दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा ९ गड्यांनी विजय

फाफ ड्यु प्लेसिस ठरला सामनावीर

पहिल्या सामन्यांत ६ गड्यांनी पराभव झाल्यानंतर  दुसऱ्या सामन्यांत पाकिस्तानकडुन प्रतिकार अपेक्षित होता. पहिल्या सामन्यांत पाकिस्तानची फलंदाजी पराभवास कारणीभुत ठरली होती त्यामुळे दुसऱ्या सामन्यांत त्यांच्याकडुन चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. दक्षिण आफ्रिकेनी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. दक्षिण आफ्रिकेनी केशव महाराजच्या जागी वेरॉन फिलॅंडरचा तर पाकिस्तानने हसन अलीच्या जागी मोहम्मद अब्बासचा समावेश केला होता. कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी पाकिस्तानची अवस्था ५ बाद ५४ केली होती पण सरफराज अहमदने (५६) शान मसुद (४४) आणि मोहम्मद अमीरला (२२*) सोबत घेत काही प्रमाणात प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण सरफराज बाद होताच पाकिस्तानचा डाव फक्त १७७ धावांत संपुष्टात आला. पाकिस्तानकडुन कर्णधार सरफराज अहमदने सर्वाधिक ५६ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडुन ड्युआन ओलीवियरने सर्वाधिक ४ बळी तर डेल स्टेनने ३, कागिसो रबाडाने २ तर वेरॉन फिलॅंडरने १ बळी घेत त्याला योग्य साथ दिली.

पाकिस्तानला १७७ धावांत रोखल्यानंतर पहिल्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेनी सामन्यांवर वर्चस्व निर्माण केले होते. मार्कम आणि एल्गारने दक्षिण आफ्रिकेला आश्वासक सुरुवात करुन दिली होती पण १ बाद १२३ वरुन संघाची अवस्था ४ बाद १४९ झाली होती पण त्यानंतर कर्णधार फाफ ड्यु प्लेसिसने बवुमाला साथीला घेत आफ्रिकेचा डाव सांभाळला आणि बघता बघता या दोघांनी पाचव्या गड्यासाठी १५६ धावा जोडल्या. बवुमा ७५ धावांवर बाद झाल्यानंतर ड्यु प्लेसिसने क्विंटन डी कॉकसोबत ५१ धावा जोडल्या पण कसोटी कारकिर्दीतील ९ वे शतक झळकावल्यानंतर ड्यु प्लेसिस १०३ धावांवर बाद झाला. त्यानतंर डी कॉक (५९) सोबतच खालच्या क्रमांकावरील फलंदाजांनी छोटे पण महत्त्वपुर्ण योगदान देत दक्षिण आफ्रिकेचा डाव ४३१ धावांत संपुष्टात आला. आफ्रिकेकडुन कर्णधार ड्यु प्लेसिसने सर्वाधिक १०३ धावा केल्या तर मोहम्मद अमीर व शहीन आफ्रिदीने प्रत्येकी ४ गडी बाद करत गोलंदाजीत महत्त्वपूर्ण योगदान दिले.

पहिल्या डावात तब्बल २५४ धावांची आघाडी घेतल्याने आफ्रिकेचा संघ मजबुत स्थितीत होता आणि सामन्यांचे अडीच दिवस बाकी होते त्यामुळे पाकिस्तानच्या फलंदाजावर दबाव वाढला होता. इमाम उल हक (६) आणि अझर अली (६) झटपट बाद झाल्यानंतर शान मसुद (६१) आणि असद शफीक (७२) ने तीसऱ्या गड्यासाठी १३२ धावांची भागिदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. ३५ धावांत दोघेही बाद झाल्यानंतर पाकिस्तानचा संघ अडचणीत सापडला होता. ८७ चेंडूत ७२ धावांची खेळी करणाऱ्या बाबर आझमने काही काळ प्रतिकार केला पण दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानच्या खालच्या क्रमांकावरील फलंदाज टिकाव धरु शकले नाहीत आणि पाकिस्तानचा दुसरा डाव २९४ धावांत संपुष्टात आला. पाकिस्तानकडुन बाबर आझम, असद शफीक व शान मसुदने अर्धशतकी खेळी केल्या तर आफ्रिकेकडुन कागिसो रबाडा आणि डेल स्टेनने प्रत्येकी ४ गडी घेत महत्त्वपूर्ण भुमिका निभावली.           

  ४१ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या आफ्रिकेला चौथ्याच षटकांत डी ब्रुनच्या रुपाने पहिला धक्का बसला त्यानंतर दुखापतग्रस्त झाल्याने हाशिम अमलाला मैदान सोडावे लागले आणि कर्णधार फाफ ड्यु प्लेसिस मैदानात आला. दहाव्या षटकांत अझर अलीच्या गोलंदाजीवर सलग दोन चौकार मारत डीन एल्गारने (२४*) आफ्रिकेला ९ गड्यांनी विजय मिळवुन देत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. पहिल्या डावात १०३ धावांची खेळी करणाऱ्या कर्णधार फाफ ड्यु प्लेसिसला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. मालिकेतील तीसरा आणि शेवटचा सामना ११ ते १५ जानेवारी दरम्यान जोहान्सबर्ग येथे खेळविण्यात येणार आहे पण या सामन्यापुर्वीच आफ्रिकेला एक धक्का बसला. स्लो ओव्हर रेट मुळे कर्णधार फाफ ड्यु प्लेसिसला एक सामन्याची बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे तीसऱ्या आफ्रिकेचे नेतृत्व कोण करतो याकडे सर्वांचे लक्ष असेल.

तीसऱ्या सामन्यांत विजयी लय कायम राखण्यास आफ्रिकेचा संघ आतुर असेल तर शेवटचा सामना जिंकुन मालकेचा शेवट गोड करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *