दुसऱ्या सामन्यांत २१ धावांनी विजय मिळवत न्युझिलंडची मालिकेत २-० ने विजयी आघाडी

मालिकेत टिकण्यासाठी श्रीलंकेला विजय आवश्यक होता तर या सामन्यांत विजय मिळवुन न्युझिलंडचा संघ मालिकेत विजयी आघाडी घेण्याच्या इराद्याने मैदानात उतरला होता. पहिल्या सामन्यांप्रमाणेच याही सामन्यांत न्युझिलंडची कर्णधार केन विलिम्सनने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्या सामन्यांत शतकी खेळी करणाऱ्या मार्टिन गुप्टीलकडुन अशाच खेळीची अपेक्षा होती पण मार्टिन गुप्टील (१३) आणि केन विलिम्सन (१) झटपट बाद झाल्यानंतर न्युझिलंडची अवस्था ७.४ षटकांत २ बाद ३९ अशी झाली होती. त्यानंतर कॉलिन मुनरो आणि रॉस टेलरने डाव सावरत धावगती ६ पर्यंत नेली होती. दोघेही चांगल्या लयीत दिसत होते. कॉलिन मुनरो आपल्या पहिल्या एकदिवसीय शतकाकडे आगेकुच करत होता पण २६ व्या षटकांत एकेरी धाव घेण्याच्या प्रसत्नात कॉलिन मुनरो ८७ धावांवर धावबाद झाला पण तोपर्यंत मुनरो आणि टेलरने तीसऱ्या गड्यासाठी ११२ धावा जोडल्या होत्या.


मुनरो आणि टेलरने तीसऱ्या गड्यासाठी ११२ धावा जोडल्या.

     मुनरो बाद झाल्यानंतर रॉस टेलरने चौथ्या गड्यासाठी हेनरी निकोल्ससोबत ५८ धावांची तर पाचव्या गड्यासाठी जेमी निशेमसोबत ५६ धावांची भागिदारी केली आणि कॉलिन मुनरो पाठोपाठ रॉस टेलर (९०) सुद्धा शतकाला मुकला. पहिल्या सामन्यांत १३ चेंडूत ४७ धावांची नाबाद खेळी करणाऱ्या जेमी निशेमने या सामन्यांतही ३७ चेंडुत ६४ धावांची धडाकेबाज खेळी खेळली. न्युझिलंडने निर्धारित ५० षटकांत ७ बाद ३१९ धावा केल्या त्यात टेलर (९०), मुनरो (८७) व निशेम (६४) ने महत्त्वाचे योगदान दिले. श्रीलंकेकडुन लसिथ मलिंगाने २ तर नुआन प्रदिपने १ गडी बाद केले.

     ३२० धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेला चांगल्या सुरुवातीची आवश्यकता होती पण टिम साउदीने निरोशन डिकवेलाला त्रिफळाचीत करत श्रीलंकेला पहिला धक्का दिला. त्यानंतर गुणथिलकाने कुसल परेरासोबत दुसऱ्या गड्यासाठी ३५ धावांची तर कुसल मेंडीससोबत तीसऱ्या गड्यासाठी ४९ धावांची भागिदारी केली. धनुष्का गुणथिलका चांगल्या लयीत दिसत होता पण ईश सोधीच्या गोलंदाजीसमोर श्रीलंकेची अवस्था २ बाद ११२ वरुन ७ बाद १२८ झाली होती.

     सात गडी बाद झाल्याने सामन्यांवर न्युझिलंडचे पूर्णपणे वर्चस्व होते. तेव्हा थिसरा परेरा आणि लसिथ मलिंगा मैदानात होते. सुरुवातीला सावध खेळल्यानंतर थिसरा परेराने आक्रमक पवित्रा घेतला होता आणि बघता बघता परेरा आणि मलिंगाने ८ व्या गड्यासाठी ७५ धावा जोडल्या त्यात मलिंगाचा वाटा फक्त १७ धावांचा होता. मलिंगा बाद झाल्यानंतर परेराने ९ व्या गड्यासाठी लक्षण संदाकनसोबत ५१ धावांची भागिदारी रचली. ७९ धावांवर असताना विलिम्सनने परेराला जिवनदान दिले होते पण त्यानंतरही परेराने आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला होता.


४२ व्या षटकांत एक धाव घेत थिसरा परेराने पहिले एकदिवसीय शतक झळकावले.

५७ चेंडूत शतकी खेळी करणार थिसरा परेरा सनथ जयसुर्यानंतर सर्वात जलद शतक झळकावणारा दुसरा श्रीलंकेचा खेळाडु ठरला.

     संदाकन बाद झाल्यानंतर पुढच्याच षटकांत गुप्टिलने परेराचा झेल सोडला तेव्हा परेरा १०२ धावांवर खेळत होता पण त्यानंतरच्या दोन षटकांत त्याने निशेम विरुद्ध दोन तर साउदी विरुद्ध चार असे सहा षटकांर मारले. परेरा श्रीलंकेला मालिकेत बरोबरी मिळवुन देतो असे वाटत असताना ट्रेंट बोल्टने एक शानदार झेल घेत परेराला बाद केले आणि श्रीलंकेचा डाव २९८ धावांत आटोपला आणि न्युझिलंडने ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. श्रीलंकेकडुन थिसरा परेरा (१४०) आणि धनुष्का गुणथिलका (७१) वगळता एकही खेळाडु मैदानात टिकाव धरु शकला नाही. न्युझिलंडकडुन ईश सोधीने सर्वाधिक ३ बळी तर नेशम, हेन्री, बोल्ट आणि साउदीने त्याला योग्य साथ दिली. ८ चौकार व १३ षटकांरांच्या सहाय्याने ७४ चेंडूत १४० धावांची खेळी करणाऱ्या थिसरा परेराला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. या खेळीत १३ षटकार मारत थिसरा परेराने सनथ जयसुर्याचा श्रीलंकेकडुन सामन्यांत सर्वाधिक षटकार (११) मारण्याचा विक्रम मोडीत काढला.

— शंतनू कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *