला दुसरा सामना १५ जानेवारीला एडिलेडमध्ये खेळविण्यात येणार आहे.

शंतनू कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *