तुषार देशपांडे आणि शार्दुल ठाकुरने छत्तीसगडला १२९ धावांत रोखले

मुंबईच्या गोलदाजांची उकृष्ट कामगिरी

     रणजी गतविजेता विदर्भ संघाविरुद्ध पराभव झाल्यानंतर मुंबईचे या सत्रातील आव्हान संपुष्टात आले होते त्यामुळे शेवटचा सामना जिंकुन सत्राचा शेवट गोड करण्याच्या इराद्याने मुंबईचा संघ मैदानात उतरला होता. १४ डावात ३७० धावा केल्यानंतरही अनुभवी यष्टीरक्षक आणि माजी कर्णधार आदित्य तरेला अंतिम १५ जणांत स्थान मिळाले नाही तर पाठदुखीमुळे श्रेयस अय्यरही या सामन्यांला मुकणार होता. १७ वर्षीय यशस्वी जैस्वालने या सामन्यांत मुंबईकडुन पदार्पण केले.

     मुंबईचा कर्णधार धवल कुलकर्णीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत मुंबईच्या गोलंदाजांनी संघाला धडाक्यात सुरुवात करुन  दिली. अमनदिप खारेने आशुतोष सिंग सोबत चौथ्या गड्यासाठी ३१ धावांची तर अजय मंडल सोबत सहाव्या गड्यासाठी २४ धावा जोडल्या. अमनदिप खारे (४८), आशुतोष सिंग (३०) आणि अनुज तिवारी (१८) सोडल्यास एकही फलंदाज दुहेरी अंकी धावसंख्या गोठु शकला नाही आणि छत्तीसगडचा डाव फक्त १२९ धावांत आटोपला. मुंबईकडुन तुषार देशपांडेने ४६ धावांत ५ गडी बाद केले आणि शार्दुल ठाकुरने ४ तर शिवम दुबेनी १ गडी बाद करत तुषारला मोलाची साथ दिली.

     छत्तीसगडला पहिल्याच दिवशी फक्त १२९ धावांत गुंडाळल्यानंतर मुंबईने सामन्यांवर पकड मिळवली होती. गोलंदाजाप्रमाणेच मुंबईच्या फलंदाजांकडुन चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. सलामीवीर जय बिश्ट (२०) आणि विक्रांत आव्टीने (४३) ५.५ षटकांत ३० धावांची सलामी दिली त्यानंतर विक्रांत आव्टीने युवा यष्टिरक्षक – फलंदाज यशस्वी जैस्वालसोबत  ३३ धावा जोडल्या. जैस्वाल बाद झाल्यानंतर विक्रांतने सुर्यकुमार यादवला साथीला घेत तीसऱ्या गड्यासाठी ५० धावांची भागिदारी केली पण दिवसाचा खेळ संपण्याच्या काही वेळ आधी विक्रांत ४३ धावांवर बाद झाला आणि मुंबईला तीसरा धक्का दिला. दिवसअखेर मुंबईने ३ गडी गमावत ११८ धावा केल्या तेव्हा सुर्यकुमार यादव ३१ धावांवर तर ध्रुमिल मतकर शुन्यावर खेळत होते. छत्तीसगडकडुन ओंकार वर्मा, शकीब अहमद आणि हरप्रित सिंगने प्रत्येकी १ गडी बाद केला. दुसऱ्या दिवशी मुंबईचा संघ किती धावांची आघाडी घेतो हे पाहावे लागेल. मुंबईच्या संघाची जिम्मेदारी अनुभवी खेळाडु सुर्यकुमार यादव आणि युवा शिवम यादववर असेल.

— शंतनू कुलकर्णी.

4 thoughts on “तुषार देशपांडे आणि शार्दुल ठाकुरने छत्तीसगडला १२९ धावांत रोखले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *